Skip to content

अशी वेळ येते की, माणसांचाच कंटाळा यायला लागतो. त्यांना सांभाळणं खूप कठीण होतं.

अशी वेळ येते की, माणसांचाच कंटाळा यायला लागतो. त्यांना सांभाळणं खूप कठीण होतं.


अपर्णा कुलकर्णी


साहिल, साहील पळू नकोस, आटपून घे लवकर मला ऑफिसला जायला उशीर होत आहे. साहिलच्या मागे धावत धावत सरिता ओरडत होती आणि साहिल धावतच होता. शेवटी सरिताने कसेबसे त्याला पकडुन आवरले आणि तयार करून शाळेत पाठवले. आज साहिलच्या नादात खूप उशीर झाला सर नक्की ओरडणार याच विचारात सरिताने स्कूटी सुरू केली तेवढ्यात तिच्या बाबांचा फोन आला आणि संध्याकाळी बाबांना ऑफीसमध्ये घेऊन जायचे तिच्या लक्षात आणून दिले. ऑफिसमधील कामे तिची वाट बघत होतीच. धावत येऊन तिने लॉग इन केले आणि कामाला लागली.

दुपारपर्यंत कामाचा ताण खूप होता तोपर्यंत इकडे तिकडे बघायला ही उसंत मिळाली नाही बिचारीला. लंच टाईम झाला म्हणून उठून खायला बसली तेवढ्यात पुन्हा घरुन फोन आला आणि साहिल खेळताना पडल्याने गुडघ्याला लागल्याचे समजताच हातातला घास खाली ठेवत तिने पुन्हा तासाची परमिशन काढून घर गाठले. कारण साहिल तिच्याशिवाय कोणालाही ऐकणार नाही याची तिला खात्री होती. म्हणूनच पटकन घरी येऊन तिने शेजारीच असलेल्या दवाखान्यात त्याचे ड्रेसिंग केले आणि त्याला समजावून सांगून ऑफिसकडे निघाली पण साहिल काही केल्या तिला सोडेना. एकतर जोरात लागल्याने चांगलीच कणकणी आली होती त्यात आईची सवय असल्याने आई, आई करत सारिताला बिलगून बसला होता.

आईची माया एकीकडे तिला थांबवत होती तर दुसरीकडे काम केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून कर्तव्य खेचत होते. तशात बिचारा साहिल औषधांमुळे झोपी गेला आणि सरीता जड मनाने उठून ऑफिसला गेली. घरी आल्यावर बराच वेळ साहिलने तिला सोडलेच नाही. दिवस इतका धावपळीत गेला की काही सुचले नाही त्यात बरं बाबांनी डॉक्टरकडे जाणे पुढे ढकलले होते.

सरीता जेमतेम बत्तीस वर्षांची मुलगी होती. पण इतक्याशा आयुष्यात तिने बऱ्याच वाईट अनुभवांना तोंड दिले होते. लग्नाला सात वर्षे झाली होती पण नव्याचे नऊ दिवस ही चांगले गेले नव्हते. तेंव्हापासूनच सासू, सासरे, नणंद आणि नवऱ्याने इतका त्रास दिला होता की, जगणे अशक्य झाले होते. त्यात लग्नानंतर महिन्या भरातच दिवस गेल्याने शारीरिक त्रास सुरू झाला होता. नवऱ्याचे सतराशे अठ्यांनवच्या काळातील जुनाट विचार, सासर्यांचा त्याला असलेला पाठिंबा, सासू आणि नंदेची कानभरणी आणि त्यातून नवऱ्यात आणि सरीता मद्ये नेहमीच होणारे वाद या सगळ्यांना सरीता अतिशय वैतागून गेली होती.

