Skip to content

नात्यामध्ये स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि एकता यांचा समतोल कसा राखावा?

नात्यामध्ये स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि एकता यांचा समतोल कसा राखावा?


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


जेव्हा एखादं नात सुरू होत तेव्हा आपण त्या व्यक्तीशी मनाने जोडले जातो, विशेषतः नात जर नवरा बायकोच असेल, प्रेमाचं असेल तर व्यक्ती शरीर आणि मन दोन्ही बाजूंनी एकत्र येत असतात. हे नातच त्यांना एकत्र आणत आणि मग ती दोन स्वतंत्र अशी व्यक्तिमत्त्व राहत नाही त्यांची एक टीम होऊन जाते. तिथे कधी मी येत नाही तर आम्ही येतं. मग तो कुठला निर्णय घ्यायचा असुदे, किंवा अगदी कुठे बाहेर जायचं असुदे. पार्टनरचा विचार आधी केला जातो. तिला किंवा त्याला कसं वाटतंय? त्याला ते पटत असेल तर मी हे करेन किंवा करणार नाही. हा जो वागण्या बोलण्यातील बदल आहे तो नवीन नात जे तयार झालेलं असत त्यातून होतो. इथे फक्त आपलाच विचार केला जात नाही तर आपल्या पार्टनरचा पण विचार केला जातो, किंबहुना त्याचाच आधी विचार केला जातो.

प्रेमाच्या, लग्नाच्या नात्यामध्ये अशी एकता असणं खूप गरजेचं आहे. माझ्यासोबत माझी अशी कोणतरी व्यक्ती आहे, माझा विचार करणारी, माझं मत लक्षात घेणारी, त्याला महत्त्व देणारी, माझ्या सुख दुःखात साथ देणारी माझी म्हणून हक्काची व्यक्ती आहे ही खरच एक आधार देणारी गोष्ट आहे. कारण जेव्हा आपलं माणूस आपल्यासोबत असतं तेव्हा बाहेरच्या कोणाशीही लढायची आपली ताकद असते. पण जर आपलंच माणूस आपल्यापासून दुरावल, सोबत असून पण नसल्यासारखं झालं तर आपण अर्धे हरतो. त्यामुळे नात्यामध्ये एकता, एकजूट याला खूप महत्त्व आहे. हा एका उत्तम, घट्ट नात्याचा पाया म्हणता येईल.

परंतु याची दुसरी बाजू देखील आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आपली बनून जाते, जेव्हा त्या माणसाशी आपलं जवळच नात तयार होत तेव्हा जरी एकता येत असली तरी त्या दोघांचही एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतच जे शेवटपर्यंत राहत. लग्न झाल्यावर, प्रेमात असल्यावर जे काही असेल ते आपलं ही भावना चांगल्या हेतूने जरी आलेली असली तरी जेव्हा त्याचा अतिरेक होतो तेव्हा त्या दोन्ही माणसांच्या स्वतंत्र अस्तित्वाला तडा जातो. ज्याचा परिणाम या नात्यावर होतो. आरोग्यदायी नात कोणत असत? जिथे जरी ती दोघं एकत्र असली, जरी निर्णय घेताना किंवा अजून काही करताना एकमेकांचा विचार केला जात असला, जरी प्राधान्यक्रम ठरवताना एकमेकांचे सर्वात नाव वर असलं, जरी नवरा किंवा बायको या नात्याने माझ्याशी ही व्यक्ती जोडली गेली असली, अगदीच म्हणायचं झालं तर जरी ही व्यक्ती माझ्या आयुष्यचा एक अविभाज्य घटक असली तरी सुद्धा; तिचं किंवा त्याचं आपल्या या नात्यापलीकडे स्वतंत्र अस्तित्व आहे. त्याच एक वेगळं विश्व आहे. ज्यामध्ये त्याची बाकीची नाती असतील, त्याच एक वेगळं आयुष्य असेल, त्याची एक आयुष्य जगायची पद्धत असेल. या गोष्टीची ज्या नात्यामध्ये जाणीव असते तेच नात भक्कम असत.

