Skip to content

स्वतःच्या फायद्यासाठी सर्वांचाच वापर करत असाल तर पुढे गंभीर एकटेपणाला सामोरे जावे लागेल.

स्वतःच्या फायद्यासाठी सर्वांचाच वापर करत असाल तर पुढे गंभीर एकटेपणाला सामोरे जावे लागेल.


अपर्णा कुलकर्णी


नमिता अत्यंत महत्वाकांक्षी आणि करिअर ओरिएंटेड मुलगी. तिची तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि हुशारी यामुळे सगळ्यांवर ती लगेच छाप पाडण्यात यशस्वी झाली होती. त्यात तिचे लोभसवाणे सौंदर्य त्यात भरच पाडत होते. शाळेत आणि कॉलेजमध्ये तिच्या तल्लख बुद्धिमत्तेमुळे आणि प्रथम क्रमांकामुळे नमिता चर्चेचा विषय ठरली होती. ती फक्त पुस्तकी किडा नव्हती तर खेळ, गेदरिंग, भाषण अशा सगळ्याच गोष्टीत नंबर वन होती. त्यामुळे कित्येक मुले आणि मुली तिच्या मागे पुढे फिरत असत.

नमिताला उत्तम बिझनेस वुमन व्हायचे होते. त्यासाठी लागणारी मेहनत करण्याची तयारी तर होतीच शिवाय घरातून पाठिंबा पण होता. नमिताने गारमेंटचा व्यवसाय करायचे ठरवले होते. पण त्यासाठी लागणारे पुरेसे भांडवल तिच्याकडे नव्हते. म्हणून तिच्या वडिलांनी तिला पैसे देऊ केले होते पण ते ही परत करण्याच्या बोलीवर तिने घेतले होते. आजवर नमिताच्या शिक्षणासाठी तिच्या घरच्यांना एकही रुपया खर्च करावा लागला नव्हता उलट तिच्या स्कॉलरशिपचे जमा झालेले पैसेच आज व्यवसायात भांडवलाच्या रूपाने कामी आले होते.

नमिताची एक जिवलग आणि तितकीच हुशार मैत्रीण होती आयेशा. आयेशा जॉब करत होती कारण व्यवसायासाठी तिच्या भांडवल नव्हते. तिच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच त्यामुळे आर्थिक अडचण दूर करण्यासाठी ती जॉब करत होती. नमिताला आयेशाचे मार्केटिंग स्किल चांगलेच माहीत होते. त्यामुळे त्याचा उपयोग आपल्या व्यवसाय वाढीसाठी किती उपयोगी पडेल ते वेगळं सांगण्याची तिला गरज नव्हती. त्यामुळे ती आयेशाला म्हणाली, की भांडवल गुंतवणूक मी करते तू मार्केटिंग कर.

तुझ्यामुळे जो काही फायदा होईल तो आपल्या दोघीत वाटून घेऊ. आयेशा तयार झाली आणि बघता बघता आयेशा आणि नमिताने काहीच दिवसात व्यवसाय वेगळ्याच उंचीवर नेला. काहीच दिवसात नमिता आयेशाच्या मार्केटिंग ट्रिक्स शिकली होती त्यामुळे एक दिवस ती म्हणाली, आयेशा या व्यवसायात भांडवल माझे आहे, स्टाफ पेमेंट मी करते सगळे माझेच आहे त्यामुळे आता माझ्या गरमेंत व्यवसायाला तुझी गरज नाही.

आयेशा खूप दुखावली गेली आणि म्हणाली, थोड्याच दिवसात तू माझ्या सगळ्या ट्रिक्स शिकून माझ्या स्किलवर व्यवसाय मोठा केलास आणि माझा वापर करून झाला की मला अलगद बाहेर काढून टाकलेस. मी मात्र आपल्या मैत्रीवर विश्वास ठेवून तुला सगळेच सांगितले. पण एक दिवस मी तुझ्याही पेक्षा मोठा व्यवसाय करून दाखवेन.

नमिताला मात्र कोणत्याच गोष्टीचे वाईट वाटले नाही. नमिता व्यवसाय करत असताना तिचा एक छान मित्र झाला होता. त्याचेही बरेच व्यवसाय होते शिवाय घरातील परिस्थिती चांगली होती. कामाच्या निमित्ताने अजय आणि नामिताची ओळख झाली आणि दोघांनीही लग्न केले. नमिता व्यवसायाच्या वेगळ्याच उंचीवर गेली होती प्रचंड पैसा होता आणि घरातही कोणत्याच गोष्टीची कमतरता असण्याचे कारण नव्हतेच. त्यामुळे अजय बाबा होण्याची इच्छा नमिता जवळ बोलून दाखवत होता.

