“ज्या घरातील व्यक्ती एकमेकांच्या मतांना किंमत देतात त्या घरात वास्तुदोष कधीच नसतो.”
मधुश्री देशपांडे गानू
मध्यमवर्गीय सुशिक्षित, सुसंस्कृत घर. आई-वडील आणि दोन मुली. साधारण 13 ते 15 वयोगटातील. वडील कॉलेजमध्ये प्राध्यापक. आई गृहिणी दोघेही उच्च विद्या विभूषित. वडिलांना पगाराचा चेक मिळतो. वडील घरी आल्यावर आपल्या पत्नीला चेक दाखवतात. तसाच आपल्या मुलींनाही दाखवतात. दर महिन्याचा जमाखर्चाचा आराखडा, गणित मांडताना मुलींनाही सहभागी करून घेतलं जातं. घरातले लहान-मोठे निर्णय सर्वांच्या संमतीने होतात.
प्रसंग दुसरा. धाकटी मुलगी अकरावीत असताना नापास होते. खरंतर आई-वडिलांनी आकांडतांडव करायला हवं. खूप चिडचिड करायला हवी. वाटेल तसं तोंडसुख घ्यायला हवं. पण तसं न करता आई त्या मुलीला नीट समजावून सांगते. “तू अभ्यास केला नाहीस म्हणून नापास झालीस. चूक तर झाली. जबाबदारी संपूर्णपणे तुझी आहे. ठीक आहे. नवीन जोमाने अभ्यास कर आणि चांगल्या मार्गाने पास हो.” बस इतकंच. मुलीवर आई-वडिलांनी विश्वास दाखवल्याने तिचा हुरुप वाढतो. आणि ती खरंच चांगल्या मार्कांनी पास होते.
प्रसंग तिसरा. मुलींची लग्न होऊन त्या सासरी छान नांदत आहेत. लहानशा आजाराचं निमित्त होऊन आई जाते. आता वडील एकटे, निवृत्त, वयस्कर. मग मोठी मुलगी त्यांना स्वतःकडे घेऊन येते. तेही निःसंकोचपणे येतात. जावयाकडे कसं राहायचं?? असले प्रश्न त्यांना पडत नाहीत. आणि मुलीच्या घरी सासू-सासरे ही तिच्या या निर्णयाचे स्वागत करतात. तिला विरोध करत नाहीत. तिच्या मतांचा आदर राखला जातो. वडिलांची योग्य काळजी घेतली जाते. तेही छान, आनंदाने समरसून जगतात. त्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला जात नाही.
वरील तिन्ही प्रसंग म्हटले तर अगदी छोटे छोटे आहेत. पण अशा छोट्या प्रसंगांनीच कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांवरील प्रेम, विश्वास, आदर हा दिसून येतो. अशा एकमेकांच्या मतांचा आदर ठेवणाऱ्या घरामध्ये वास्तुदोष कधीच आढळून येत नाही.
पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असे. घरातील कर्ता पुरुष सांगे तसंच सगळ्यांना वागावे लागे. आणि ते कुटुंबाच्या भल्यासाठीच असे. एकमेकांना धरून, समजून घेऊन, वेळप्रसंगी पडतं घेऊन, तडजोड करूनही कुटुंब एकत्र ठेवणं याला प्राधान्य होतं. सुखदुःखात, कोणत्याही प्रसंगात एकत्र असल्याने कुटुंबामध्ये जिव्हाळा, प्रेम, विश्वास असायचा. एकमेकांच्या मतांची किंमतही केली जायची. पूर्वीसारखा कुटुंबातील एकोपा आज मात्र नक्कीच कमी झालेला दिसत दिसत आहे.
आज छोट्या कुटुंबात आई वडील दोघेही नोकरी, व्यवसाय करणारे पैसा मिळवण्यात गर्क. आणि मुलं अभ्यास, वेगवेगळे क्लास, मोबाईल, मित्र-मैत्रिणींमध्ये गर्क. आज सगळ्यांसाठी आपल्याकडे वेळ असतो पण कुटुंबातील सदस्यांसाठीच वेळ नसतो. सोशल मीडियाच्या आभासी जगात सतत रमणारे आपण, कुटुंबापासून मात्र तुटत चाललो आहोत. कुठेतरी प्रत्येक माणूस एकटा आहे असं वाटतं.
