Skip to content

ही १२ लक्षणे सांगतील की तुम्हाला मानसिक शांततेची नितांत गरज आहे.

ही १२ लक्षणे सांगतील की तुम्हाला मानसिक शांततेची नितांत गरज आहे.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे आपलं शरीर आपल्या आत काही दूषित, काहीही चुकीचं, खराब साठवून ठेवत नाही. म्हणून तर आपल्या खाण्यात काही वर खाली झालं तर आपलं पोट बिघडत, वातावरणात थंडावा आला तर आपल्याला सर्दी, ताप येतो. आपलं शरीर आत काहीही बिघाड झाला तर लगेच बाहेर त्याची लक्षण दाखवायला सुरुवात करते.

कोणतीही गोष्टी आत जास्त काळ दाबून ठेवता येत नाही, बाहेर आपल्या शरीरावर त्याचे परिणाम दिसतातच. ज्याला आपण लक्षण अस म्हणतो. ज्यातून आपल्याला समजत की आता आपल्याला उपचार घेणं, डॉक्टरकडे जाण किंवा शरीराला आराम देणं गरजेचं आहे. एकसारखं काम केलं की शरीर थकत, आपल्यामध्ये नंतर काहीही करायचे त्राण उरत नाही. तेव्हा आपल्याला लक्षात येत की आता थोडा वेळ विश्रांती घेतली पाहिजे, थोडी झोप काढली पाहिजे.

ही शरीराची जशी यंत्रणा आहे तसच आपलं मन आहे. आपल्या मनातदेखील जर काही उलथापालथ होत असेल तर, काही गोंधळ माजला असेल, आपण मानसिकदृष्ट्या अस्थिर किंवा थकलेले असू तर त्याची लक्षणं दिसून येतात आणि ही लक्षणं आपल्या वागण्याबोलण्यातून दिसून येतात. बऱ्याचदा यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. ज्यातून आपलाच त्रास नंतर वाढतो. काही वेळा आपल्याला समजत देखील नाही की खरच आपल्याला मानसिक शांततेची गरज आहे. कारण आपण तसा विचारच केलेला नसतो. पण लक्षण जाणवत राहतात, अशीच काही १२लक्षणं आहेत जी दाखवून देतात की आपल्याला मानसिक शांतता हवी आहे.

१. अगदी बारीक सारीक, छोट्या छोट्या गोष्टींवर देखील रागावणे: बऱ्याचदा अस होत की काहीही कारण नसताना आपण चटकन रागावतो, समोरच्यावर ओरडतो. गोष्ट तशी घडलेलीच नसते. पण आपल्या प्रतिक्रया मात्र तीव्र स्वरूपाच्या असतात. सतत किरकिर, राग उफाळून येणे, चिडणे या सर्व गोष्टी अतिरिक्त ताणातून आलेल्या असतात. डोक्यात कसली ना कसली चिंता चालू असते, मग ती कामाची असेल, घराची असेल. ही चिंता, ताण जेव्हा असह्य होतो तेव्हा आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर देखील किरकिरे होतो.

२. निर्णय घेता येत नाहीत: जेव्हा आपण मानसिकदृष्ट्या थकतो तेव्हा त्याचा बाकीच्या गोष्टींवर परिणाम होतोच. आपल्या ज्या बोधनिक क्षमता असतात जसे की स्मरण शक्ती यावर त्याचा परिणाम होतो. तसच आपल्याला एखाद्या प्रसंगात निर्णय घेण्यात पण अडचणी येतात. नेमक काय केलं पाहिजे हे समजत नाही. अश्यावेळी आपल्याला ब्रेक घेण्याची गरज असते.

३. एकप्रकारचा सुस्तपणा येतो: खूप परिश्रम केल्यावर फक्त शरीरचं थकत अस नाही. आपल्या मनाचं देखील तसच आहे. एखाद्या गोष्टीचा अतिविचार करणे, सारख्या त्याच त्याच गोष्टी मनात घोळवत बसणे, कोणत्यातरी दुःखात स्वतः ला बुडवून घेणे या गोष्टी आपल्याला मानसिकदृष्ट्या सुस्तावून टाकतात. Mental fatigue येऊ लागतो. त्यामुळे दिलेली काम करता न येणे, अर्धवट पडणे अश्या गोष्टी होतात.

४. सतत आजारी पडणे: अस होत की ना की आपण सारखे आजारी पडतो पण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा त्यांना मात्र काही जाणवत नाही जे आजारी पडण्याचं कारण आहे. ते समजणार देखील नसत कारण आपण जे आजारी पडतो ते शरीरात काही कमी जास्त झालं म्हणून नाही तर मनात काहीतरी गोंधळ झाला आहे म्हणून. आपण मानसिक दृष्ट्या आजारी असतो ज्याचे परिणाम आपल्या शरीरावर दिसतात. यालाच मनोकायिक psychosomatic disorder असं म्हटल जात. यात मानसिक त्रासाची लक्षण शरीरावर दिसून येतात.

