सतावणाऱ्या गोष्टी मनात ठेवल्या की त्या साचत जातात आणि आणखीन सतावत राहतात.
मेराज बागवान
मन ही अशी गोष्ट आहे जी डोळ्यांना दिसत नाही.दिसते ते फक्त शरीर. मन ,आत्मा ह्या मानसिक गोष्टी आहेत.ज्या उघडपणे दिसत तर नाहीत,पण आपली जडण-घडण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो.साध्या भाषेत म्हणायचे तर,मन म्हणजे आपले स्वत्व.जिथे आपण विचार करतो.कोणताही निर्णय घेण्याआधी ते जिथे ठरवतो ते मन होय.आपण प्रत्येक गोष्ट प्रथम मनात ठरवतो आणि मगच ती वास्तवात येते.मन ही अशी जागा आहे तिथे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट असते.काही गोष्टी बाहेर पडतात.तर काही मात्र कित्येक काळ उलटून गेले तरी मनातच राहतात,साचत जातात.ह्या लेखात आपण ह्याच आणि अशाच गोष्टींबद्दल बोलणार आहोत.
काही गोष्टी तुम्ही उघडपणे बोलू शकत नाही.जसे की ,एखादी मुलगी आहे आणि तिला कोणतातरी मुलगा खूप आवडतो.पण ती ही गोष्ट लगेच उघडपणे सांगू शकत नाही.अशाच काही बऱयाच गोष्टी असतात.ज्या तुमचा मनात साठलेल्या असतात.कधी कोणतेतरी खूप मोठे दुःख असते, जे कोणालाच सांगता येत नाही.तर कधी कोणत्यातरी गोष्टींमुळे प्रचंड मानसिक त्रास होत असतो.पण तो त्रास काही केल्या बाहेर पडत नाही.कधी नातेसंबंध यामध्ये मानसिक कोंडी झालेली असते.तर कधी आर्थिक ओढाताण सुरू असते,आणि मग त्यामुळे मानसिक कल्लोळ उठलेला असतो.ह्या सगळ्या त्रासदायक गोष्टी असतात.सतत तुम्हाला सतावत असतात.कारण त्या मनात कित्येक काळापासून साठून राहिलेल्या असतात.
का बरे असे होत असेल? ही एक मानसिकता आहे.तुम्हाला एखाद्या व्यक्तीला खूप काही सांगायचे आहे,पण तुम्ही फक्त ते मनातच ठेवतात.याने त्या गोष्टीवर कोणतेच उत्तर आणि मार्ग सापडत तर नाही पण तुम्हाला मनात सतत ती गोष्ट सतावत राहते.तुम्ही वारंवार त्या गोष्टीवर विचार करीत बसतात. मनात अशी कोणती गोष्ट राहिली की त्याचा असा त्रास होणे सहजीकच आहे.म्हणून याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे .अन्यथा तुम्ही आयुष्यभर असेच कुढत राहाल.ह्यावर उपाय तरी काय…तो उपाय म्हणजे,त्रासदायक किंवा सतावणार्या गोष्टी व्यक्त करणे. हा सारलमार्ग आहे ह्यावर.आणि अगदी रामबाण उपाय म्हणा हवं तर.
जेव्हा तुम्ही सतावणार्या गोष्टी मनात साचून ठेवतात,तेव्हा तुम्ही वास्तवात जगू शकत नाही.सतत त्या गोष्टी तुमच्या मनात घोळत राहतात आणि तुमचे मन मग घडून गेलेल्या गोष्टींकडेच ओढ घेत राहते.मग ह्या गोष्टी तुमचा वर्तमान हळूहळू उध्वस्त करू लागतात.आणि ह्या सगळ्या गोष्टींची अतिशयोक्ती झाली की माणूस गंभीर मानसिक समस्यांना, आजारांना बळी पडतो.आजकाल अनेकजणांना ह्या समस्या आहेत.आणि मग ह्या समस्यांमुळे अनेकजण मानसिक आजारांसंबंधित उपचार देखील घेत आहेत.ही वाढत जाणारी एक गंभीर सामाजीक समस्या आहे.ज्यावर वेळीच बंदोबस्त करायला हवा.कारण तुम्ही मानसिकरित्या जर अशा प्रकारे कमकुवत होत राहिलात तर आयुष्यात काहीच करू शकणार नाही आणि पूर्ण आयुष्यच नष्ट होईल.