कारण आता पूर्वीसारखा सुसंवादच घडत नाही कुटुंबात. पैसा कमावण्याच्या रॅटरेस मध्ये धावताना आपली मुलं कधी मोठी झाली हेच आई-वडिलांना कळत नाही. आई-वडील आणि मुलं यांच्यातले नाजूक बंध, छोट्या छोट्या गोष्टीतला एकत्र आनंद आज कुठेतरी हरवला आहे, असं वाटतं. आई-वडील आणि मुलगी यांचा व्हाट्सअप ग्रुप असतो कारण समोरासमोर बोलायला एकमेकांसाठी वेळच नाही. असो.
आई वडील आपल्या अपेक्षांचे ओझं मुलांवर लादताना दिसतात. सगळं आहे, उच्च शिक्षण, नोकरी, रग्गड पैसा, घर, गाड्या, स्टेटस पण मानसिक स्थैर्य नाही. मनातलं मोकळेपणाने बोलायला घरात हक्काचं माणूस असेल असं वाटत नाही. कारण विश्वास, आदर उरलेला नाही. ही दाहक वस्तुस्थिती आहे.
आजही ज्या घरांमध्ये मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे, आवडीप्रमाणे अभ्यासक्रम निवडू दिला जातो. आई-वडील मुद्दाम मुलांसाठी क्वालिटी टाईम राखून ठेवतात. जिथे कोणत्याही वयाचे मूल आई-वडिलांशी बिनधास्तपणे बोलू शकतं. बाहेर कोणत्याही प्रसंगाला तोंड द्यावं लागलं तरी घरी मला समजून घेणारी माझी माणसं आहेत, असा विश्वास जिथे असतो. जिथे आई वडील मुलांचं कान देऊन ऐकतात, दुर्लक्ष करत नाहीत. जिथे मुला मुलींच्या लग्नाबाबतच्या मतांचा आदर केला जातो. त्यांच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य त्यांना दिलं जातं, पण त्यांना योग्य ते उपदेश योग्य वेळी देण्याचं स्वातंत्र्य आई-वडिलांनाही असतं.
जिथे घरातील जेष्ठ व्यक्तींना dustbin समजलं जात नाही. तर त्यांच्या अनुभवाचा, ज्ञानाचा उपयोग करून घेतला जातो. मान राखला जातो. ज्येष्ठ व्यक्तींना सन्मानाने वागवलं जातं. काही वेळा ज्येष्ठतम व्यक्ती वयोमानानुसार, आजारपणामुळे विसरतात, तिरसट वागतात, चिडचिड करतात. अशा वेळी शांतपणे त्यांना सांभाळून घेतलं जातं. त्यांच्याशी आजही रोज थोडा वेळ का होईना संवाद साधला जातो. तिथे ह्या ज्येष्ठ व्यक्तीही त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी आनंदाने, समाधानाने जगताना दिसतात.
कुटुंब कसं एकजिन्सी असावं. घरातील कामे असो किंवा महत्त्वाचे निर्णय असो, प्रत्येकाचा सहभाग हा असायलाच हवा. त्यानेच प्रेम, विश्वास वाढीस लागतो. मग अशा सुखेनैव नांदणाऱ्या घरात वास्तुदोष निर्माण होऊच शकत नाही. कुटुंबातील सदस्य एकत्र नांदावेत म्हणून बाह्य उपचारांची गरजच का भासावी?? ही तर प्रत्येक सदस्याची जबाबदारी आहे. घराच्या उंबऱ्याच्या आत प्रत्येकाला सुरक्षित, समाधानी वाटायला हवं. आणि त्यासाठी प्रत्येकाने समान प्रयत्न करायला हवेत. आज कुटुंब पद्धती जपणं ही समाजाची, काळाची सर्वात महत्त्वाची गरज आहे. काय?? पटतंय ना!
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

