जीवन खूप Easy होऊन जाते, जेव्हा काही लोकांमुळे मनातला गुंता सुटू लागतो.
अपर्णा कुलकर्णी
कॉलेजगॅप नंतर तब्बल बारा वर्षांनी चित्रा काहीतरी शिकण्यासाठी बाहेर पडली होती. खरतर तिच्या मुलाचे शिक्षण सुरू झाले होते त्यासाठी तिला मुलाकडे,त्याच्या शिक्षणाकडे पूर्ण लक्ष द्यायचे होते पण दुर्दैवाने अशा काही गोष्टी घडल्या की आता मुलासोबत तिलाही नव्याने शिक्षण सुरू करावे लागले होते. चित्राने डिग्री मिळवली होती पण आता काळानुसार शिक्षण बदलले होते आणि नोकरीच्या पद्धती सुद्धा. त्यामुळे नवीन काहीतरी शिकल्याशीवाय काहीतरी करता येणे शक्य नव्हते.
पण आता ते कॉलेज लाईफ, ती धमाल मस्ती कधी अनुभवू शकणार नाही असेच चित्राने ठाम ठरवून टाकले होते मनाशी. त्यामुळेच तीन ते सहा महिन्यांचा एखादा कोर्स करून जॉब करावा या हेतूने तिने अकाउंटिंगसाठी एडमिशन घेतले होते. कॉलेजच्या पहिल्या दिवशी जसे दडपण आले होते तसेच आताही आलेच होते. पण शाळेत पाठवताना मुलाची जशी समजूत घातली होती तसेच आताही तिने स्वतःच्या मनाला समजावले होते.
आज पहिलाच दिवस छान लक्ष देऊन अभ्यास करायचा तिने ठरवले होते. ती क्लाससाठी गेली तर काही मुले कॉम्प्युटर लॅबमध्ये दंगा मस्ती करत होते, हिच्याकडे सर्वांनी क्षणभर पाहिले आणि पुन्हा बोलण्यात मग्न झाले.
तिला आधीपासूनच अवघडल्यासारखे झाले होते त्यात भरच पडली. काही दिवस निघून गेले. मुलींसोबत छान गप्पा सुरू झाल्या होत्या पण तरीही अवघडलेपणा होताच त्यांच्या सोबत पण वावरण्यात. क्लास मधल्या एका मुलाने हे चांगलेच नोटीस केले होते. एके दिवशी क्लास संपल्यावर त्याने चित्रशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याला बघून तो अनोळखी असल्यासारखे चित्राने तिथून पळ काढला. काही दिवसांनी चित्रा घरी जात असताना अचानक तिचा पाय मुरगळला आणि ती रस्त्यावरच बसली. मागून तो मुलगा येतच होता त्याने पाहिले आणि गाडी थांबवून उतरला आणि तिला आधार देत उठवण्याचा प्रयत्न केला.
चित्रा त्याच्यावर खूप ओरडली आणि मदतीची गरज नाही म्हणून उठण्याचा प्रयत्न करू लागली पण पुन्हा तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. त्यावेळी तो मुलगा म्हणाला गरज नाही ना तुम्हाला मदतीची मग उठा आणि घरी जा. पण मुरगळलेल्या पायावर पुन्हा पडल्याने आता चित्रा रडायला लागली.
तेंव्हा त्याने हाताला धरून तिला उठवले आणि जवळच असलेल्या बाकड्यावर बसवले. तिच्या पायाला जरा वाकडे करून हाडे मोडून तिचा पाय बरा केला आणि म्हणाला, मी धीरज.तुम्ही मला ओळखत नाही आणि मी तुम्हाला कारण तुम्ही कधीच कोणाशी ओळख करून घेण्याचा प्रयत्न केला नाही. क्लास मधल्या मुलींशी सुधा तुम्ही खूप अंतर ठेवून वागता. मी स्वतःहून ओळख करून घेण्यासाठी आलो होतो पण तुम्ही निघून गेलात.
