Skip to content

हे १० प्रश्न तुमच्या जोडीदाराला विचारल्याशिवाय लग्न करू नका.

हे १० प्रश्न तुमच्या जोडीदाराला विचारल्याशिवाय लग्न करू नका.


सोनाली जे.


जोडीदार म्हणले की लाँग टर्म relationship आली. अगदी म्हणले की लाईफ लाँग तरी ही चालेल. कारण भारतासारख्या ठिकाणी लग्न हे एक संस्कार , पवित्र बंधन, कायदा , नातेवाईक , समाज याने ही एक बंधन आले. त्यामुळे सहजासहजी ते बंधन , ते नाते तोडले जात नाही. विभक्त ही फार कमी जोडपी जी अगदीच पटवून घेवू शकत नाहीत.

त्यामुळे लग्न करण्यापूर्वी खूप बारीक सारीक विचार करावा. आपला जोडीदार कसा पाहिजे हे आपले स्पष्ट मत पाहिजे. अपेक्षा काय आहेत हे clear असावे.

दोन भिन्न व्यक्तिमत्त्व एकत्र येताना खरे तर अनेक बारीक सारीक गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे. अर्थात परत इथे हा मुद्दा आला की भारतात लग्न हे वडीलधारी मंडळी ठरवितात. त्यांना विरोध खूप कमी लोक करू शकतात. त्यामुळे त्यांनी निवडलेले स्थळ हे त्यांच्या दृष्टीने योग्यच असते. त्यामुळे ते आहे तसे स्वीकारावे आणि टिकवून ठेवावे लागते.

पण असे आहे की ज्याच्या / जिच्या सोबत आयुष्य काढायचे आहे त्या आपल्या होणाऱ्या जोडीदारासोबत लग्नापूर्वी च काही गोष्टीबद्दल बोलले , काही मनात असणारे आणि गरजेचे प्रश्न विचारले तर आयुष्यात नंतर त्रास होणार नाहीत. पश्चात्ताप होणार नाहीत. किंवा एकमेकांवर दोषारोप केले जाणार नाहीत. वाद होणार नाहीत.

सगळ्यात महत्वाचे जोडीदारां सोबत आनंदी , उत्साही ,सुखी , समाधानी आणि शांततेचं असे सुंदर आयुष्य फुलवायचे असेल तर लग्नाआधी एकमेकांच्या मध्ये एक प्रकारचे बाउंडींग निर्माण होणे गरजेचे असते.एकमेकात transperancy असणे गरजेचे असते. एकमेकांवर विश्वास , एकमेकांचा आदर असणे आणि तो कायम टिकवून ठेवणे गरजेचे असते. शिवाय सुरक्षितता . नात्याची असेल की ते नाते टिकेल का नाही अशी भीती ,धागधुग असेल तर कायम मनात असुरक्षितता असते. असंतोष असतो. अपेक्षा ठेवल्या जातात. आयुष्य सुरळीत असावे अशी अपेक्षा प्रत्येकाची असते आणि त्यात चूक काहीच नसते. बायकोला नवऱ्याने अर्थ , धर्म , काम , मोक्ष या सर्व नियमांचे पालन करून सुख द्यावे ही प्रामाणिक इच्छा असणे यात गैर काहीच नाही. ती वास्तव अपेक्षा आहे.

सुखी संसार आणि जोडीदारासोबत खरेच सुंदर आयुष्याची सुंदर स्वप्ने सत्यात उतरवायची प्रत्येकाची इच्छा असते.परिपूर्ण आयुष्य जगताना एकमेकांची साथ खूप गरजेची असते. नाही तर सतत काही तरी राहिले , उणीव भासत राहते.

म्हणून हे १० प्रश्न तुमच्या जोडीदाराला विचारल्याशिवाय लग्न करू नका.

१. इच्छा .

