Skip to content

काही दुखणी आवडत्या व्यक्तींबरोबर हसण्या, खिदळण्यानेही बरी होतात.

काही दुखणी आवडत्या व्यक्तींबरोबर हसण्या, खिदळण्यानेही बरी होतात.


हर्षदा पिंपळे


“काही दुखणी आवडत्या व्यक्तींबरोबर हसण्या खिदळण्यानेही बरी होतात.”

खरं आहे का हे ?

पाच वर्ष रिलेशनशिप मध्ये असलेल्या निरवचं अचानक ब्रेकप झालं.चुक एकाचीच असते असं नाही.

तसचं निरवच्याही कित्येक गोष्टी चुकल्या होत्या.

त्याला त्या मान्यही होत्या.पण,रमाला तिच्या चुका मान्य नव्हत्या.तिने कायम निरवला दोष दिला.निरवने कायम रमाला समजून घेण्याचा प्रयत्न केला पण रमाने निरवला कधी समजून घेतलच नाही. सगळी चुक निरवचीच असं समजून तिने त्याला कायमचं दूर लोटलं.निरवला हे सगळं सहन झालं नाही.

आणि पाच वर्ष रिलेशनशमध्ये असणं काही छोटी गोष्ट मुळीच नव्हती.त्या पाच वर्षामध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या.काही चांगल्या तर काही वाईट गोष्टी घडल्या होत्या.खूप साऱ्या आठवणींचा पाऊस त्या काळात पडला होता.पण याच आठवणी पाच वर्षानंतर क्षणात संपल्या होत्या.

निरव अक्षरशः नैराश्यात गेला होता. कालांतराने हळुहळू बाहेर यायचा त्याने प्रयत्न केला. पण निरवचं हसू कुठेतरी हरवलं होतं.आणि हे त्याच्या मित्रांनाही जाणवत होतं.मित्रांना निरवचा तो चेहरा बघवत नव्हता. निरवला काहीही करून बोलतं करायचं,त्याच्या मनातील खदखद बाहेर काढायची असं त्यांनी ठरवलं.त्यांनी थेट त्याच्या दुखऱ्या नसेवर हात ठेवला.अर्थात त्यांनी निरवसमोर रमाचा विषय काढला.निरवला राहवलं नाही.

इतक्या दिवसांनी कुणीतरी हक्काने त्याला काहीतरी समजावत होतं.मित्रांचे खांद्यावरचे हात त्याला काहीतरी खुणावत होते.बोलण्यासाठी पुश करत होते.आणि शेवटी तो बोलला. त्याच्या मनातील सगळी खदखद अगदी सहजपणे बाहेर पडली.तो मोकळेपणाने मित्रांच्या कुशीत रडत होता.त्याला खूप हलकं वाटत होतं. सगळ्या दुखांचा त्याला सहजपणे विसर पडला.त्याच्या मनाची,शरीराची दुखणी मित्रांच्या मिठीत अक्षरशः विरघळून गेली होती.

निरव पुन्हा पहिल्यासारखा झाला होता. त्याचं सर्वांना हवंहवंसं वाटणारं हसू पुन्हा एकदा चेहऱ्यावर बागडत होतं.त्याला कित्येक वर्षांनी असं मोकळं हसताना पाहून त्याच्या आईबाबांच्या चेहऱ्यावरही एक वेगळच समाधान जाणवत होतं.

~ निरवचं दुखणं तर बरं झालं,आपलं काय ?

आपण अनेकदा म्हणतो शरिराची दुखणी एकवेळ

लवकर बरी होतात पण मनाची दुखणी दीर्घकाळ त्रास

देत राहतात.ती सहसा लवकर बरी होत नाहीत.कुणी कितीही येऊन मनाच्या जखमांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला तरीही बरं होणं त्यांच्या तत्वात नाही.त्यांना कितीही “गेट वेल सुन” म्हंटलं तरीही त्या आहे तशाच राहतात.आणि कोण म्हणतं,शरीराचं दुखणं जाणवत नाही ?

मनाची दुखणी जशी जाणवतात तशीच शरीराचीही

दुखणी जाणवतात.खरचटलेल्या जागेवरची एक खपली

जोरात ओढून पहा बरं,मग कळेल शरीराचं दुखणं काय

असतं ते.फरक इतकाच की,शरिराची दुखणी दिसतात

मनाची दुखणी कुणालाही सहजासहजी दिसत नाही.

तर ही दुखणी कुणाला दिसत नाही,जाणवत नाही मग

बरी तरी कशी होतात ?

तर,ही अशी काही दुखणी कुठल्याही मलमपट्टीने नाही तर आवडत्या व्यक्तींसोबत हसण्या, खिदळण्याने बरी होतात.

कितीतरी प्रकारची दुखणी घेऊन आपण जगत असतो.कुणी ब्रेकपच्या नैराश्यात असतं,तर कुणी एखादी गोष्ट मिळत नाही म्हणून त्रासात असतं.कुणाची स्वप्न आर्थिक, कौटुंबिक कारणांमुळे अपूर्ण राहतात.

कुणाला आयुष्यात मनासारखं जगता येत नाही.अनेकदा असंख्य ओझी घेऊन जगावं लागतं.एखाद्याला गमावण्याचं दुखं,मातृत्वाचं सुख न मिळणे,अशाप्रकारची ही दुखणी आपल्या मनात कुठेतरी खोलवर सलत असतात. रोज रोज आपण ती कुणापुढे मांडायला जात नाही.

आपली दुखणी आपणच सावरत असतो.मग ती शरीराची असो वा मनाची !

पण आयुष्यात अशी काही माणसं असतात. ज्यांच्या सहवासात केवळ हसण्या खिदळण्याने ही दुखणी सहजपणे बरी होतात. अशावेळी आपल्याला आपल्या दुःखाचा सहज विसर पडतो.इतकं भान हरपून हसत असतो की हात पाय तुटलेत हेही विसरायला होतं.काहीतरी घडून गेलय याचाही क्षणात विसर पडतो.

आपल्या आवडत्या माणसांच्या सहवासात राहिल्याने, हसण्या, खिदळण्याने जर सगळी दुखणी बरी होत असतील तर कधीतरी आवडत्या माणसांना भेटायला हवं नं ? त्यांचीही दुखणी बरी होतील. कदाचित!


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!