पण नमिताला मुलं बाळ या गोष्टीत पदायचे नव्हते. अजय सोबत लग्न करून दोन वर्षे झाली होती आणि अजय आणि नमिता दोघांचीही फॅमिली मुलासाठी वाट बघत होती. पण नमिता काही केल्या ऐकत नव्हती. त्याच दरम्यान नमिताला अमेरिकावरून एक बिझनेस प्रपोजल मिळाले आणि त्याचसाठी काही महिने अमेरिकेत जावे लागणार होते. अजयने सोबत यावं अशी अपेक्षा होती तिची पण अजय नमिताला परोपरीने समजावत होता की आता पैसा, बिझनेसच्या मागे लागू नकोस. खूप झाले करिअर आता फॅमिलीकडे लक्ष देऊया पण नमिता ऐकेल तर शपथ. ती सरळ सगळ्यांना झुगारून निघून गेली.

पुढे अमेरिकेत गेल्यावर नमिताने छान टीम तयार केली. तिथेही तिने गोड बोलून सगळ्यांशी मैत्री केली आणि प्रत्येकाचे बिझनेस प्लॅन ऐकून घेऊन स्वतःचा उत्तम प्लॅन तयार करून डील मिळवली. त्यामुळे तिथेही बरेच लोक दुखावले गेलेच पण नमिताने मैत्रीचा वापर करून आपला कसा वापर केला याने एक शिकवण पण दिली.

अजय आणि सगळेच कुटुंब तिच्यावर खूप नाराज होते. नमिताचे असे वागणे बघून तिचे बाबा खूप आजारी पडले होते. पण पैशांच्या मागे धावणाऱ्या नामितला नात्यांची जाणच कुठे राहिली होती. हल्ली याच कारणामुळे अजय आणि नमिता मध्ये सतत खूप वाद होत होते. त्यामुळेच आपण घटस्फोट घेऊया असे अजय वैतागून म्हणाला होता.

त्यावर तिला काहीतरी पश्चात्ताप होईल अशी त्याची खोटी आशा तेंव्हा खोटी ठरली जेंव्हा नमिता म्हणाली, माझ्या बिझनेस सोबत तुझा ही बिझनेस मीच मोठा केला माझ्या आयडिया वापरून. तो असाच सोडून देईन असे वाटले का तुला ??? तुझी बायको या नात्याने प्रॉपर्टीचे सगळे हक्क मला दे. म्हणजेच निम्मा हिस्सा दे आणि मला यातून मोकळं कर. पैशाला हपापलेल्या नमिताला अजयने मागेल ते दिले आणि तिच्यापासून मोकळा झाला.

आज वयाच्या साठाव्या वर्षी नमिताकडे करोडोंची संपत्ती होती ती सुधा पदोपदी लोकांचा स्वतःच्या स्वार्थापोटी वापर करून मिळवलेली. पण स्वतःचे हक्काचे म्हणावे असे तिचे या जगात कोणीच नव्हते. तिच्या बाबांनी मरताना तिला माझ्यासमोर उभी करू नका अशी इच्छा मागितली होती, नमितामुळे मी विधवा झाले म्हणून तिच्या आईने पाठ फिरवली ती कायमची.

अजयने दुसरे लग्न केले होते आणि दोन मुलांसोबत त्याचा संसार उत्तम सुरू होता. तर आयेशाने नमिताच्या नाकावर टिच्चून असाच व्यवसाय सुरू करून यश मिळवण्यात तिच्या पुढे दोन पाऊले पुढे तर गेलीच होती शिवाय माणसे जोडली होती ते वेगळेच. नामिताला खूप उशिरा का होईना एक गोष्ट समजली होती आणि ती म्हणजे, स्वतःच्या फायद्यासाठी सर्वांचाच वापर कराल तर पुढे गंभीर एकटेपणाला सामोरे जावे लागेल.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “स्वतःच्या फायद्यासाठी सर्वांचाच वापर करत असाल तर पुढे गंभीर एकटेपणाला सामोरे जावे लागेल.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!