जोडीदाराची खरेच लग्न करण्याची इच्छा आहे का ? हे नक्की विचारावे. याचे कारण म्हणजे बरेचवेळा असे होते की, जोडीदाराची लग्न करण्याची इच्छा नसते, किंवा अजून थोडे वर्ष, दिवसांनी लग्न करायचे असते.

मुले असोत अथवा मुली त्यांची काही ध्येय असतात. ती पूर्ण करण्याकरिता वेळ पाहिजे असतो. त्यामुळे लग्न करून बंधनात अडकण्याची तयारी नसते.

तर काहींना लग्न च करायचे नसते. पण घरचे मागे लागून जबरदस्तीने च त्यांची लग्न जमविण्याचा प्रयत्न करतात.

असे झाले तर जोडीदार लग्नानंतर कधीच खुश , आनंदी राहू शकत नाही. सतत चिडचिड , राग , किंवा अगदी त्याउलट शांत , कशातच सहभागी नसणार अशा वृत्तीचे असतात. त्यामुळे हे संसार सुखी , आनंदी, परिपूर्ण कधीच होवू शकत नाहीत.

२. अपेक्षा :

लग्न करण्यापूर्वी एकमेकांच्या अपेक्षा काय आहेत हे समजून घेणे गरजेचे असते.याचे कारण एखाद्या मुलाला लांब केस असलेली, चाफेकळी नाक असलेली , गालावर गोड खळी पडणारी , गोरीच , उंच , बारीक मुलगी पाहिजे असते.

तर एखाद्या मुलीला उंच मुलगा , तरतरीत , अगदी जिम ला जावून शरीर यष्टी तयार करणारा, कोणाला नाक तरतरीत , दाढी , मिशा असलेला तर कोणाला दाढी मिषा नसलेला पाहिजे असतो. ज्याची त्याची आवड , अपेक्षा असते त्याप्रमाणे दिसणं ही पाहिजे असते.

तर स्वभाव ही त्यात आला. कोणाला बोलकी , सगळ्यांच्या मिळून मिसळून राहणारी तर कोणाला शांत , कोणाच्या ही कडे जाणे येणे न ठेवणारी केवळ आपले घर आपण भले अशी वृत्ती असणारी . अशी जोडीदार मग स्त्री असो अथवा पुरुष जोडीदार कोणाची ही अपेक्षा असू शकते.

उदाहरण : पल्लवी सगळ्यांच्या मध्ये मिळून मिसळून , मित्र मैत्रिणी , ऑफिस मधले सगळ्यांच्या मध्ये खूप मिक्स व्हायची. त्यांच्या सोबत बाहेर जाणे , फोनवर संवाद , पिकनिक , जेवण अतिशय मोकळेपणे ती वावरत असे. मित्र मैत्रिणी वाढदिवस साजरा करणे . बाहेर जाणे. Gifts हे नित्याचे होते .

पण सासरी गेल्यानंतर तिचे असे सारखे बाहेर जाणे, फोनवर बोलणे, अशी gifts बघून नवरा आणि सासरची मंडळी यांस ते आवडत नसे तरी सुरुवातीला ते शांत होते. पण नंतर नंतर त्यावरून तिला बोलणे सुरू झाले. किंवा मग जाण्याची गरज आहे का ? सारखेच जातेस तू . बाहेरचं असते असे टोचून बोलणे सुरू झाले.

पल्लवी वर अचानक अशी ही बंधने वाटू लागली कारण आजपर्यंत माहेरी असताना मुक्तपणे वावरलेली ही पल्लवी अशी बंधने , सतत बोलणे , कधी जावू नको असे म्हणून तिला न पाठविणे त्रासदायक वाटू लागलं .
आणि यातून सासरी वाद ,नवऱ्याची कुरबुर सुरू झाली. आणि मग अगदी वेगळे राहणे. घटस्फोट इथे पर्यंत प्रकरण ताणले गेले.

त्यामुळे एकमेकांच्या अपेक्षा तर समजून घेणे महत्वाचे असतेच पण घरातल्यांच्याही अपेक्षा समजून घेणे गरजेचे असते.