जिथे जी जाणीव नसते तिथे त्या माणसाची जी स्वतंत्रता असते ती लोप पावते, तिला धक्का लागतो. जाणीव नसते तेव्हा काय होत? तर तू फक्त माझ्यासोबतच राहील पाहिजे, माझच ऐकलं पाहिजे. तुझ्या सर्वात महत्त्वाच्या लोकांमध्ये नेहमी फक्त मीच असल पाहिजे. मित्रांना/ मैत्रिणींना काय भेटायचं असत? मी आहे ना सोबत! आता माझ्याहून तो माणूस जवळचा झाला का? मला न विचारता ही गोष्ट तू केलीसच कशी? लग्न झाल्यावर एकट वैगरे काही नसत. जायचं तर सोबत बाहेर जायचं नाहीतर नाही जायचं. ही जी उदाहरण आहेत ती त्याचीच आहेत. आपल्या पलीकडे देखील त्या माणसाच्या आयुष्यात अजून बऱ्याच गोष्टी आहेत, नाती आहेत, बाजू आहेत हे आपण विसरतो. आणि अस जेव्हा होत तेव्हा आपल्या बोलण्यात, वागण्यात फक्त प्रेम राहत नाही तर तो एक अधिकार होऊन जातो. एखादी वस्तू आपण विकत आणतो आणि दुसऱ्या कोणी त्याला हात जरी लावला तरी आपल्याला त्याचा राग येतो. का? तर ती माझी वस्तू आहे. तिच्यावर फक्त माझा हक्क आहे.

नात्यामध्ये जेव्हा हा असा हक्क येतो, वर्चस्व गाजवयाची वृत्ती निर्माण होते तेव्हा ते नात आरोग्यदायी राहत नाही. तिथे मतभेद, वादविवाद हे होतातच. जरी समोरची व्यक्ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगून, विचारून करत असेल तर याचा अर्थ प्रत्येकवेळी तिला तस वाटत हे नसून पुढील वाद टाळायचे आहेत, त्या बद्दल मनात जी भीती आहे ती टाळायची आहे म्हणून असत. आणि हे अस माणूस काही कालावधीपर्यंत करू शकतो. एका मर्यादेनंतर समोरची व्यक्ती हे सर्व सहन करत नाही. अनेक जण ज्यांची नाती तुटतात त्याच्या मागचं जर प्रमुख कारण पाहिलं तर हेच असत, की मला तिथे व्यक्ती स्वातंत्र्य नव्हत, मला माझी स्पेसच मिळत नव्हती.

म्हणून या दोन्ही गोष्टींचं समतोल राखणं खूप गरजेचं आहे. समतोल राखणं म्हणजे काय? तर दोन्ही गोष्टींना तितकच महत्त्व देणं. एक कुटुंब म्हणून, नवरा बायको म्हणून काही निर्णय आपल्याला एकत्र घ्यावेच लागणार आहेत, उदा. मुल होऊ देणं किंवा न देणं, घर असेल, अजून काही गोष्टी असतील इथे दोघांनी एकत्र आलं पाहिजे. एकमेकांना गोष्टी विचारल्या पाहिजेत. पण याला सोडून जर आपल्या पार्टनरला त्याच्यासाठी म्हणून काही करावस वाटत असेल तर त्याचाही आदर आपण केला पाहिजे. मग ते शिक्षण असेल, बाकीची नाती सांभाळणं असेल, त्यांना वेळ देणं असेल. मला एखादी गोष्ट माझ्या मित्राला किंवा मैत्रिणीला सांगुनच समाधान मिळणार आहे किंवा आता या क्षणी मला त्या नात्याची जास्त गरज आहे अस जर आपला पार्टनर म्हणतोय तर आपण ती स्पेस त्याला दिली पाहिजे.

काही वेळा आपल्याला एकट राहावंसं वाटतं, स्वतःसोबत वेळ घालवावा अस वाटत. पार्टनर म्हणून आपल्याला जरी वाटत असल की सोबत देऊन त्यांना बर वाटेल तरी अस दर वेळी होत नसत. काहीवेळा माणसाला एकांत हवा असतो. मग अश्यावेळी जर आपली नवरा किंवा बायको म्हणाली की मला थोडावेळ एकट्याला राहू द्या, किंवा मी जरा बाहेर फिरून येते तर आपण त्यात वाईट वाटून घेण्याची, किंवा एकटच कश्याला मी येईन सोबत अस म्हणायची गरज नसते. एकमेकांची सोबत ही त्या त्या वेळी माणसाला लागते आणि तो माणूस हक्काने ती घेतो.

पण जिथे स्वतंत्रता हवी असते तिथे ती देखील दिली पाहिजे. अश्या पद्धतीने जेव्हा आपण त्या व्यक्तीच्या स्वतंत्र व्यक्तीमत्वाचा आदर करतो, तिला/त्याला ती स्पेस देतो तेव्हा ती व्यक्ती आपल्या अजून जवळ येते. कारण आपल्या आदराची जाणीव तिच्या मनात कायम राहते. आणि मग ज्या छोट्या छोट्या गोष्टी भीतीपोटी सांगितल्या जातात त्या मनापासून सांगितल्या जातात. दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे की नाही? हा फरक आपण आपल्या वागण्यातून विचारातून करायचा आहे. कारण नात कोणतही असल तरी तिथे टोक गाठून कधीच चालत नाही. तिथे समतोलच असावा लागतो.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!