Skip to content

कोणीतरी तुम्हाला पुन्हा भेटू इच्छित आहे ही भावना खूपच आनंद देणारी असते.

कोणीतरी तुम्हाला पुन्हा भेटू इच्छित आहे ही भावना खूपच आनंद देणारी असते.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


एकदा झाली चुकामूक, पण पुन्हा भेटूच आपण!

एक नश्वर जन्म काही फार अंतर होत नाही!

वैभव जोशींच्या या ओळी मनाला किती भावतात ना! आपल्या आयुष्यभराच्या प्रवासात आपल्याला कित्येक माणसं वेगवेगळ्या कारणांनी भेटत जातात, त्यांचा सहवास आपल्याला लाभत जातो, पण या ज्या भेटी असतात त्या बऱ्याचदा अनवधानाने घडलेल्या असतात, अनपेक्षितपणे घडलेल्या असतात. जेव्हा या भेटीचं रूपांतर पूर्नभेटीत होण्याची शक्यता निर्माण होते किंवा तशी इच्छा व्यक्त केली जाते ती भावना खरी आनंद देणारी असते.

कारण सुरुवातीला जी भेट झालेली असते त्यात आपल्याला तो माणूस माहीत नसतो, ती व्यक्ती अनोळखी असते. पण त्यात जो काही सहवास, जो काही वेळ घालवला जातो, जो वेळ आपल्याला मिळतो ज्यात ती व्यक्ती, तिचा स्वभाव हळू हळू उलगडत जातो त्यातून आपण पुन्हा भेटल पाहिजे अशी भावना येते.

दिसताना जरी हे एक वाक्य असल, एक इच्छा असली तरी त्याचा मागे खूप मोठा प्रवास घडलेला असतो. प्रवास कसला? तर आठवणींचा, प्रवास असतो अनुभवांचा हा प्रवास असतो, एकमेकांच्या आयुष्याला कुठेतरी एकमेकांशी जोडण्याचा. आपल्या बाबतीत हे अस अनेकदा झालं असेल, आयुष्यात एकदातरी अशी वेळ येते, असा प्रसंग येतो ज्यात आपल्याला अचानक अशी एखादी व्यक्ती भेटते, जी सुरुवातीला अनोळखीच असते पण काही काळानंतर अस नात तयार होत ज्यातून पुन्हा एकदा भेटायची ओढ निर्माण होते. कुठलातरी दूरवरचा प्रवास असुदे, एखादी सहल असुदे. माणसं भेटत जातात आणि संपर्क तयार होतो.

हा जो प्रवास आहे तो शेवटी कुठेतरी संपणार असतोच, थांबणार असतो. फिरून शेवटी आपल्याला आपल्या मूळ स्थानिच यायचं असत. अश्या वेळी जेव्हा समोरची व्यक्ती अस म्हणते की आपण पुन्हा भेटू, नक्की संपर्कात राहू तेव्हा ती खूप आनंद देणारी गोष्ट असते. कारण हे अस सर्वांच्या बाबतीत होत नाही.

भेटत जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण अस बोलून दाखवत नाही किंवा आपल्याला अस कोणी म्हणत नाही. बऱ्याचदा अस देखील होत की काही व्यक्तींना आपल्याला पुन्हा भेटायची इच्छा देखील होत नाही. गमतीने म्हणतात देखील, “इथे भेटलात वर नका भेटू.” पण याउलट काही व्यक्तींना सहवास परत घडायला हवा असा वाटतो. कारण त्यांच्याशी विचारांची, आठवणींची नाळ जोडली गेलेली असते.

आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडत असतात ना त्याला काही ना काही कारण असते. तसच जी माणसं आपल्या आयुष्यात येतात त्याच्या मागे पण काहीतरी कारण असतात. असच कुणीही कोणाशी जोडलं जात नाही.

आपले त्याच्याशी काहीतरी ऋणानुबंध असतात. नाहीतर अस का झालं असत की मध्यंतरी कितीतरी वर्ष काहीही संपर्क नसताना अचानक कधीतरी आपल्याला फोन येतो, ओळख पटवून दिली जाते आणि आपण पुन्हा भेटुयात का अस विचारलं जात. अस किती माणसांना आपण भेटुयात म्हणतो? निवडकच. याच कारणच त्या व्यक्तीशी असलेलं नातं आहे. आणि नात हे फक्त खूप काळ एकत्र राहिल्याने तयार होत नाही. ते काही क्षणात देखील तयार होत. कारण मन जुळेलल असत.

ती सध्या काय करते हा चित्रपट आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिला असेल. अनुराग आणि तन्वी, बालपणीपासूनचे मित्र, अगदी कॉलेज मध्ये पण ते एकत्र असतात. दोघांचं एकमेकांवर प्रेम असत पण ते वेळीच व्यक्त न करता आल्याने ते एकमेकांपासून दुरावतात. त्यानंतर त्यांचा जो संपर्क तुटतो त्यात अनेक गोष्टी होऊन जातात. त्यांचं लग्न होत, मुल संसार सुरू होतो.

इतकं होऊनही काही वर्षांनी त्यांची अचानक भेट होते आणि ते पुन्हा भेटायला तयार देखील होतात. ही जी भेट असते ती साधी नसते कारण यातूनच काही वर्षांपूर्वी ज्या काही गोष्टी अपूर्ण राहिल्या होत्या, ज्या भावना अव्यक्त राहिल्या होत्या त्या व्यक्त केल्या जातात आणि त्यातून त्या दोघांचं मैत्रीचं नातं पुन्हा एकदा नव्याने सुरू होत. त्यामुळे ही जी पुन्हा झालेली भेट असते ना ती खूप खास असते आणि म्हणूनच ही भावना आनंद देणारी असते.

आपण कितीही म्हटल इतक्या मोठ्या आयुष्यात इतकी सर्व माणसं भेटतात, कोण किती लक्षात राहणार? पण अस नसत. आपल्याला वाटत तितकं हे आयुष्य दूरवर पसरलेले अस नाही. या प्रवासात भेटलेली माणसं पुन्हा कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्याला भेटतातच. जर ती आपल्याशी मनाने जोडली गेली असतील तर!


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!