इतरांच्या नजरेत आपण कोण आहोत याने काहीच फरक पडता कामा नये.
हर्षदा पिंपळे
“अगं आय डोन्ट केअर हं….हो,मला काही वाटत नाही. मला खरचं काहीच फरक पडत नाही. माझ्यासाठी ती एकच व्यक्ती महत्त्वाची नाही. त्यापेक्षा कितीतरी अधिक गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत.तिने नेहमी मला त्रासच दिला.मी का तिच्यासाठी काही करायचं ?मी का चांगलं वागायचं नेहमी ?” राधा आईला म्हणाली.
“बाळा ,असं नाही बोलायचं.आत्या आहे नं तुझी.असं बोलू नये.तिला काय वाटेल ? आणि कुणी ऐकलं तर…लोक काय बोलतील ?सगळ्यांना माहीत आहे, तु किती गुणी मुलगी आहे. त्यांनी तुझं असं वागणं पाहिलं तर काय वाटेल त्यांना..? त्यांच्या नजरेत तरी अशी वाईट होऊ नकोस.” आई राधाला म्हणाली.
“आई,ती आत्या असली म्हणून काय झालं?ती कधीच नीट बोलली नाही. तिच्याशी तु मला नीट बोलायला सांगतेस का?मी नाही बोलणार गं.आणि हो,लोकांच्या नजरेत मी वाईट ठरत असेल तर ठरूदे.त्याने मला फरक पडत नाही.कारण,माझं चुकलच नाही त्यामुळे मी माझ्या नजरेत तरी अजूनही चांगलीच आहे.आणि म्हणूनच मला इतरांच्या नजरेत मी कशी असेन नी कशी नाही याने फरक पडत नाही. मला माझ्या आयुष्याचं पडलं आहे. मला स्वतःशी प्रामाणिक राहायचं आहे. बाकी, तुला काय बोलायचं ते बोल.”
राधा म्हणाली.
यावर राधाची आई गप्प बसली.कारण,तिला या गोष्टी पटल्या होत्या.
आपल्याही आयुष्यात असे बरेच लोक असतात. ज्यांच्या नजरेत चांगलं राहण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातात. भले,आतून स्वतः चांगले/वाईट असो,इतरांच्या नजरेत चांगलं दिसावं म्हणून बरचं काही केलं जातं.आपल्याला काय करायचं आणि काय नाही ते आपणच ठरवायचं.
तर,आपल्या आयुष्यात आपण माणसांना खूप महत्त्व दिलं आहे.आयुष्यात माणसांचा वावर हा कायम असतो.रोजच आपण माणसांभोवती वावरत असतो.कुटुंब असो,कामाचं ठिकाण असो ,आपण कायमच माणसांच्या सहवासात असतो.आणि नेहमीच आपण या माणसांचा खूप खोलवर जाऊन विचार करत असतो.प्रत्येक गोष्टीत त्या माणसांचा विचार करत राहतो.थोडक्यात, या माणसांना काय वाटेल, कसं वाटेल याबद्दल खूप विचार करण्यातच आपला अर्धा वेळ खर्च होतो.आपण आपल्या आयुष्याचा आपल्या पद्धतीने विचारच करत नाही.आपल्याला सतत दुसरे काय म्हणतील किंवा त्यांना काय वाटेल याची चिंता सतावत असते.
इतरांच्या नजरेत आपली इमेज काय आहे या
गोष्टीने अनेकदा खूप फरक पडत असतो.आपण अनेकदा स्वभावाने कितीही चांगले असलो तरीही कित्येकांना ते पटत नाही.कित्येकांच्या नजरेत आपण वाईट ते वाईटच असतो.आणि इतरांच्या नजरेत आपण वाईट आहोत हे आपल्याला सहन होत नाही.कितीही चांगलं वागून आपण इतरांच्या नजरेत वाईटच ठरतो हे मनाला कुठेतरी सलत राहतं.आणि त्यामुळे आपण इतरांच्या नजरेत चांगलं होण्यासाठी प्रयत्न करत राहतो.धडपडत राहतो.
पण आपल्याला या गोष्टीचा इतका फरक का पडतो ?
त्यापेक्षा आपण स्वतःच्या नजरेत कोण आहोत याचा विचार करायला हवा. त्याने आपल्याला फरक पडायला हवा.कारण आपण जगाशी खोटं बोलतो पण,खरं काय आहे ते स्वतःला मात्र नक्कीच माहीत असतं.त्यामुळे इतरांच्या नजरेत आपण कोण आहोत यापेक्षा स्वतःच्या नजरेत कोण आहोत हे पाहणं आवश्यक आहे.
अनेकदा आपण स्वतःच्या नजरेत फार वाईट असतो.जगाला दाखवतो एक आणि करतो एक अशी आपली अवस्था असते.पण,आपण जर स्वतःच्या नजरेत प्रामाणिक असू ,खरे असू तर इतरांच्या नजरेत आपण कोण आहोत हे जाणून घेण्याची काही आवश्यकता नाही.आपण प्रामाणिक आहोत हे आपल्याला माहित असतं.आणि आपण प्रामाणिक नाही हेही आपल्याला चांगलच माहीत असतं.
त्यामुळे इतरांच्या नजरेपेक्षा स्वतःच्या नजरेला आधी विचारात घ्यायला हवं.आपण आपल्या मतावर ठाम राहायला हवं.(जर,स्वतःच्या नजरेत तितकेच प्रामाणिक/खरे असू)तर,इतरांच्या नजरेत आपण कोण आहोत याने काहीच फरक पडता कामा नये.
नेहमी स्वतःच्या नजरेत सुंदर बनण्याचा प्रयत्न करा.(स्वतःची इमेज स्वतःसाठी कशी आहे ते जाणून घ्या. ते जास्त महत्त्वाचं आहे.)
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


Mst. I need your help.