एका कुटुंबातून दुसऱ्या कुटुंबात जाताना तिथल्या पद्धती , संस्कार , रीती रीवाज, अगदी धार्मिक गोष्टी, प्रथा काय आहेत. आणि त्या पूर्ण करण्याकरिता काय अपेक्षित आहे हे विचार ही महत्वाचे असतात.

३. आर्थिक स्थैर्य :

मुली बरेचवेळा लग्नानंतर , मुले झाल्यावर नोकरी करू शकत नाहीत. अशावेळी आपली आणि मुलांची जबाबदारी आपला जोडीदार उचलू शकेल का ? किंवा जरी स्त्री नोकरी करणारी असली तरी ही कुटुंबाचा आर्थिक भार नवरा उचलू शकेल का ? केवळ आजच्या पुरते मर्यादित नाही तर आयुष्यभर .पगार आणि इतर उत्पन्न किती? बचत किती ? शेती, घर अजून काही स्थावर , गुंतवणूक , भविष्य तरतूद या गोष्टी हि विचारुन घेणे गरजेचे असते.

तेवढी क्षमता एकमेकात आहे का ? कारण आजकाल नोकरी मध्ये स्थैर्य मिळणे अवघड आहे. अशावेळी स्त्री पुरुष दोघांनी ही कुटुंबाची जबाबदारी ही उचलली पाहिजे. त्याकरिता आधी पासून काही saving आहेत का? किंवा नंतर कायमस्वरूपी जबाबदाऱ्या पेलू शकतील का हे प्रश्न जरूर पडावेत आणि ते मोकळेपणे विचारून त्यावर समाधानकारक उत्तर असेल तर पुढे जावे.

४. व्यसन :

आजकाल स्वातंत्र्य हे नाव पुढे करून स्वैराचार वाढीस लागला आहे. मनाला वाटेल तसे करणे , वागणे यातच तरुण पिढीला भूषण वाटते.
दारू , सिगारेट ही तर अगदी परिचित व्यसने आहेत. पण त्याही पुढे जावून आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी , चैन करण्यासाठी चोरी , मारामारी, लुटालूट,ड्रग घेणे.
अशी अनेक व्यसने आहेत.

पुरुष , काय स्त्रिया काय आज आधुनिक आणि सोशल मीडिया , संगत यातून बिघडत आहेत. लग्नापूर्वी सगळे करून त्याची चटक लागलेली असते.तर काही वेळेस त्यातून पैसा मिळविणे हा हेतू असतो. तर कधी आपल्या शरीराचा व्यापार करून बाकी कष्ट न करता सहज पैसा , उंची वस्तू , अगदी घर असेल किंवा गरजेच्या वस्तू मिळवून सुखी राहायचे असे शॉर्ट कट मारणारे .. आणि अजून व्यसनाधीन होत जाणारी ही पिढी आहे.

म्हणून खरेच लग्नाच्या बेडीत अडकून पडण्यापूर्वी आपल्या जोडीदाराला स्पष्ट विचारा की अशी काही व्यसने आहेत का ?जी मुले मुली चांगली असतील त्यांना नक्कीच हा प्रश्न त्रासदायक ठरेल, वाईट वाटेल.

पण चांगल्या स्थळाला जर व्यसनाधीन स्थळ मिळाले तर आयुष्य बरबाद होईल . ते होवू नये याची काळजी म्हणून या गोष्टी स्पष्ट विचारणे . त्या व्यक्तीस , त्यांच्या घरातल्या सर्वांना, नातेवाईक , मित्र मैत्रिणी अजून जवळच्या व्यक्तींना विचारून खात्री करणे गरजेचे असते.

५. खान पान विषयी माहिती विचारा .

बरेचवेळा शाकाहारी व्यक्तींना शाकाहारी च जोडीदार पाहिजे असतो. मांसाहार करणारे असतील तर मांसाहारी पाहिजे.मग बायको ने घरी ही तसे मांसाहारी पदार्थ केले पाहिजेत ही अपेक्षा असते.

