कुणापासून मदत मिळेल ही अपेक्षा ठेवून अजिबात जगू नका.
मेराज बागवान
एकमेकांना मदत करणे हे आपल्याकडील संस्कार आहेत.पण आज परिस्थिती अशी नाही.’मदत करणे’ हे आज प्रत्येकाच्या संस्कारात नाही.जो तो प्रथम आपलं बघतो आणि मग उरलं सुरलं तर मदत वगैरे.मदत करणाऱ्या व्यक्ती नाहीत असे अजिबात नाही.निस्वार्थी मदत करणारे देखील आहेत अजूनही ह्या जगात.
पण आजकाल ह्यांच्यापेक्षा मदत करणे झिडकारणारेच जास्त आहेत.काही जण मदत करतात पण काहीतरी अपेक्षा ठेवूनच.काही जण तुम्हाला मदत करतील.पण दुसऱ्याच क्षणी तुमच्याकडे काहीतरी मागतील.त्यामुळे आज अशी परिस्थिती आली आहे की , कुणापासून मदत मिळेल ही अपेक्षाच ठेवणे बंद करणे जरुरीचे आहे.
आजचे जग धकाधकीचे झाले आहे.जो तो आपल्या आपल्या आयुष्यात अगदी मग्न.मग्न की स्वतःमध्येच गुंग माहीत नाही.आजची स्पर्धा,पैशांची हाव, बेरोजगारी,महागाई आणि वाढत्या जबाबदाऱ्या ह्या गोष्टी देखील माणसाला एक प्रकारे अगदी ‘व्यावहारिक’ बनवत आहेत.आणि यामुळेच कोणी कोणाला मदत करेल याची शाश्वती आज राहिलेली नाही.
म्हणून जेव्हा तुम्ही अडचणीत असाल ,जेव्हा कधी तुम्हाला मदतीची गरज असेल तेव्हा कोणी येऊन तुम्हाला मदत करेल,ह्यातून बाहेर काढेल अशी अपेक्षा मुळीच ठेवू नका.आणि ह्यात वाईट वाटण्यासारखे देखील काही नाही.उलट तुम्ही स्वतःच ती समस्या सोडवू शकतात असा दृष्टिकोन बाळगा.
एक महिला रस्त्यात पार्किंग मध्येय लावलेली तिची स्कुटी बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होती.सर्वत्र गाड्यांची गर्दी झाली होती.त्यामुळे तिची गाडी बाहेर काढणे तिला थोडे अवघड जात होते.पण ती स्वतःच प्रयत्न करीत होती.आजूबाजूला एक दोन पुरुष मंडळी होती,जी निवांत उभी होती,फोन सोबत खेळत.पण ती काही स्वतःहून मदत करायला पुढे आली नाहीत.
तिथेच समोर ‘लिंबू पाणी’ साठीतील विक्रेता आपला गाडा घेऊन उभा होता.तो हे सर्व दृश्य पाहत होता.गाडी काही अजून बाहेर निघाली नव्हती.मग थोड्या वेळाने तो विक्रेता स्वतःचे काम सोडून आला आणि त्याने त्या महिलेला गाडी बाहेर काढून दिली.महिलेने त्या व्यक्तीचे आभार मानले.
ही झाली एक छोटी गोष्ट.असे अनेक प्रसंग येतात जिथे तुम्हाला अशी माणसे भेटीतील जी तुम्हाला मदत करू शकतात पण तरी देखील करीत नाही.आणि काही अशीही माणसे भेटतील जी मदत करू शकत नाहीत पण तरी देखील तुमची अडचण समजून तुम्हाला शेवटी काहीही करून मदत करतील.म्हणूनच कोणाकडून मदत मिळेल ही अपेक्षा कधीच ठेवू नका.
तुम्ही कोणत्याही अडचणीत जेव्हा असाल तेव्हा स्वतः प्रथम विचार करा.मी ही समस्या कशी सोडवू शकेल,मार्ग काय काय आहेत ह्यावर विचार करा आणि मग तशी कृती करा.काही जण नेहमी इतरांकडून अपेक्षा ठेवतात की ते मला मदत करतील.जसे की ,मला आर्थिक अडचण आहे,मग हा माझा मोठा मित्र आहे ना श्रीमंत तो नक्की मदत करेल.पण कित्येकदा मदत मिळत नाही.असेच अनेकजण काही अडचणी, अपयश आले की विचार करीत बसतात की कोणीतरी येईल आणि मला ह्यातून बाहेर काढेल.पण ही मानसिकता कितपत योग्य आहे?
नियती ,देव काही तरी घटना,अडचणी ,गोष्टी तुमच्या आयुष्यात काही तरी कारणास्तव घडवून आणत असतो.तुमची परीक्षा घेत असतो.प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही कसे वागतात याची ती परीक्षा असते.पण अनेकजण हतबल होतात. हात-पाय गाळून बसतात आणि देवच मदत करेल अशी अपेक्षा ठेवतात.पण देव म्हणत असतो,’तू प्रथम काहीतरी प्रयत्न तर कर ‘ .प्रयत्नाशिवाय काहीच शक्य नसते.म्हणून कोणाच्या मदतीवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतः प्रयत्न करा.
समस्या आहे म्हणून उगाच भावनिक तर अजिबात होऊ नका.भेटेल त्याच्याकडे आपले रडगाणे गाऊ नका.जर तुम्हाला अशी सवय असेल तर कृपया सर्वात प्रथम ती मोडून टाका.तुम्ही किती जरी रडलात तरी तुम्हाला मदत मिळेलच असे नाही.उलट तुम्ही एक प्रकारे इतरांसाठी मस्करीचा विषय होऊन जाल.तुमची समस्या प्रत्येकाकडे मांडण्याऐवजी एका अशा व्यक्तीकडे मांडा जी खरेच विश्वासू असेल,जी तुम्हाला मदत करू शकेलच असे नाही,पण तुमचे म्हणने ऐकून किमान एक प्रकारचा मानसिक आधार देईल जो तुम्हाला काहीतरी मार्ग दाखवेल.
तुम्ही अनेकांना मदत करीत असाल,पण तुम्हाला मदत मिळेलच ही अपेक्षा अजिबात ठेवू नका.तुम्ही किती जरी इतरांना मदत करीत असाल तरी इतरजण तसेच असतात असे नाही.त्यामुळे प्रत्येक गोष्ट, समस्या, अडचण प्रथम स्वतःच्या हिमतीवर सोडविण्याचा प्रयत्न करा आणि शेवटी काहिच हाथी नाही लागले तर प्रामाणिकपणे मदत मागा.कोणी मदत केली तर आभार जरूर माना आणि कोणी मदत जरी नाही केली तरी वाईट वाटून घेऊ नका.
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा,’कोण कधी कुठे कसा उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.’ आणि हे जरी खरे असले तरी,’कोणाचं कोणावाचून काहीच कधीच अडत नाही,थांबत नाही’ हे ही तितकेच खरे आहे.
त्यामुळे प्रत्येक बाबतीत आत्मनिर्भर व्हायला शिका.इतरांच्या मदतीची नेहमी अपेक्षा ठेवू नका.एक प्रकारची मानसिक शांतता लाभेल.
तुम्ही तुमचे कर्म करीत राहा,बाकी नियती आणि देव पाहून घेतील,त्यांच्या दरबारी योग्यच न्यायनिवाडा असतो.विश्वास ठेवा.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


निर्भय व्हायच कसं. हे सारे अनुभवता कसं येईल याचं थोडक्यात मार्गदर्शन.
लेख खुप छान आहे