Skip to content

आव्हानात्मक परिस्थितीमध्ये motivated कसे राहावे? 

आव्हानात्मक परिस्थितीमध्ये motivated कसे राहावे?


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


आव्हानं, अडथळे, समस्या ही सर्व आपल्या आयुष्याची अशी काही अंग आहेत जी आपल्याला त्या त्या क्षणी आरसा दाखवत असतात. आपल्याला आत्मपरीक्षण करायला भाग पाडत असतात. अस होत की जी गोष्ट आपल्याला कित्येक वर्ष झाली तरी समजलेली नसते ती अश्या वेळी समजून चुकते. आयुष्याचा अर्थ समजतो. त्याची किंमत समजते. शेवटी हे सर्व चाललेलं कशासाठी असतं? तर आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, या जगात टिकून राहण्यासाठी. आणि त्याची धडपड जेव्हा आपल्या आयुष्यात समस्या निर्माण होतात, जेव्हा अटीतटी ची वेळ येते तेव्हाच सुरू होते. कारण आपण बऱ्याच गोष्टी गृहीत धरलेल्या असतात, अश्या एका विशिष्ट पद्धतीने माझं आयुष्य चालणार आहे हे आपण कुठेतरी मनात पक्क केलेलं असत.

त्यामुळेच जेव्हा आपल्याला अपेक्षा नसलेल्या गोष्टी अचानकपणे आपल्या आयुष्यात येऊन उभ्या ठाकतात तेव्हा आपला गोंधळ उडतो. अश्या वेळी नेमक काय करावं समजत नाही. माणसाची मुळ प्रवृती जर पहिली किंवा तिचा विचार जरी केला तरी हेच लक्षात येईल की आपल्यामध्ये जरी “लढा किंवा पळा” अशी सुरक्षा यंत्रणा असली तरी आपण पहिल्यांदा पळायचाच प्रयत्न करतो. कोणतही संकट आलं तरी आधी आपण पळवाटा शोधतो, त्यापासून लांब जायचा प्रयत्न करतो. त्या समस्येचा सामना करण किंवा त्याला लढा देणं या गोष्टी नंतर येतात. किंबहुना जेव्हा ही जाणीव होते की आता आपण पळू शकत नाही, आपल्याला सामना केलाच पाहिजे, यातून तरून गेलंच पाहिजे अश्या वेळी माणूस सामना करायला तयार होतो.

पण हे सामना करण, संकटाला तोंड देणं, आव्हानं स्वीकारणं हे आपण सर्वात आधी केलं पाहिजे. कारण आपण कितीही पळवाटा शोधल्या, कितीही बाजूला जायचं प्रयत्न केला तरी खरी गोष्ट हीच आहे की आपल्याला त्या गोष्टीचा सामना हा करावाच लागतो. त्यापासून आपली सुटका होत नाही. मग जर सामना करायचाच आहे तर तो आधी का नाही? आपल्याला शक्य होईल तस आपण त्यांना सामोर जायचं. आता अस बऱ्याच जणांच्या आयुष्यात होत की आव्हानं सारखी येतच राहतात. एक झालं की दुसर अस काही ना काही सुरू राहतच. एक गोष्ट जरा कुठे स्थिर स्थावर होते तोपर्यंत दुसर नवीन संकट उभ राहत. अश्या वेळी माणूस मानसिक शारीरिक रित्या दमतो, exhaust होतो.

आता अजून किती सहन करायचं?अजून किती लढायच? असा प्रश्न पडतो. एका मागोमाग एक घटना होत गेल्या की माणसाचा सर्व गोष्टींवरून हळू हळू विश्वास कमी होत जातो. मग ती परिस्थिती असुदे, तो स्वतः असुदे किंवा आजूबाजूची माणसं असुदेत. इतकी वर्ष काय चांगल झालं ते यापुढे होणार, मी ते सर्व आशा सोडली आहे अस वाक्य बऱ्याच जणांच्या तोंडातून ऐकायला मिळत. ह्या वाक्यात त्यांचा खूप वर्षाचा संघर्ष असतो, त्रास असतो. त्यातून कुठेतरी ही मानसिकता तयार झालेली असते. पण मग सर्वच जण ज्यांनी संघर्ष केला आहे त्यांची मानसिकता अशी असते का? ज्या ज्या माणसांनी वेगवेगळी आव्हान पेलवून आपलं आयुष्य पुढे नेल आहे ती सगळीच अस बोलतात का? नाही. उलट अशी बरीच जण आहेत जी या आव्हानातून पुढे जाऊन उच्च पदाला पोहोचली आहेत.