याचमुळे ही गोष्ट सुधा लग्नाआधी विचारणे गरजेचे. शाकाहारी व्यक्तीला जोडीदार मांसाहारी चालणार आहे का ? किंवा मांसाहारी व्यक्तीला शाकाहारी जोडीदार चालणार आहे का हे स्पष्ट विचारणे गरजेचे.

शिरीन अगदी साधी , शाकाहारी , कधी ही ड्रिंक्स माहिती नसलेली., पण कबीर कॉर्पोरेट ऑफिस मध्ये असल्याने त्यांच्या नेहमीच्या पार्टी , त्यात nonveg , ड्रिंक्स हे अगदी सर्रास घेतले जात. जरी घरी सगळे शाकाहारी होते तरी त्याला काही फरक पडत नव्हता.
आठवड्यातून दोन तीन दिवस तरी तो बाहेरच जेवण , ड्रिंक्स , पार्टी करून येत असे.शिरीन आणि कबीर lला मुलगी झाली आणि शिरीन अजूनच तिच्यात अडकत गेली. कबीर चे बाहेर जाणे जास्त वाढले . शिरीन चे आणि त्याचे वाद होवू लागले. तो तिला उलटे म्हणू लागला तू शोभत नाहीस मला. ड्रिंक्स नाही. Nonveg नाही. इतर मुलींच्या सारखी एकदम आकर्षक ही राहत नाही.

हे वारंवार घडू लागले तेव्हा शिरीन ही त्याच्या सोबत पार्टीज , ड्रिंक्स घेवू लागली. एन्जॉय करू लागली. घर मुलगी सोडून स्वतः कडे जास्त लक्ष देवू लागली. त्यातून व्हायचे तेच झाले ती एवढी बेफाम सुटली की मग कबीर समोर त्याचा मित्र प्रीतम तिच्याशी जवळीक करू लागला तरी कबीर ला लक्षात ही येत नाही कारण तो मस्त हवेत असायचा. आणि अचानक शिरीन प्रीतम सोबत निघून ही गेली.

तर याउलट ही होवू शकते की ही जबरदस्ती खाण्या पिण्याची सवय किंवा टोचणी यातून अजून वेगळे काही वाद , त्रास होण्याची शक्यता असते.

म्हणून लग्नापूर्वी या गोष्टी स्पष्ट विचारणे गरजेचं.

६. आधी कोणी एक्स होती का ? होता का ? काही रिलेशनशिप होते का ?

हे माहिती होणे गरजेचे असते कारण त्यावर लग्नाचा निर्णय घेणे ठरते. आणि जर आधी माहिती नसेल अचानक अशी माहिती समजली की आपल्या नवऱ्याची आधी कोणी होती तर तो मानसिक धक्का बसतो. त्यातून अविश्वास , insecurity निर्माण होते. आपल्यापासून ही गोष्ट लपविली याचे दुःख , त्रास ही होतो.

त्यात कधी ती भेटली , फोन , मेसेज आला तर आपला आपल्या नवऱ्यावर उगीचच संशय घेणे वाढते. मग त्यांच्यात अजून काही आहे हे संशय वाढत जातात.जे नवऱ्याच्या बाबतीत तेच बायको बाबत ही .

याचमुळे एकमेकांच्या आयुष्यात आधी कोणी होते का ? आणि असे काय कारण घडले की ते लग्न करू शकले नाहीत . हे जाणून घेणे ही महत्वाचे.

याखेरीज अजूनही तिच्या विषयी / त्याच्या विषयी काही भावना आहेत का? तसे असेल तर नक्की निर्णय घेण्यापूर्वी विचार करा. कारण लग्न झाल्यावर समजलें की अजून ही आधीच्या तिच्या किंवा त्याच्या विषयी काही आहे आणि ते पुढे ही जावू शकतील हे विचार मनात येवून पुढचा संसार डळमळू लागतो.

