नातं सुधारायच असेल तर माफीची भूमिका खूप महत्त्वाची आहे.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
चूक भूल द्यावी घ्यावी अस म्हणतात. कारण बरेचदा माणसाकडून चुका या अजाणतेपणी, नकळत झालेल्या असतात. अश्या वेळी आपलं कर्तव्य असत की आपण समोरच्या माणसाला समजून घेऊन, त्याने अस का केलं हे समजून घेऊन त्याला माफ करावे. कारण नात सुधारण्यामध्ये, ते टिकवून ठेवल्यामध्ये माफीची भूमिका खूप मोठी आहे.
कोणतही नात असुदे, नवरा बायको, पालक मुलं, शिक्षक आणि मुलं, मित्र मैत्रिणी, कामावर असलेलं बॉस सोबतच नात, सहकाऱ्यांसोबत असलेलं नात. ही जी सर्व नाती आहेत यामध्ये वेगवेगळ्या क्षमतांच्या, विचारांच्या व्यक्ती, वेगवेगळे दृष्टिकोन असलेल्या व्यक्ती एकत्र आलेल्या असतात. त्यातूनच आवडी निवडी बदलतात, वागण्याचा पद्धती बदलतात. त्यामुळे नात सांभाळताना चुका होतात.
अश्या वेळी माफीची भूमिका का महत्त्वाची आहे? कारण जेव्हा आपण समोरच्याला माफ करतो तेव्हा आपण त्याला स्वीकारून त्याची चूक सुधारण्याची एक संधी देतो. जर त्याला माफच केल नाही तर गोष्ट तिथेच अडकून राहते. ती व्यक्ती तिच्या पातळीवर चूक सुधारते किंवा तसा प्रयत्न करते हा मुद्दा बाजूला राहतो.
कारण त्या चुकीतून नात्यामध्ये जो दुरावा येतो तो त्यावर जास्त लक्ष जात. त्याने चूक केली म्हणून आपल्या मनात त्याच्यविषयी नकारात्मक भावना येतात. आपल्याला त्या व्यक्तीचा राग येतो, आपण त्याच्याशी बोलणं टाळतो, आपल्याला वाईट वाटत. त्या व्यक्तीला चूक केली याचा अपराधीपणा आधी असतोच, त्यात आपली जवळची व्यक्ती आपल्यावर नाराज झाली हे पाहून त्या अपराधीपणात अजून भर पडते. त्याला अधिक वाईट वाटू लागतं.
एखादी गोष्ट झाल्यावर त्यावर तत्काळ प्रतिक्रिया म्हणून आपण काहीतरी म्हणू शकतो किंवा आपल्याला काहीतरी वाटू शकतं. मग त्यात राग येईल, रुसवा फुगवा, भांडण येईल. या सर्व गोष्टी होतात. पण त्या किती काळ ठेवायच्या हे आपल्या हातात आहे. आपल्यासाठी त्या माणसाला त्याच्या चुकीला शिक्षा देणं, त्यातून आलेला दुरावा जास्त महत्त्वाचा आहे की त्या व्यक्तीसोबत असलेलं नातं महत्त्वाचं आहे हे इथे लक्षात येत. अनेकदा गैरसमज होऊन नाती तुटतात. चूक कोणाचीच नसते. तरीही गैरसमज झाल्याने अस होत. पण परत एक प्रश्न निर्माण होतो की गैरसमज तर बऱ्याचदा बऱ्याच जणांमध्ये होतात, सर्वांच्या बाबतीत अस होत का? तर नाही. याच कारण काय? तर संवाद, बोलणं, एकत्र येऊन सर्व खर काय ते जाणून घेणं.
बऱ्याचदा जी नाती गैरसमजातून तुटतात त्यांच्यामध्ये नेमक हेच झालेलं नसत. बोलणंच जिथे होत नाही तिथे खरी गोष्ट काय आहे हे समजणार कसं? समोरच्या व्यक्तीला बोलायला संधी तर दिली पाहिजे. पण असं होत का? तर नाही. आपण त्यावेळी इतके जास्त भावनिक झालेलो असतो की गोष्टी नीट होण्याचे जे मार्ग असतात ते आपणच कुठेतरी त्यावेळी बंद करून टाकतो. ना आपण स्वतः हुन त्या व्यक्तीशी बोलत ना त्या व्यक्तीला बोलू देत. त्या वेळच्या परिस्थितीनुसार आपण काहीतरी अंदाज लावून आपण चुकीचे समज करून घेतो. टाइम प्लीज हा उमेश कामत आणि प्रिया बापटचा मूव्ही आपण पहिला असेल तर त्यात हेच दाखवलं आहे. फक्त गैरसमज आणि माफ न करता आल्याने त्यांच्यामध्ये दुरावा येतो.
Rebt चा जनक अल्बर्ट एलिस म्हणतो, आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वीकारतो, विशेषतः चूक झालेल्या, अपराध झालेल्या व्यक्तीला जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा आपण तिच्या चुकांना, किंवा तिच्या अपराधांना स्वीकारत नाही, दुजोरा देत नाही किंवा आत्मसात करत नाही. रादर आपण त्या व्यक्तीला, त्या माणसाला स्वीकारतो. हे अस का करायचं आहे? कारण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला स्वीकारतो तेव्हा त्याच्या चुकीतून बाहेर काढण्यासाठी आपण त्याला मदतीचा हात देत असतो. जे काही झालं ते ठीक करण्यासाठी मी तुला मदत करेन ही यामागची भावना असते. अस जेव्हा होत तेव्हा ते नात अजून घट्ट होत.
नात सांभाळणं म्हणजे फक्त एकत्र राहणं, बाहेर जाणं, एकमेकांसाठी छान छान वस्तू आणणे नाही. तर जेव्हा कोणीही सोबत नसेल तेव्हा आपण त्या व्यक्तीसोबत असण आहे. आपण त्याची साथ देण आहे. हा जो विश्वास आहे, ही जी साथ आहे ती नात घट्ट करते आणि जेव्हा आपण अस वागतो तेव्हा समोरची व्यक्ती आपल्याशी अजून चांगली जोडली जाते. असे ऋणानुबंध कायमस्वरुपी टिकून राहतात. म्हणून माफ करायला शिका आणि माफी मागायला देखील शिका.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

