सतत तक्रार करणारी व्यक्ती कोणाशीही स्नेहाचे संबंध कधीच प्रस्थापित करू शकत नाही.
मेराज बागवान
तक्रार ,तक्रारी म्हणजे तरी काय असतं बर? सतत कोणत्यातरी गोष्टीवरून नाक मुरडणे, एखाद्या गोष्टीविषयी सतत नकारात्मक बोलणे.एक झाले की दुसरे…अशी तक्रारींची माळ सुरूच असते कायम.अशी अनेक माणसे तुम्हाला भेटतील.ज्यांच्याकडे तक्रारींचा पाढा कायम असतो.
तक्रारी असाव्यात.जिथे चुकीचे काही होत असेल तिथे तक्रार करणे गरजेचेच असते.पण सतत तक्रार करणे कितपत योग्य ठरते? मग अशा सतत तक्रार करणारी व्यक्ती कोणाशीच स्नेहाचे,चांगले संबंध प्रस्थापित करू शकत नाही.अशा व्यक्तीला सर्वजण टाळू पाहतात.आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यात देखील माणसे दुरावतात.
काही व्यक्तींना सतत असे बोलण्याची सवय असते की, ‘माझी मुलं माझं ऐकतच नाहीत,माझे आई-वडील मला नेहमी गृहीतच धरतात, ऑफिस मधील लोक मुद्दाम माझ्याशी फटकून वागतात,शेजारचे वारंवार त्रास देतात. ह्या गोष्टी काही समस्या नाहीत तर निव्वळ तक्रारी आहेत.पण अनेक व्यक्तींना असे म्हणण्याची जणू काही सवयच लागून गेलेली असते.
आणि त्यामुळे त्यांचा तो स्वभावच बनत जातो.पण मग ह्या व्यक्ती इतरांशी चांगले संबंध प्रस्थापित करू शकत नाहीत.इतराजण त्यांच्या बाबतीत विचार करतात की,’काय ह्याच नेहमीचंच आहे,कितीही केले तरी ह्याच्यासाठी कमीच आहे,समाधान नावाची गोष्टच नाही ह्याच्याकडे’. सतत तक्रार करणाऱ्या व्यक्तींविषयी अशी विचारसरणी होऊ लागते.आणि यामुळे लोक त्यांच्यापासून दूरच राहतात.
काही व्यक्ती म्हणत असतात.’माझं नशीबच खराब,माझी नोकरी खूप त्रासदायक,माझ्या कडे पैसाच टिकत नाही, माझ्याच बाबतीत नेहमी असं होतं, किती मी कष्ट करतो पण तरी देखील यश मिळत नाही,किती अभ्यास करूनही नंबर मागेच’. ह्या व्यक्ती नेहमी इतरांना दोष देत असतात.सतत इतर गोष्टींवर टाकून बोलत असतात.पण यामुळे ह्यांच्या संपर्कातील व्यक्ती ह्यांना वैतागुन जातात. आणि ह्यामुळे अशी माणसे कोणाशी स्नेहाचे संबंध टिकाऊ शकत नाहीत.
जेव्हा व्यक्ती सतत तक्रार करीत असते तेव्हा तिचा दृष्टिकोन पूर्णपणे नकारात्मक झालेला असतो.तुम्ही किती जरी ह्यांची समजूत काढत राहिलात तरी ते त्यांचेच म्हणणे,त्यांच्याच तक्रारी लावून धरतात.आणि यामुळे ते कोणाशी योग्य रित्या संवाद साधू शकत नाहीत आणि तुमचाच एक प्रकारे अपमान होत राहतो.मात्र ह्या लोकांना त्यांच्या तक्रारींपुढे जे बाकीचे काहिच दिसत नाही.
तक्रार करणे ही अशी मानसिकता आहे ज्यात माणूस कधीच मानसिक रित्या शांत नसतो.त्याचे चित्त थर्यावर नसते.आणि त्यामुळे जे वाटेल ते ती व्यक्ती बोलत राहते,बदबडत राहते. पण ह्यामुळे तक्रारी आहे तशाच राहतात आणि माणसे ह्यांच्यापासून दुरावतात.
लग्न झालेल्या व्यक्तींमध्ये तर हे प्रमाण बऱ्याचदा दिसते.कधी नवरा बायकोच्या सतत तक्रारी करीत असतो.’तू जेवण च चांगलं बनवत नाहीस,घरच नीट ठेवत नाही,सतत बाहेरच फिरत असतेस’.तर कधी बायको तक्रारी करीत असते.’मी आहे म्हणून टिकले,तुम्ही सतत मोबाईल ला च चिकटलेले असतात,मुलांकडे तुमचं लक्षच नाही, आम्हाला तुम्ही वेळच देत नाही’ इत्यादी इत्यादी.
ह्या नवरा-बायकोच्या तक्रारींमुळे नाती हळूहळू दुरावू लागतात.स्नेह कमी होऊ लागतो. आणि मग संबंध दुरावतात.
असे गणित आहे ह्या तक्रारींचे.ज्यामुळे माणूस माणसापासून दूर होऊ शकतो.नाती बिघडतात.कधी कधी तुटतात देखील.त्यामुळे प्रत्येकाने आज आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. आपला अमुल्य वेळ वायफळ तक्रारी करण्यामध्ये जात असतो.खरे तर त्यातून काहीच साध्य होत नसते.फक्त मानसिक शांतता ढळते.
म्हणून थोड्या तक्रारी बाजूला ठेवा.त्यातून मार्ग शोधा. ‘Solution’ वर भर द्या.म्हणजे तक्रारी दिसणारच नाहीत.अनेकदा होते काय की ,माणूस फक्त तक्रारींवर लक्ष केंद्रित करीत असतो आणि ‘मार्गांवर’ दुर्लक्ष करीत असतो.ह्यात पूर्ण वेळ खर्च होतो.आणि चांगले असे काही होत नाही मात्र व्यक्ती व्यक्तीपासून दूर जाते.म्हणून थोड्या तक्रारी बाजूला ठेवुयात आणि स्नेहाचे संबंध प्रस्थापित करूयात.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


प्रेरणादायी लेख.
खूप भारी लेख आहे. खरंच प्रत्येकाने यातून शिकले पाहिजे.
मी स्वतः तुमचे लेख वाचून माज्या स्वभावात खूप काही बदल करत आहे. कारण तुमचे लेख वाचल्यामुळे मला कळते कि मी माज्या जीवनात कितपत चुकीचे वागत आहे. आणि मला माज्या स्वभावात काय बदल करायचा आहे.खूप भारी लेख आहे खूपच छान.