त्यामुळे हे स्पष्ट करा की त्या आधीच्या भावना नाहीत. आणि त्यांच्या सोबत कॉन्टॅक्ट ही नाहीत. किंवा जे असेल ते . स्पष्ट करा. म्हणजे लग्नापूर्वी त्यावर विचार होवून निर्णय घेता येतो.

७. शिक्षण :- राहणीमान :

हे सुधा महत्वाचे असते. कारण एकमेकांना साजेसे , शोभेल असे त्यांचे राहणीमान , वागणे , विचार , व्यवहार हे त्यातून व्यक्त होत असतात.

मिहिर एका corporate office मध्ये चांगल्या पदावर काम करणारा. पण कधीच त्याने स्वतः कडे लक्ष दिले नव्हते. त्याचे कपडे कसेही असत. त्याला काय शोभेल याचा ही विचार कधी केला नव्हता त्याने.
लग्नानंतर त्याच्या बायकोला मिहिका तिला मात्र असे वाटे की आपल्या नवऱ्याने व्यवस्थित राहिले पाहिजे. एवढ्या लोकात तो काम करतो. भेटतो बोलतो. त्याची personality अजून छान दिसण्यासाठी , त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव अजून छान पडण्यासाठी तिने खूप प्रयत्न केले. स्वतः त्याचे सगळे शॉपिंग करून , व्यवस्थित फिटिंग मधले, छान रंगसंगती जुळेल असे कपडे , छान असा दिवसभर वास राहील असा परफ्यूम, बेल्ट, पाकीट, बुट , socks सह .. त्याला मस्त हेअर स्टाइल..मिशी , असे त्याचा एकदम पालट करून टाकला. त्यामुळे मिहिर खरेच अजून जास्त confident झाला .. त्याचे व्यक्तिमत्त्व अजून जास्त प्रभावी झाले.

एक तर शिक्षण यातून विश्वास येतोच. आणि आपल्याला अनेक क्षेत्र कामा करिता उपलब्ध होतात. तर राहणीमान यातून व्यक्तिमत्व प्रभावी होत जाते.

आणि शिक्षण आणि राहणीमान जर एकमेकांना पूरक नसेल.
सुशिक्षित आणि संस्कारित नसेल तरीही विचार , वागणे यात खूप मोठा फरक पडतो .

८ . शारीरिक संबंधाची आवड , काही आजार आहेत का ? काही व्यंग आहेत का ?

या व्यतिरिक्त आजकाल स्त्री पुरुष संबंध जसे असतात तसे दोन पुरुष ही ठेवतात. काहींना दोन्ही ची आवड असते. असे काही आहे का ?

या शिवाय family planning करायचं आहे का ? पुढचे मुले होवू देणे अथवा न देणे हे विचारणे गरजेचे असते.

माझी एक मैत्रीण स्वतः कौन्सेलर आहे. नवरा ही चांगल्या IT company मध्ये पण लग्न करण्यापूर्वी दोघांनी ही एकमेकांना विचारले मुल होवू द्यायचे का नाही ? दोघांचे ही मत नाही असे होते. त्यांना कोणत्याही जबाबदारी मध्ये अडकायचे नाही. त्यांना त्यांचे आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगायचे, स्वच्छंद , मुक्त ,स्वतच्या आवडी निवडी जपत , छंद जपत मस्त जगत आहेत दोघे. एकमेकांना स्पेस ही छान देतात. भांडणे ही नाहीत. आणि खर्च त्याचे ताण ही नाहीत. पैसे कमावतात तसे खर्च ही करतात. आनंदी आहेत.

याशिवाय शारीरिक व्याधी , काही कमतरता आहेत का हे नक्की विचारा.

९. ध्येय :

जास्त महत्वाकांक्षा असेल, ध्येय असेल तर त्याच्या मागे जोडीदार आपल्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करेल. आणि ते लग्न टिकणार नाही. त्यामुळे ध्येय आणि वैवाहिक जीवन याची सांगड कशी घालणार ? हेविचरणे ही गरजेचे.