मला तुमच्या सारख्या दोन बहिणी आहेत. मी तुमच्याशी बोलयाला आलो होतो ते तुमचा अलिप्तपणा दूर करायला पण तेंव्हाही तुमची तयारी नव्हती आणि आजही नाही. क्लासमधलाच काय कोणताही मुलगा एखाद्या मुलीशी बोलायला लागला म्हणजे तो त्याच विशिष्ठ हेतूने बोलायला येतो असे नाही ताई. तुम्ही टेन्शन, तणावाखाली आहात ते सहज कळतंय आम्हाला. पण तुम्ही बोलत नाही त्यामुळे तुमच्या अडचणी दूर करता येत नाहीत इतकंच. हरकत नाही तुम्हाला सांगायचे नसेल तर नका सांगू पण आपल्या ग्रुपमधे सगळ्यांशी हसून खेळून रहात जा खूप भारी वाटेल तुम्हाला.
धीरज निघून गेला पण बराच वेळ चित्रा त्याच्या बोलण्याचा विचार करत होती. दुसऱ्या दिवसापासून चित्रा त्यांच्याच सोबत त्यांच्यातली एक होऊन गेली आणि खूप मस्ती करायला लागली. काहीच दिवसात तिच्या वागण्या बोलण्यात खूप सकारात्मक बदल झाला. तिला हसताना पाहून तिच्या पूर्ण फ्रेंड सर्कलला खूप छान वाटले. थोड्याच दिवसात सगळ्यांची इतकी घट्ट मैत्री झाली की एकमेकांशिवाय रहाणे कठीण होऊन गेले. सगळेच खऱ्या मैत्रीला जागणारे होते.
एकदा चित्राने सगळ्यांनाच घरी नाश्ता करण्यासाठी बोलावले तेंव्हा धीरज आणि चित्राच्या मुलाची म्हणजेच चेतनची एकमेकांसोबत खूपच गट्टी जमली. धीरज आणि मानसी म्हणजेच चित्राचे मित्र तिला खूपच समजून घेत होते. त्या दोघांनीही चीत्राच्या सुरवतीच्या तुटक वागण्याचे कारण विचारले तेंव्हा ती म्हणाली चेतन चार वर्षांचा असताना माझा नवरा हरीश अपघातात गेला आणि आम्ही रस्त्यावर आलो. हरीशला फक्त एक भाऊ होता त्यानेच घराबाहेर काढले होते.
माहेरचा तसा मला काही आधार नव्हता. चेतानला सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर पडली. हरीशच्या कंपनीतून जे काही पैसे मिळाले त्यात हे घर घेतले पण रोजचे भागवण्यासाठी काय करायचं हा प्रश्न होताच. घरात सगळेच जुन्या विचारांचे होते. माझा नवरा गेला म्हणजे आता मला पुन्हा नव्याने काही करण्याची म्हणजेच हसण्या, बोलण्याची मुभाच नाही अशी बंधने लादली गेली. मी जगण्याच्या लायकीची नाही असाच समज करून दिला होता आणि मीही विरोध करून थकले त्यामुळे तो समज स्वीकारून घेतला.
पण पोटा पाण्यासाठी काहीतरी करावे,शिकावे म्हणून क्लास करायला लागले. कॉलेज लाईफ परत जगण्याची किंवा अनुभवण्याची इच्छा नव्हती कारण हरीश आणि माझ्या नात्याला कॉलेज मध्येच सुरुवात झाली होती. त्याच आठवणी जगू देत नव्हत्या त्यामुळेच कोणाशी बोलयचे नाही कोणात मिसळायचे नाही असे मी ठरवले आणि तशीच वागायला लागले. पण तुम्हा सगळ्यांमध्ये मिसळून, तुमच्यात राहून मला हलके वाटायला लागले, मनावरचा ताण कमी झाला आणि मनातला गुंता सुटायला लागला.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