या लोकांना अशी कोणती प्रेरणा मिळत असेल ज्यामुळे यांनी हे सर्व सहन केलं, किंबहुना आलेल्या आव्हानांशी लढले. त्यांचं मोटिव्हेशन काय असेल अस बऱ्याच जणांना वाटत. कारण एका मर्यादेनंतर आपल्याला सर्व सोडून द्यावं अस वाटत असत. त्यामुळे जेव्हा असे अनुभव आपण ऐकतो तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटत. कशी काय ही माणसं हे सर्व पार करून गेली हे आपल्याला जाणून घ्यायच असत. तसच आपल्याला स्वतः ला पण अशी प्रेरणा हवीच असते ज्याच्यामुळे आपण अश्या परिस्थितीमध्ये टिकून राहू. बऱ्याच जणांचा असा प्रश्न देखील असतो की अश्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये motivated कसं राहायचं?

तर यासाठी पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं लक्ष्य. आपलं ध्येय. आपल्याला आपल्या आयुष्याचं ध्येय काय आहे, म्हणजेच साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्याला नेमक काय मिळवायचं आहे हे माहीत असलं पाहिजे. त्याची स्पष्टता आपल्याला असली पाहिजे. आपलं ध्येय जितकं स्पष्ट असेल तितके आपण आव्हानांना सामोरे जायला तयार होतो.

याच कारण आपल्याला माहीत असत आपल्याला काय मिळवायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला या सगळ्यातून जावच लागणार आहे. लहान मुलाला परीक्षेत पहिला मार्क मिळवायचा आहे. आता हे करण्यासाठी अभ्यास कसा करायचा, कधी करायचा आणि किती करायचा इथूनच सुरुवात होते. त्या दृष्टीने जे काही करावं लागणार आहे ती सर्व त्या मुलाच्या दृष्टीने आव्हानच असणार आहेत कारण आपण ठरवतो तसच दर वेळी होत अस नाही. तरी तो मुलगा सर्व सांभाळतो. याच कारण आता या सर्व गोष्टी केल्या तरच आपला नंबर येऊ शकतो हे त्याला माहीत आहे. म्हणजेच त्याला त्याच अंतिम ध्येय माहीत आहे.

म्हणूनच आव्हानात्मक परिस्थितीमध्ये motivated राहायचं असेल तर आपल्याला आपलं अंतिम ध्येय माहीत पाहिजे. दुसरी गोष्ट आपला स्वतःवरचा, असलेला विश्वास. जेव्हा संकट येतात, अडथळे, आव्हानं येतात तेव्हा बरेचदा आपण स्वतःवर शंका घेऊ लागतो, मला हे जमेल का नाही, मी हे करू शकेन का नाही. मी कदाचित यात हरेन अस आपल्याला वाटत. इथेच आपण आपली बरीचशी ताकत कमी करून टाकतो. अस न करता स्वतः वर विश्वास ठेवायला शिका. स्वतः ला जास्तीत जास्त जाणून घ्यायचा प्रयत्न करा. आपल्या क्षमता काय आहेत, आपण कोणत्या परिस्थितीत कसं वागू शकतो हे आपल्याला माहीत पाहिजे. जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा आपण स्वतःला सांगतो की काहीही झालं तरी मी यातून बाहेर पडू शकतो, मला हे जमणार आहे, मी याचा सामना करू शकतो. हीच तुमची सर्वात मोठी प्रेरणा असते. कारण हा विश्वास आपल्यासाठी त्या परिस्थितीतून बाहेर पडायला नवीन मार्ग उपलब्ध करून देत असतो.

सर्वात महत्त्वाची आणि अशी गोष्ट जी आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे कोणतीही परिस्थिती आहे तशी फार काळ टिकत नाही. ती निघून जाते, बदलते. आपण एकाच परिस्थितीमध्ये फार काळ कधीच राहत नाही. संकट आली की आपल्याला वाटत आपण आता यातच राहणार. ही परिस्थिती बदलणार नाही. पण अस कधीच होत नाही. वेळ सतत बदलते, दिवस बदलत जातात. त्यामुळे अशी आव्हानं आली की स्वतःला फक्त इतकंच सांगायचं की हेही दिवस जातील. अश्या पद्धतीने आपण स्वतःला प्रेरित करून आव्हानांना सामोरे जायला सक्षम होतो.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “आव्हानात्मक परिस्थितीमध्ये motivated कसे राहावे? ”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!