१०. घर , घरातील सदस्य , आणि त्यांचे स्वभाव ते कोणत्या परिस्थितीतून आले आहेत हे विचारणे गरजेचे असते.

जवळचे मित्र परिवार , मैत्रिणी :-

जवळचे मित्र मैत्रिणी कोण आहेत. त्यांच्या ओळखी ,फोन नंबर , घरातल्या सगळ्यांचे number विचारणे. जर सहज दिले तर समजून घ्यावे आत बाहेर असे वेगळे काही दाखवत नाही.

बरेचवेळा असे असते की जोडीदार खूप रिझर्व्ह आहे हे नंतर समजते. त्याचे मित्र , मैत्रिणी , किंवा त्याच्या इतर गोष्टी ही सांगत नाही. बऱ्याच गोष्टी लपवून ठेवत असतो. किंवा असे वाटते त्याला की हे सांगण्याची गरज नाही. त्यातून पुढे गैर समज वाढतात. की जोडीदाराला असे वाटते की आपल्याला विश्वासात घेत नाही अंधारात ठेवून गोष्टी करतो.

याशिवाय कोणत्या मित्र मैत्रिणींच्या संगतीत आहे हे त्यांच्या सोबत बोलून , भेटून नक्कीच समजते त्यामुळे मित्र मैत्रिणी ही कोण हे नक्की विचारणे गरजेचे असते.

असे अनेक मुद्दे आहेत की, एकमेकांचे स्वभाव कसे आहेत, आवडी निवडी काय आहेत, निसर्गरम्य ठिकाणी जाणे आवडते का? संगीत आवडते का?movies ? फिरण्याची आवड आहे का ? कारण एखाद्याला देश विदेश फिरण्याची, अगदी देशात ही विविध ठिकाणी जावून तिथले नावीन्य बघण्याची, निसर्ग बघण्याची आवड असते तर एखाद्याला घरात बसणे आवडते. त्यामुळे दुसऱ्या उत्साही जोडीदाराचा विरस होतो.

कोणते छंद आहेत. रंग कोणते आवडतात. कपडे कोणते आवडतात. हे अनेक बारीक सारीक प्रश्न पडून ते जाणून घेणे महत्वाचे असते. कारण एकमेकांच्या आवडी निवडी जुळणे ही महत्वाचे असते.

माझ्या मैत्रिणीने तिच्या मैत्रिणीचे लग्न ठरले तेव्हा तिला विचारले काय ग नवरा मंगळसूत्र घालणार ना ? तेव्हा तिची मैत्रीण म्हणाली नाही ते आम्ही घालून देणार. तेव्हा माझी मैत्रीण म्हणाली मला तरी असं नवरा पाहिजे जो स्वतः मला मंगळसूत्र घालेल. म्हणजे नवराच घालतो. पण आर्थिक खर्च करून ही.

यामागचा तिचा विचार असा होता की जो नवरा त्याच्या कर्तुत्वावर तिला सुरुवातीला मंगळसूत्र करू शकतो तेही त्याच्या हिमतीवर तो कायमच कर्तृत्ववान राहणार. आणि असाच नवरा तिला पाहिजे अशी तिची अट होती..

थोडक्यात प्रत्येकाचे दृष्टिकोन , विचार हे येणाऱ्या विविध अनुभव किंवा इतरांच्या अनुभवातून ठरत असतात.

पण काही basic गोष्टी या विचारणे गरजेचे असते. जात पात या गोष्टी आता तेवढ्या विचारात घेत नाहीत. पण त्यातून ही बरेचवेळा फरक पडतो. राहणीमान , खान पान बदल होत असतात. जुळवून घेणे कठीण जाते.

आयुष्य सुंदर आहे. त्यात जोडीदार निवडताना थोडे जागरूक राहून निवडा. कारण त्यावर तुमचे भवितव्य आणि संपूर्ण आयुष्य अवलंबून असते.

All the best


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!