आपल्या एका नकाराने समोरचा जेव्हा बदलतो, तेव्हा वाटतं ‘आपण एकटे असतो तेच बर असतं’.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
इतके दिवस मी या सर्वांच्या मनासारखं वागत होते, तेव्हा सर्व ठीक चालू होत, याच्या नजरेत मी चांगली होते. आता मला माझ्यासाठी काहीतरी करायचा विचार करते आहे, त्यासाठी धडपडत आहे, फक्त हे त्यांना पटत नाही म्हणून मी चुकीची झाले का? आता तूच सांग आई, घरातली सर्व काम करून, सांभाळून मला बाहेर जावं लागतं.
प्रत्येक वेळी माझ्याकडून सर्व काम होऊ शकतात का? जेव्हा माझ्याकडून सर्व काम होत होती तेव्हा यांना काही प्रोब्लेम नव्हता. माझ्या शिकण्याला विरोध नव्हता, की माझ्या बाहेर जाण्याला विरोध नव्हता. त्यांची अट काय की मी त्यांचं ऐकावं, त्यांच्या मनाप्रमाणे सर्व होत असेल तर ते सर्व मान्य करतील, नाहीतर मी काय आहे नावच ठेवायला. बर मी काही रोज अस करते अश्यातला भाग नाही.
कधीतरी माझ्याकडून काही राहून गेलं आणि त्यात मला यांनी समजून घ्यावं अशी मी अपेक्षा केली तर माझं काय चुकल तूच सांग. मागे एकदा मला जरा बाहेर जायची घाई होती, अग अर्जंट एक ऑर्डर पोचती करायची होती. त्यासाठी जाणं गरजेच होत. तेव्हढ्यातच साहिलनी सागितलं माझ्या शर्टला इस्त्री करून दे. आधी तरी सांगतील की नाही. पण नाही आयत्या वेळी सांगायचं. तरी मी सर्व आवरून निघाले होते,
खूप महत्त्वाचं काम म्हणून त्यांना इतकचं म्हटल की आजचा दिवस तुम्ही करून घ्या, मला घाई आहे. एक दिवस फक्त इस्त्री केली नाही म्हणून ते माझ्याशी पुढचे चार दिवस बोलले नाहीत. बोलण तरी कसलं? टोमणे ते! घरातल्या लोकांना तसच सोडून, काम अर्धवट टाकून बाहेरची काम महत्त्वाची वाटत. ते खूप गरजेचं आहे. आम्ही काय पाहून घेऊ. अस त्यांचं बोलण.
जेव्हापासून मी बाहेर जायला लागले आहे ना तेव्हापासून त्यांचं वागणच बदललं आहे अग. आता सर्व गोष्टी त्यांना हव्या तश्या होत नाहीत ना. आधी कसं सर्व हातात मिळायच. त्यांना काहीच करायला लागत नव्हत. आता स्वतःच्या अंगावर जरा काहीतरी पडू लागलं म्हणून अस वागत आहेत.
मला म्हणतात मी इतकं सर्व करत असताना तुला काय गरज आहे हे उपद्व्याप करायची? मी सांगतो तस कर, घर सांभाळ आणि आरामात रहा! अग पण मी काय हे सर्व फक्त पैश्यासाठी करते आहे का? मला माझ्यासाठी, स्वतःच्या आनंदासाठी काही करावस वाटलं तर यात माझी काय चूक आहे? मी आतापर्यंत यांच्या कोणत्याही गोष्टीला नकार दिला नाही, हवं तस वागले. आता काही गोष्टी माझ्याकडून होत नाहीत म्हणुन यांचं वागणं इतकं बदलाव. मी आयुष्यभर फक्त यांचच ऐकून तसच करायचं का? जानकी तळमळीने बोलत होती.
गोष्टच तशी झाली होती. जानकीच लग्न लवकरच झालं. सुरुवातीपासूनच घरात शिकवण होती, सासरी गेल्यावर सर्व सांभाळून घेऊन वागायचं, कोणाला दुखवायचं नाही, ते सांगतील ते ऐकायच. जानकी तशीच वागली. नवरा सांगेल ती तिच्यासाठी पूर्व दिशा होती. तिच्यामध्ये विचार करण्याची क्षमता नव्हती अस नाही. पण त्यावेळी वातावरणच तस होत.
आणि अस राहताना तिला पण काही वावग वाटलं नाही. संसारात पण ती हळू हळू रमली. नंतर मुल, त्यांचं संगोपन. त्यात वेळ जाऊ लागला. या सर्व स्वतःच्या हौशी पूर्ण करायचा कधी प्रश्नच आला नाही. मनाला पण ऐकून घ्यायची, त्यानुसार वागायची सवय लागली होती. आता मुल पण बऱ्यापैकी मोठी झाली होती. स्वतःच काम स्वतः करण्याइतपत ती शहाणी झाली होती.
त्यामुळे जानकीकडे घरातली वैगरे काम करून बराचसा वेळ उरत होता. इतक्या वर्षात तिला जे काही करायचं राहुन गेलं अस वाटत होत, लग्नाआधी ज्या काही गोष्टी तिने करायच्या ठरवल्या होत्या त्या आता करू अस तिने ठरवलं. हा निर्णय जेव्हा तिने नवऱ्याला सांगितला तेव्हा त्याला तो फार काही रुचला नाही. तरी मी सर्व सांभाळून करेन अस म्हटल्यावर त्याने कसातरी होकार दिला. पण यामुळे आपल्या मनासारख्या गोष्टी होत नाही हे दिसल्यावर मात्र त्याच वागणं बदललं. नीट बोलायच नाही, टोमणे मारायचे. या गोष्टीचं जानकीला खूप दुःख व्हायचं. सांगणार तरी कोणाला? म्हणून आज आईकडे येऊन ती हे सर्व बोलत होती.
अस आपल्या सर्वांच्याच बाबतीत कधी ना कधी तरी होतच. समोरच्याच ऐकून घेऊन आपण त्या माणसाला आपल्याला गृहीत धरायची इतकी सवय लावलेली असते की आपण जेव्हा त्यांना नंतर कधीतरी नकार देतो, त्यांचं ऐकत नाही तेव्हा त्यांचं वागणच बदलत. आपल्याला अस वाटून जातं की ही व्यक्ती आपल्या एका नकाराने जर अशी वागत असेल तर आपण एकट राहिलेलं काय वाईट आहे? कारण नात्यातून असा त्रास होत असेल तर मग नात कश्याला हवं?
पण इथे आपण पण विचार केला पाहिजे की समोरची व्यक्ती आपल्याला गृहीत धरेल अस आपण का वागलो? कोणत्याही नात्यात एकमेकांच्या सहमतीने वागणं, राहणं चांगलच असत. पण काही वेळा आपल्याला नाही पण म्हणता आल पाहिजे. आपण जर आपल्या मर्यादा तयार केल्या नाहीत तर पुढे आपल्यालाच त्रास होणार. म्हणून आधीच आपण काही गोष्टींसाठी नाही म्हणायला शिकलं पाहिजे.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


मग परत यांच्यासाठीच करत राहायचं का सगळ्या गोष्टी स्वतःसाठी नाही का
Khup Chan