Skip to content

घेतलेल्या चुकीच्या माहितीमुळे माणसाचे मन इकडे तिकडे भटकत असते.

घेतलेल्या चुकीच्या माहितीमुळे माणसाचे मन इकडे तिकडे भटकत असते.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


असं कधी झालंय का की आपल्याला एखाद्या ठराविक ठिकाणी जायचं आहे. आपली सर्व तयारी झाली आहे, निघण्यासाठी आपण सज्ज आहोत, आपल्याकडे पत्ता देखील आहे. पण जेव्हा आपण तो पत्ता शोधायला लागतो तेव्हा तो काही केल्या आपल्याला नीट सापडत नाही. ते ठिकाण आपल्याला मिळतच नाही.

पत्ता तर सोबत असतो, त्याला अनूसरून आपण त्याबद्दल चौकशी करतो, जिथे जायचं आहे त्यांचं नाव विचारून पाहतो, पण हाती काहीच लागत नाही. आपण एकसारखे फिरतच बसतो. वेळ जातो, आपण दमतो पण पत्ता काही मिळत नाही. असं का होतं? पत्ता तर हातात असतो तरी तो मिळत का नाही? याच कारण तो पत्ता चुकलेला असतो. त्यात जी माहिती दिलेली असते ती चुकलेली असते. हेच ते कारण असत ज्यामुळे हातात माहिती असूनसुद्धा आपल्याला हवं ते ठिकाण मिळत नाही.

म्हणजेच काय तर आपल्याकडे फक्त माहिती असून चालत नाही तर ती बरोबर देखील असावी लागते. जर ती नसली तर आपण आपला वेळ अश्या ठिकाणी घालवतो जिथे आपल्याला जायचच नसतं. जसा चुकीचा पत्ता मिळाल्यावर आपण इथे तिथे भटकत राहतो ना, अगदी तशीच गत तेव्हा होते जेव्हा आपल्याला कोणत्याही गोष्टीबद्दल चुकीची माहिती मिळते, विशेषकरून स्वतःबद्दल, इतरांबद्दल चुकीची माहिती मिळते. फरक फक्त इतकाच असतो की इथे आपण प्रत्यक्षरित्या भटकत नाही तर आपलं मन भटकत राहतं.

आपलं मन स्थिर राहत नाही, त्यात एकसारखे विचार येत राहतात. कोणीतरी आपल्याला काहीतरी येऊन सांगतं आणि आपल्या मनात विचारांचं चक्र सुरू होत. अगं तुला माहित आहे का? ती दोघं तुझ्याबद्दल काहीतरी बोलत होती किंवा अरे आज बॉस समोर त्याने तुझ नाव घेतल म्हणजे नक्कीच काहीतरी झालं असणार. समोरची व्यक्ती जेव्हा आपल्याला अस काही सांगते तेव्हा आपल्या डोक्यात त्या विचारांची मालाच तयार होते.

माझ्याबद्दल बोलत असतील म्हणजे नक्कीच त्यांच्या डोक्यात काहीतरी चालू असणार. त्या माझ्याबद्दल कधी काही चांगल बोलत नाहीत, आता पण त्या नक्कीच काहीतरी वाईट बोलत असतील. त्याने माझं नाव बॉस समोर घेतल याचा अर्थ तो काहीतरी तक्रार करत असणार. एक ना अनेक विचारांची साखळी डोक्यात सुरू होते.

आणि त्यातून प्रतिक्रिया काय निघतात? तर आपलं कश्यात मन लागत नाही. आपण अस्वस्थ होतो, आपल्याला कुतूहल लागून राहत की आपलं नाव यात आहे म्हणजे काहीतरी असणार जे आपल्याला जाणून घेतल पाहिजे. ते जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपल्याला चैन पडत नाही. आणि बरेचदा ते समजून घेण्याचा, जाणून घेण्याचा प्रयत्न पण केला जात नाही. आपण आपलेच काहीतरी अंदाज बांधायला सुरुवात करतो. आणि त्यातून त्या माणसाला जज करायला लागतो.

जसं स्वतःच्या बाबतीत होत तसच इतरांच्या बाबतीत होत. अमुक एखाद्या व्यक्ती बद्दल आपण काहीतरी चुकीची माहिती, अर्धवट माहिती घेतो आणि त्या आधारे त्या व्यक्तीला पाहायला लागतो. बरेचदा यातून नाती खराब होण्याची शक्यता जास्त असते. कारण खर काय आहे हे नेमक माहीत नसत आणि जे समजलेलं असत त्या आधारे आपण व्यक्तीशी वागायला लागतो.

मनात नाना तऱ्हेच्या शंका येऊ लागतात. समजा आपण काहीतरी नवीन वस्तू घ्यायला जात आहोत आणि आपल्या मित्र किंवा मैत्रिणीने आधीच अस सांगितल की ती वस्तू नको घेऊ चांगली नाही, किंवा मी घेतली मला काही चांगली वाटली नाही. आता प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. गरजेचं नाही त्यांना आलेला अनुभव आपल्याला येईल. तरी देखील जेव्हा जे अस सांगतात तेव्हा आपण काही क्षण का होईना ती वस्तू घ्यायला कचरतो.

आता इथे माहिती पूर्णपणे चुकीची असतेच अस नाही पण ती पूर्णपणे बरोबर पण असत नाही. कारण सर्वांना एकसारखा अनुभव येऊ शकत नाही. आपण दक्षता घ्यावी यासाठी सांगणारे काही असतात, पण बरेचदा चुकीची माहिती सांगणारे देखील असतात.

म्हणूनच इथे गरजेचं आहे आपण विचारपूर्वक वागणं. कोणी काहीही सांगितल, तरी आपण नीट खात्री करून घेणं गरजेचं असत. समोरची व्यक्ती जे काही सांगत आहे मग ते व्यक्तीबद्दल असो वा वस्तूबद्दल, स्थळाबद्दल असो वा इतर कोणत्या गोष्टीबद्दल त्याची पार्श्वूभूमी, वास्तविकता समजून घेणं खूप गरजेचं आहे.

आपल्याला जी काही माहिती मिळाली आहे त्यात कितपत खर आहे, त्याला काय पुरावा आहे हे देखील आपण पाहिलं पाहिजे. आणि नीट माहिती घेऊनच त्यानुसार वागल पाहिजे. नाहीतर आपलं मन तसच भटकत राहणार जसे चुकीचा पत्ता मिळाल्यावर आपण.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!