अशाही लोकांना सामील करून घ्या, ज्यांचं मन त्यांच्या चेहऱ्यापेक्षा जास्त सुंदर आहे.
अपर्णा कुलकर्णी
राघव तयार होऊन खाली आला आणि सगळे हातातील कामे सोडून त्याच्याकडे बघतच राहिले. डोळ्यांवर गॉगल, चमकणारे केस, जांभळ्या रंगाचा शर्ट आणि त्यावर साजेसे जॅकेट, हातात घड्याळ तर दुसऱ्या हातात साखळी, ब्लॅक शूज आणि परफ्यूमचा दरवळणारा सुगंध. तो कधीचा सगळ्यांसमोर येऊन उभा होता पण सगळेच आ वासून त्याच्याकडे बघत होते. त्याने टाळ्या वाजवून सगळ्यांना भानावर आणले आणि त्याच्या आईने पटकन देवसमोरचा अंगारा लावला आणि कानामागे काळा तीट सुधा. नेहमीप्रमाणे तो वैतागला आणि सगळ्यांनी त्याला खूप छान दिसतोय, तुझ्याकडे बघतच रहावं वाटत अशी पावती दिली.
राघवच काय तर त्याच्या पूर्ण फॅमिलीत आणि फ्रेंड सर्कलमध्ये सगळेच खूप गोरेपान आणि सुंदर दिसत होते. त्यातल्या त्यात राघवच्या चेहऱ्यावर कॉलेजमधील सगळ्या मुली फिदा होत्या. अनेकींनी त्याला प्रपोज देखील केले होते पण त्यानेच कोणाला होकार दिला नव्हता.
आज नेहमीप्रमाणे राघव त्याच्या सुंदर ग्रुप सोबत बसून गप्पा मारत होता आणि सावळ्या आणि काळया रंगांच्या लोकांवर हसण्याचे काम करत होता. समोरून एक मुलींचा ग्रुप येत होता त्यातील सगळ्याच मुली सावल्या रंगाच्या होत्या त्यांच्यातील प्रत्येकाकडे बघून राघव काहीना काही कॉमेंट पास करत होता आणि बाकी मुले हसत होती.
राघवने आजवर एकाही सावळ्या व्यक्तीला मैत्रीचे स्थान दिले नव्हते त्याच्या आयुष्यात. मैत्रीच काय तर कोणाशीच तो बोलत नव्हता. त्याला त्याच्या दिसण्याचा आणि रंगाचा खूपच गर्व होता. त्याचे कॉमेंट पास करणे बघून मुली पटपट पुढे जात होत्या. त्यात एकच मुलगी राहिली होती, मगापासून होणारा हा प्रकार ती मुलगी बघत होती आणि बाकी मुली गप्प बसून का निघून जात आहेत याचं ही तिला नवल वाटत होते.
ती मुलगी पुढे येत होती तसा राघव म्हणाला, कोण आहे रे ही ??? या आधी पाहिले नाही हिला कॉलेजमध्ये. त्यावर त्याचा मित्र म्हणाला, कालच जॉईन केले कॉलेज तिने. आईची ट्रान्स्फर झाली तिच्या म्हणून, बरीच माहिती काढलेली दिसते रे हीची एकाच दिवसात, त्याच्याकडे बघत राघव म्हणाला. अरे, नाही शेजारीच राहायला आली आहे माझ्या त्यामुळे समजले मला मित्राच्या बोलण्यावर राघवने मान हलवली तेवढ्यात ती मुलगी, पुढे आली आणि थेट राघव समोर येऊन उभी राहिली.