रोजचा होणारा हा मानसिक ताण काही केल्या सहन होत नव्हता मग त्यात साहिलचा हट्टी आणि तिरसट स्वभाव यामुळे ती अजूनच त्रासली होती. मुलगा जाऊन जाऊन त्याच्या बापावरच गेला म्हणून ती स्वतःच्या नशिबाला दोष देत आली होती. त्यात तिच्या तब्येतीने चांगलीच कुरबुर केली होती त्यामुळे तिला टीबी झाला होता. झालं मग तर काय तिच्या सासरच्या लोकांना बोलायला आयतीच संधी चालून आली होती आणि त्याचेच निमित्त करून तिचे सासरी रहाणे अशक्य करून टाकले होते.

शेवटी त्रासला कंटाळून सरीता माहेरी निघून आली ती कायमची. साहिल तिच्या जगण्याचे कारण होते म्हणून त्याच्यासाठी सरीता पुन्हा उभी राहिली होती. पण माहेरची परिस्थिती पण म्हणावी तितकी बरी नव्हती. सरीताचा लहान भाऊ अविवाहित होता, सरीताला तसे कोणी बोलून दाखवत नव्हते पण तिच्या अशा माहेरी येऊन राहिल्याने लग्नातील अडथळे वाढले होते, शिवाय तिचे बाबा कळत नकळत खूप मनस्ताप देत होते.

कामावरून आली की रोज काहीतरी खायला करून द्यावे लागत होते, त्यात समाज, नातेवाईक यांचा त्रास. साहिलच्या वागण्याचा होणारा त्रास, नवऱ्याचे अधून मधून येऊन सतत गाऱ्हाणे सांगणे आणि त्यात अजून भर म्हणजे ऑफिसच्या कामाचे टेन्शन. या सगळ्यांना सरीता खूप त्रासून गेली होती. तिला कळत होते की आपल्या वाईट काळात आपल्या आई बाबांनी आपल्याला आधार दीला आहे, ऑफिसमध्ये असताना साहिलला शाळेतून आणण्याची तसेच सांभाळण्याची खूप मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे, इतक्या अडचणी असूनही घरात आसरा दिला आहे.

पण सरीताची मानसिकता काही केल्या व्यवस्थित होत नव्हती. छोट्या छोट्या गोष्टीचा त्रास करून घेण्याचा, अती विचार करण्याचा स्वभाव त्यात शारीरिक,मानसिक आणि भावनिक ताण तिला झेपत नव्हता. त्यामुळेच कुठतरी एकटे आणि निवांत रहावेसे वाटे तिला. आसपास कोणीतीच माणसे नकोत.

मग ते नातेवाईक नकोत, सासरचे नको, घरचे नको आणि बाहेरचे तर नकोच नको. मनाची घालमेल, चिडचिड, कोणाचेही बोलणे, ऐकणे काहीच काहीच नको होते. एक स्वतःची अशी हवी तितकी जागा हवी होती ज्यात कोणी कधी डोकावणार नाही, डिस्टर्ब करणार नाही. थोडक्यात स्वतःचे आयुष्य स्वतःला हवे तसे कुठेतरी सगळ्यांपासून लांब जाऊन निवांत जगण्याकडे मानसिकता जात होती. ,

असे बऱ्याचदा होते की, घरात प्रत्येक गोष्टीत प्रत्येक व्यक्तीची नको तितकी लुडबुड, नाक खुपसणे, सतत कामे सांगून हाका मारून देण्यात येणारा वैताग यामुळे आधीच्याच ताणत भर पडते आणि मग कोणीच जवळ नको असे वाटायला लागते. एक अशी वेळ येते की, माणसांचा कंटाळा यायला लागतो, त्यांना सांभाळणं खूप कठीण होतं.

अशा वेळी मनाची शांतता कायम ठेवणे, ती वाढवण्याचा प्रयत्न करणे, स्वतःला थोडा वेळ देणे, सगळ्यात महत्वाचे मौन बाळगून राहणे खूप आवश्यक असते मित्रांनो. फक्त ऐकून घेण्याची तयारी ठेवून प्रतिउत्तर दिले नाही तर बराच त्रास कमी होऊन जातो मित्रांनो.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “अशी वेळ येते की, माणसांचाच कंटाळा यायला लागतो. त्यांना सांभाळणं खूप कठीण होतं.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!