Skip to content

काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करत राहणं नेहमी चांगल.

काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करत राहणं नेहमी चांगल.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


ससा कासवाची गोष्ट कितीही वेळा ऐकली वाचली तरी जुनी होत नाही, नाही का? प्रत्येक वेळी त्यातून नवीनच काहीतरी शिकायला मिळत. त्यातला मुख्य मुद्दा किंवा तात्पर्य हेच होत की आपण कधीही थांबता कामा नये. छोटी छोटी पावलं टाकत का होईना आपण पुढे जात राहिलं पाहिजे. सुरवातीला खूप जास्त प्रेरणेने कोणी तरी गोष्ट करायला जाण आणि तो उत्साह मावळला की मध्येच थांबून जाण यातून आपलंच नुकसान होऊ शकत हे देखील आपल्याला त्यातून समजत.

पण याच बरोबर त्यातून अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याला शिकायला मिळते ती म्हणजे तुम्ही काहीतरी करत रहा. आणि ते काहीतरी करण म्हणजे प्रॉडक्टिव करण आहे. ज्यातून काहीतरी चांगल घडू शकत अस करण आहे. आणि हे काहीतरी करण काहीच न करण्याहून नेहमी चांगलच असत. ससा काय करतो? तर पटापट उद्या मारत पुढे जातो व जरा पुढे गेल्यावर “कासव तर खूप मागे आहे, त्याला इतकी गती कुठे की ते आपल्याला मात देईल?”असा विचार करून तिथेच आराम करायचा ठरवतो. तो तिथेच थांबतो. याउलट कासव, जरी त्याची गती कमी असली, जरी ते हळू हळू पावलं टाकत असलं तरी ते थांबत नाही. ते काहीतरी चांगल करत राहत आणि म्हणून आपण जिंकत.

आपण बऱ्याचदा काहीतरी करायला घेतो, सुरुवातीला उत्साह खूप जास्त असतो, की मी हे करणार, मी ते करणार. जसं जसा हा उत्साह मावळतो तस तशी आपली काम करायची इच्छा पण कमी होऊन जाते आणि आपण ते काम अर्ध्यावरच सोडून देतो. आपण काहीच करत नाही. चालढकलपणा यातूनच तर निर्माण होतो. आपल्याला वाटत जर आपल्यामध्ये ते काम करायची प्रेरणा असली तरच आपण ते काम केलं पाहिजे.

पण इथे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे कोणत्याही कामाची प्रेरणा ही सुरुवातीला येत नसून ते काम करायला लागल्यावर येते. आठवून पहा ना, एखादी गोष्ट करायचं आपलं मन नसत. नाईलाजाने का होईना आपण ते करायला घेतो. पण जसजसं आपण ते काम करू लागतो, आपल्याला ते समजू लागत तशी त्या कामातली गोडी पण वाढते, आपण हे करुया अस वाटत आणि प्रेरणा वाढून आपण ते काम करतो देखील. हे का होत? कारण आपण सुरुवात केली म्हणून. आपण त्या कामात सातत्य ठेवलं म्हणून.

सुरुवातीला बरेचदा ते काम करावस वाटत नाही याच कारण त्याची नीट माहिती नसते. माहिती झाली, त्यातल समजत गेलं की काम करायचा उत्साह वाढतो आणि जरी कमी झाला तरी आपण आपलं अंतिम ध्येय नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. जरी ही प्रक्रिया कंटाळवाणी वाटली, त्यातून कदाचित आनंद मिळत नसला तरी पुढे भविष्यात आपल्याला त्याचे काय फायदे होणार आहेत हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे आणि त्यानुसार काम केलं पाहिजे.

मग ते अभ्यासाच्या बाबतीत असो वा एखाद पथ्य पाळण्याच्या बाबतीत असो. हे तर झालं काम अर्धवट सोडण्याच्या बाबतीतल. जे आपण अंतिम ध्येय लक्षात ठेवून करतो. पण आपल्या दैनंदिन आयुष्यात देखील आपण काहीतरी करत राहील पाहिजे.

याची अनेक कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे जेव्हा आपण काहीतरी काम करायला घेतो, विशेषतः चांगल काम करायला घेतो तेव्हा आपला मेंदू, आपलं मन त्यात गुंतून राहत, आपल्या डोक्यात नको ते सतरा विचार येत नाहीत ज्यातून आपल्याला त्रासच होतो. खाली दिमाग शैतान का घर म्हणतात ते यासाठीच. रिकाम बसल्यावर आपल्या डोक्यात होऊन गेलेल्या गोष्टींचे, पुढच्या गोष्टींचे विचार येत राहतात आणि आपण दुःखी होऊन जातो.

आपण आताच्या काळात जगत नाही, त्याचा आनंद घेत नाही. याउलट आपण काहीतरी करत राहतो, छोट का होईना ते काम करतो त्यात व्यस्त राहतो तेव्हा आपण वर्तमानात जगतो. त्या कामात लक्ष लागल्याने दुसरे कोणते विचार येण्याची शक्यता कमी होते. तसेच आपण आज दिवसभरात काहीतरी केल, काहीतरी मिळवलं ही भावना आपल्याला आनंद मिळवून देतो. डोपामाईन स्त्रवत ज्यातून आपण आनंदी होतो.

काहीच न करता रिकाम बसल, उगाच निरर्थक गोष्टींमध्ये आपला वेळ घालवून महत्वाची काम बाजूला टाकल्याने, पुढे ढकलल्याने बाकी काही नाही तर आपल्या मनात निराशा, अपराधीपणा, हताश याच भावना येतात. ज्यातून त्रास वाढतो. आपण स्वतःच्या क्षमतांवर शंका घेतो. म्हणूनच आपल्या पूर्ण दिवसात आपण काहीतरी करत राहणं गरजेचं आहे. रात्री झोपताना जेव्हा आपण यादी काढू की आज दिवसभरात मी काय काय चांगल केल? प्रॉडक्टिव केल? हे वाचल्यावर आपल्यालाच समाधान मिळेल.

आपल्याला हे सर्व स्वतःसाठी करायचं आहे. दुसऱ्यांना चांगल वाटेल, त्यांच्यासाठी करायचं म्हणून नाही. अगदी घरात साफ सफाई करण, झाडांना पाणी घालणे या गोष्टी देखील यात येतात. विश्रांती घेणं ही गोष्ट वेगळी आहे, आणि त्याचे अनेक प्रकार देखील आहे. पण आळस करण आणि त्यातून निष्क्रिय होणं या गोष्टी चुकीच्या आहेत. त्यामुळे दिवसभरात एक तरी अशी कृती नक्की असावी जी आपला दिवस सार्थकी लावेल आणि आपल्याला दिवसाच्या शेवटी समाधान वाटेल. मानसिक असेल किंवा शारीरिक आरोग्य ते टिकवण्यासाठी फार काही मोठ्या गोष्टी कराव्या लागत नाही. सुरुवात ही अश्या छोट्या छोट्या गोष्टीतून होते. कारण फक्त गरजेचं आहे.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!