तिचे छोटे पण पाणीदार डोळे पाहून राघव तिच्या डोळ्यात क्षणभर हरवला पण लगेच भानावर येत काहीतरी कॉमेंट पास करणार इतक्यात ती मुलगी म्हणाली, रंग, रूप स्वतःच्या मर्जीने घेऊन येत नाही माणूस कधी. तुमच्या गोऱ्या रंगाला आणि सुंदर असण्याला किंमत दिली ती आमच्या सारख्या सावळ्या आणि काळया रंगांच्या व्यक्तींनी. नाहीतर तुम्हाला कोणीच भीक घातली नसती. दिसायला जरी तुम्ही सुंदर असाल तरीही वागणूक मात्र माणुसकीला काळीमा फासणारी आहे. Disgusting…
आजवर कोणीच अशी राघवच्या समोर बोलण्याची काय तर उभे राहण्याची पण हिम्मत केली नव्हती. राघव तर मनातून तिच्यावर खूपच चिडला होता पण काहीच करू शकला नव्हता.
चार पाच दिवस निघून गेले पण ती मुलगी जे काही बोलली ते मात्र राघवच्या डोक्यातून निघून जायला तयार नव्हते. त्यामुळे त्या मुलीलाच नाही तर तिच्या ग्रुपला धडा शिकवण्याचे त्याने ठरवले होते. राघव त्याचाच विचार करत त्याच्या फ्रेंड्स सोबत जात होता तर काही चोर राघव आणि ग्रुपच्या मागे लागले. ते चोर खूप भयानक होते कारण त्यांच्या हातात हत्यारे होती आणि राघव आणि फ्रेंड्स सगळेच चांगल्या घरातील होते. त्यामुळे त्यांच्याकडून बराच माल मिळणार होता चोरांना. राघव आणि फ्रेंड्स जीव तोडून पळत होते पण शेवटी चोरांनी त्यांना गाठले आणि घड्याळ, पॉकेट, चैन सगळेच मागू लागले. सुरीचा धाक दाखवून मागत असल्याने शिवाय एरिया सुनसान असल्याने पर्याय नव्हता काहीच.
तेवढ्यात चोरांच्या हातावर कोणीतरी दगडफेक केली आणि त्यांच्या हातातील हत्यार खाली पडले. त्याच संधीचा फायदा घेऊन चोरांना राघव आणि फ्रेंड्सनी मारायला सुरुवात केली. त्यातील एका चोराने खालचा चाकू उचलून राघव वर उगारला. राघवला वाटले आता आपण मेलो पण एक मुलगी मध्ये येऊन तिने तो चाकू पकडला आणि सगळ्या मुलींनी मिळून चोरांना बेदम मारले. राघवने पाहिले तर ती तीच मुलगी होती ज्याच्यावर तो कॉमेंट पास करणार इतक्यात त्याला फडफड बोलून गेली होती. पाचच मिनिटात पोलीस आले आणि चोरांना पकडुन घेऊन गेले.
राघव सगळ्यांकडे विशेषतः त्या मुलीकडे बघतच राहिला. त्याच्या मित्राने विचारले तुम्ही इथे ?? त्यावर ती मुलगी म्हणाली, आम्ही घरी जात असताना तुम्हाला पळताना पाहिले. दुसरी मुलगी म्हणाली, तेंव्हाच स्वप्नालीने पोलिसांना सांगितले आणि दगडफेक करण्याची आयडिया पण स्वप्नालीचीच होती. हे सगळं ऐकून राघव खाली मान घालुन तिला त्या दिवशी बद्दल सॉरी म्हणाला, आता काही वेळापूर्वी हिला आणि हिच्या ग्रुपला धडा शिकवण्याच्या विचारात होतो आणि यांनीच आपला जीव वाचवला.
त्याच्याच विचाराची त्याला लाज वाटली आणि जीव वाचवल्याबद्दल आभार मानले तेंव्हा स्वप्नाली म्हणाली, रंगापेक्षा त्या व्यक्तीच्या स्वभावाला किंमत द्यावी मिस्टर राघव. कारण सौंदर्य हे दिसण्यापेक्षा मनावर, स्वभावावर अवलंबून असते. त्यामुळे अशाही लोकांना सामील करून घ्या, ज्यांचं मन त्यांच्या चेहऱ्यापेक्षा जास्त सुंदर आहे. आय होप तुम्हाला पटलं असेल ते. असे म्हणून स्वप्नाली निघून गेली आणि राघव तिच्याकडे बघतच राहिला.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