५. झोपेत अडचणी येणे: मानसिक त्रासाचं सर्वात मोठा परिणाम जर कश्यावर पडत असेल तर ती आहे झोप आणि भूक. अतिरिक्त प्रमाणात केली जाणारी चिंता माणसाला झोपू देत नाही. कारण झोपायला अंग टेकल की डोक्यात विचार चक्र सुरू होत. त्यामुळे बऱ्याच जणांना झोपेचा त्रास जाणवतो. कितीतरी वेळ झोप लागत नाही. किंवा लागली तरी मधे मधे जाग येत राहते. यातून दुसऱ्या दिवसावर पण परिणाम होतो. गोष्टींमध्ये लक्ष लागत नाही. याउलट काही जणांना सारखी झोप लागते. दिवस दिवस भर झोपून राहतात. झोपच चक्र बिघडण हे दाखवून देत की आपल्याला मानसिक शांतता, आराम हवा आहे.

६. भुकेच्या सवयी बदलतात: हे एक प्रमुख लक्षण आहे. जेव्हा आपण मानसिक दृष्ट्या थकतो, तेव्हा त्याच्या आपल्या भूकेवर देखील परिणाम होतो. अजिबात भूक न लागणे, पोट भरलेलं असूनदेखील पुन्हा खात राहणे यासारख्या गोष्टी होतात. ज्यातून बुलेमिया सारखे आजार होण्याची पण शक्यता असते.

७. सतत अस्वस्थता जाणवते: आपल्या मनाची चलबिचल होण, सारखं अस्वस्थ वाटत राहण हे दाखवत असतं की आपल्याला मानसिक विश्रांतीची गरज आहे. कारण यातून आपलं कश्यातच लक्ष लागत नाही.

८. उत्साह राहत नाही: कोणतीही गोष्ट करायला जो एक उत्साह, प्रेरणा लागते तोच राहत नाही. कोणतही काम करायची इच्छा होत नाही. फक्त करायचं म्हणून केल्याने कामामध्ये असलेला प्रभावीपणा निघून जातो.

९. नात्यांवर परिणाम होतो: जेव्हा आपण मानसिकदृष्ट्या थकतो, मन भरल्यासारखं होत तेव्हा बरेचदा स्वतःला एकटे पाडतो. कुटुंब, मित्र परिवार यामध्ये मिसळणे कमी होते, आणि नातेसंबंध दुरावतात.

१०. काहीही आवडेनास होत: ज्या गोष्टी पहिल्यांदा आपल्याला आनंद देत असतात, ज्यातून आपल्याला आनंद मिळत असतो, समाधान मिळत असत त्यादेखील आता आवडत नाहीत. मग ते बाहेर फिरायाला जाणं असेल, आपले काहीतरी छंद असतील, आवडीचा एखादा पदार्थ असेल. कशातच रस राहत नाही.

११. मनस्थिती बदलत राहते: आपला मूड स्थिर नसतो. आता आनंदी असू तर लगेच उदास पण होतो. कारण नसताना चटकन राग पण येतो, रडू येते. हे कश्याने होत आहे हे देखील बऱ्याचदा समजत नाही.

१२. नकारात्मक विचार: डोक्यात नकारात्मक विचार येणे, स्वतः वर स्वतःच्या क्षमतांवर अविश्वास दाखवणे, निराश भाव ही सर्व लक्षण पण दाखवून देतात की आपल्याला यावर काहीतरी उपाय केले पाहिजेत.

जर आरोग्य चांगल्या पद्धतीने जपायचे असेल तर फक्त शरीर नाही मनाकडे पण लक्ष द्यावे लागते. म्हणूनच अश्या
लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यावर वेळीच इलाज केला पाहिजे.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

7 thoughts on “ही १२ लक्षणे सांगतील की तुम्हाला मानसिक शांततेची नितांत गरज आहे.”

  1. Sandip j. Mandlik

    100% रास्त…. मानसिक आणि शारीरिक थकवा हा खरोखर एखाद्या भयानक व्याधीपेक्षा महाभयानक असतो…. आपण नमूद केलेली सगळी लक्षण तंतोतंत खरी आहेत…. खूप सगळी विस्कटलेली लक्षण एकत्रपणे मांडलीत आपण….. धन्यवाद 🙏🏻

  2. अतिशय उत्तम लेख आहे उपयुक्त माहिती दिली आहे समजा अशा व्यक्ती असतील तर त्यांना कुठे रेफरल करावं दुसरे त्या कौन्सिलगं चार्ज किती असणार वेळ पत्ता

  3. माया सोनार

    ,खरोखर अतिशय सुंदर लेख आहे!

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!