ह्या समस्येमधून प्रत्येकाने बाहेर पडायला हवे.आजकाल होते काय आहे की, जो तो सतावणार्या गोष्टी घेऊन मनात साचत ठेवत आहे आणि याचा त्रास त्या व्यक्तीला तर होतच आहे.पण त्या व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना देखील ह्याचा कळत-नकळत त्रास होतो आहे.म्हणून वेळीच याकडे लक्ष द्या.प्रथम, तुम्ही तुम्हाला कोणती गोष्ट सतावत आहेत हे ओळखा.शांत डोक्याने विचार करा. स्वतःला वेळ द्या.काही वेळ,बाकी सर्व कामे बाजूला ठेवून,तुम्हाला सतावणार्या गोष्टीवर विचार करा.त्या गोष्टींच्या सर्व बाजू विचारात घ्या.नक्की त्या गोष्टी तुम्हाला का त्रास देत आहेत ह्यावर विचार करा.आणि मग त्या गोष्टींचा त्रास कमी करण्यासाठी मी काय करू शकतो/शकते ह्यावर विचार करा. एकदा का तुम्ही हा सर्व विचार केला की तुम्हाला मार्ग दिसू लागेल, उत्तर सापडू लागेल.मग ही समस्या सोडवण्यासाठी कधी तुम्ही स्वतः ती सोडवू शकाल. तर कधी तुम्हाला इतरांची मदत घ्यावी लागेल.मग अशा वेळी,ज्या व्यक्तीशी तुम्ही मोकळेपणाने बोलू शकतात,अशा व्यक्तीशी बिनधास्तपणे बोला.तुम्हाला खूप हलके वाटेल आणि मार्ग देखील सापडेल. असे केल्यामुळे सतावणार्या गोष्टी मोकळ्या होतील आणि तुमच्या मनातून त्या निघून जातील आणि तुम्ही चिंतामुक्त व्हाल.
गोष्टी फक्त मनात ठेवून काहीच होत नाही.आणि त्यात तर ती सतावणारी गोष्ट असेल तर मात्र ती वेळीच मोकळी केलेली बरी.अन्यथा तुम्ही आणखीन त्रासात अडकून राहाल.एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा,’कोणतीच गोष्ट कायम नसते’.पण हे कधी शक्य आहे? जेव्हा तुम्ही स्वतःला त्या त्या वेळी त्या त्या गोष्टींमधून स्वतःला मुक्त कराल.’Move On’ कराल.हे ‘Move On’ होणे सुरवातीला त्रासदायक जरी वाटले तरी स्वतःच्या आरोग्याच्या दृष्टीने ते फार जरुरी असते.काही गोष्टी आपण बदलू शकत नाही.पण त्या गोष्टी सोडू मात्र शकतो.मनात त्या गोष्टी साचून ठेवून त्या काही बदलणार नाहीत.म्हणून त्या सोडून देणे शहाणपणाचे असते.
गोष्टी धरून ठेवल्या की त्रास देणारच.जितके तुम्ही घट्ट पकडून ठेवाल तितका तुम्हालाच त्रास होईल.म्हणून ,’Let it Go’.हा दृष्टिकोन ठेवणे आज काळाची गरज आहे.आयुष्य खूप छोटे आहे…खरोखर खूपच छोटे आहे.मग ह्या छोट्या आयुष्यात एकच गोष्ट कायम धरून ठेवली तर आयुष्य संपले तरी ती गोष्ट आहे तशीच राहील.पण ह्याने काय साध्य होणार आहे? म्हणून काही गोष्टींचे ‘लाड’ वेळीच बंद करा.नवीन आणि सकारात्मक गोष्टी आपोआप समोर दिसू लागतील.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

