Skip to content

मुद्दाम भांडण टाळणारी माणसं घाबरट नाही तर समजूतदार असतात.

मुद्दाम भांडण टाळणारी माणसं घाबरट नाही तर समजूतदार असतात.


मेराज बागवान


भांडणे,वादविवाद सर्वत्र असतात.काही विषयावरून,काही गोष्टींवरून मत भिन्नता असते.प्रत्येकाचे स्वभाव,विचार,दृष्टिकोन वेगवेगळा असतो.प्रत्येक बाबतीत दोन व्यक्तींचे मत समान कधीच असू शकत नाही.

मग ह्यामुळे भांडणे होण्याची शक्यता असते.काही व्यक्ती मग लगेच वादविवाद करायला तयारच असतात.पण काही अशाही व्यक्ती असतात ज्या भांडण होण्याची शक्यता असूनही भांडणे टाळतात.पण अशी माणसे माघार घेणारी किंवा घाबरट नसतात.तर समजूतदार असतात.

नवरा बायकोचेच नाते घ्या ना. दोन विभिन्न संस्कारात वाढलेल्या व्यक्ती.स्वभाव निरनिराळे असतात.अनेकवेळा भांडणे,कलह, वाद-विवाद होतात.पण अनेकांच्या बाबतीत,कधी नवरा शांत राहतो तर कधी बायको.आणि यामुळे नाते टिकून राहते.जो भांडणे टाळतो तो घाबरट असतो असे नाही किंवा त्याच्याकडे बोलायला काही नसते असे नसते.पण भांडणे होऊन नाते बिघडायला नको म्हणून तो व्यक्ती शांत राहते.कारण ती समजून असते की भांडणापेक्षा नाते महत्वाचे आहे.म्हणून ती समजूतदारपणा दाखवते आणि त्यामुळे भांडण टळते.

अनेकदा जो समजून घेतो तो खूप घाबरट आहे किंवा लाजाळू आहे असे काहीसे गृहीत धरले जाते.पण असे असतेच असे नाही.काही जण इतकी समजुतदार असतात की शांतता राखण्यासाठी कधी कधी आत्मसन्मान देखील बाजूला ठेवतात.का तर त्यांना कोणताच वाद नको असतो.अशी माणसे मानसिक शांततेला भांडनापेक्षा जास्त महत्व देतात.

जी माणसे खरेच समजूतदार असतात ना,ती प्रत्येक गोष्टीचा खोलवर आणि सर्वांगाने विचार करतात.प्रत्येक गोष्ट विचारात घेतात.कोणत्यातरी एका गोष्टीवरून वाद कधीच काढत नाहीत.जिथे खरेच बोलणे गरजेचे आहे तिथे बोलले पाहिजे आणि अशा व्यक्ती त्या त्या वेळी बोलतात देखील. पण काही वेळेस समोरच्या व्यक्तीला जपण्यासाठी मुद्दाम भांडणे टाळतात आणि सर्वांचा वेळ वाचवतात.

भांडणे काय सोपी असतात.वाद वाढवायचा तर मिनिटात वाढवता येतो.पण मुद्दाम भांडण टाळणे ही खूप मोठी गोष्ट आहे.आणि हे करण्याची क्षमता असण्यासाठी फार मोठे मन असावे लागते.समजूत व्यक्ती भांडण टाळण्यासाठी नेहमी असाच विचार करते की ,’आणखीन वाद वाढविला तर गोष्ट आणखीन ताणली जाऊन तुटेल आणि जे की कोणासाठीच योग्य नसेल’.

भांडण होण्याचे प्रसंग अनेक ठिकाणी येतात.घरात, कार्यालयात, सार्वजनिक ठिकाणी. खास करून समूहामध्ये तर याचे प्रमाण जास्त असते.पण कोणी तरी एक असा मुद्दाम पुढाकार घेत असतो भांडण टाळण्यासाठी. आणि आज अशा व्यक्तिंची समाजाला नितांत गरज आहे.कारण आज अनेकांकडे संयम राहिलेला नाही.एखादी गोष्ट लगेच हवी असते.नकार मिळाला की लगेच राग,अहंकार पुढे येतो आणि मग त्याचे भांडणात रूपांतर होऊ लागते.मीच का समजून घ्यायचे हा दृष्टिकोन अनेकांचा होत चालला आहे.

आज समजुतदार व्यक्तींची खूप आवश्यकता आहे.एक जबाबदार समाज जर का घडवायचा असेल तर प्रत्येकाने आपल्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्याकडे खूप लक्ष देणे गरजेचे आहे.बदल प्रत्येकाला हवा असतो,पण त्या बदलासाठी स्वतःपासून सुरवात करायला किती जण तयार असतात? जो पर्यंत तुम्ही स्वतःला बदलत नाही,तोपर्यंत तुम्हाला काहिच बदल दिसणार नाही.

मुद्दाम भांडणे टाळणारी व्यक्ती खरेच खूप महान असते.खरे तर त्या व्यक्तीकडे भांडणार्या व्यक्तीपेक्षा देखील खूप काही गोष्टी असतात बोलण्यासाठी.पण कधी नाती जपण्यासाठी तर कधी समूह टिकविण्यासाठी ती धांत राहून आतल्या आत खूप सकारात्मक रित्या लढत असते.त्यामुळे आता अशा व्यक्तींकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलायला हवी हे नक्की.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!