प्रत्येक वेळी इतरांशी तुलना केल्यावर आपल्याच आयुष्याचा खेळ होतो.
हर्षदा पिंपळे
“त्या श्रेयाला गणितात माझ्यापेक्षा पाच मार्क्स जास्त मिळाले. मी सुद्धा जास्त अभ्यास केला होता. सकाळी लवकर उठून अभ्यास केला होता.रोज दोन दोन तास चांगला सराव केला होता. तिने तर तेवढंही केलं नव्हतं.मग मला तिच्यापेक्षा कमी मार्क्स कसे मिळाले ? असं होऊच कसं शकतं ? ती तर अभ्यासात एवढी हुशारही नाही. मग असं कसं झालं?”
“त्याला काय कमी आहे. सगळं आहे त्याच्याकडे. गाडी,बंगला,सोनंनाणं अगदी सगळं आहे. आपल्यासारखं नाही. साखर आहे तर चहा पावडर नाही.सगळं भरभरून आहे त्यांच्याकडे. चार पिढ्या आरामात बसून खातील इतकी संपत्ती आहे. कुणाला वेगळं कमवायची काय गरज आहे..? नाहीतर आपलं आयुष्य…काहीतरी तुलना होऊ शकते का ? ते कुठे आपण कुठे…? जमीन आसमानाचा फरक आहे आपल्या आणि त्यांच्यामध्ये.असो,आपलं आयुष्य आहे.काढायचे म्हणून काढायचे दिवस कसेतरी.”
“तो बघ किती चांगला आहे त्याचा स्वभाव. किती प्रेमाने वागतो सगळ्यांशी. कधी कुणाशी वाईट शब्दात बोलत नाही. नाहीतर तु.कसा वागतोस सगळ्यांशी…? सतत आपलं वाकड्यात शिरत असतोस.नीट बोलत नाही.”
तर अशी काही उदाहरणं आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहेत.आपण सतत आपल्या आयुष्याची इतरांसोबत तुलना करत असतो किंवा मग आपली तुलना कुणीतरी दुसऱ्याबरोबर करत असतं.आपण जेव्हा स्वतः स्वतःची तुलना इतरांशी करतो तेव्हा आपण आपल्या आयुष्याची स्वतः वाट लावत असतो.आणि जेव्हा दुसरी लोकं आपली तुलना दुसऱ्यांसोबत करत असतात तेव्हा तर फारच भयानक वाटत असतं. “हे माझी तुलना करूच कशी शकतात?”असा प्रश्न आपल्याला सहज पडतो.पण मग जेव्हा आपण स्वतःच आपलं आयुष्य इतरांशी कम्पेअर करत असतो तेव्हा काय? तेव्हा काहीच वाटत नाही का?दुसऱ्यांनी असं केलं तर करूद्या.त्याचा फार विचार करू नका.पण,स्वतः मात्र स्वतःच्या आयुष्याला इतरांच्या आयुष्याशी कम्पेअर करू नका.आपलं आयुष्य आपण आपल्या पद्धतीने जगायला काय हरकत आहे ?
‘तुलना’…डोन्ट कम्पेअर युअरसेल्फ विद् ऑदर्स…!असं म्हंटलं जातं. पण आपण आपल्या आयुष्यात ते कधीही ऐकत नाही. आपण कायम इतरांशी आपल्या आयुष्याची तुलना करत असतो.आपण श्रीमंत असो किंवा गरीब , त्याने फारसा फरक पडत नाही. तुलना करणं स्वभावातच बसलेलं असतं.आणि तुलना करण्याच्या स्वभावामुळे आपण आपल्याच आयुष्याचा त्रास वाढवत असतो.इतकच नाही तर कुणी आपली तुलना इतरांसोबत केली तर तेही आपल्याला सहन होत नाही.त्या गोष्टीचा आपल्याला प्रचंड त्रास होतो.पण इतकं सगळं कळत असूनही आपण तुलना करायचं काही थांबवत नाही.
मित्रांनो, आयुष्यात इतरांशी तुलना करणं खरचं महत्वाचं आहे का ? किती दिवस असं तुलना करत आयुष्य जगत राहायचं?कितीदिवस तोलत राहायचं?कितीदिवस मोजमाप करत राहायचं?
त्यापेक्षा सोडून देऊयात सगळं.सायकलची तुलना एखाद्या बीएमडब्ल्यू सोबत करायलाच हवी का ? सायकलकडे सायकल म्हणून पाहिलं आणि बीएमडब्ल्यू कडे बीएमडब्ल्यू म्हणून पाहिलं तर सगळं सहज सोपं होईल.इतरांशी सतत तुलना करत राहिलो तर आपल्याच आयुष्याचा खेळ होऊ शकतो.इतरांना त्यामुळे काहीच फरक पडणार नाही.उलट आपलच आयुष्य ढवळून निघू शकतं.गोष्टी अवघड होऊ शकतात.
कुणी पुढे गेलं म्हणून मनात राग ठेवू नका.आणि मागे राहिलं म्हणून नावही ठेवू नका. त्यापेक्षा आहे त्यात समाधानी राहा.आणि जे हवय ते मिळवण्यासाठी प्रयत्न करा.उगाचच तुलना करून काहीच उपयोग नाही.
तुलना करायची झाली तर स्वतःची तुलना स्वतःशी करून पहा.इतरांशी नाही ! कारण,तुलना केल्याने प्रचंड नुकसान आणि त्रास आपण करून घेत असतो.त्यापेक्षा अशी तुलना न केलेलीच बरी.आयुष्याचा होणारा खेळ थांबवायचा असेल तर आधी तुलना करणं थांबवा.
हो,तुलना करणं थांबवा.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


लेख आवडला