Skip to content

जगण्यासाठीच्या सामान्य गरजा रुंदावत चालल्या आहेत.

जगण्यासाठीच्या सामान्य गरजा रुंदावत चालल्या आहेत.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


आयुष्य जगण्यासाठी माणसाच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या कोणत्या तर अन्न, वस्त्र, निवारा. ही गोष्ट आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. अब्राहम मास्लो या मानसशास्त्रज्ञाने माणसाच्या गरजांची वर्चस्वश्रेणी मांडली आहे. ज्यात देखील सर्वात आधी आपल्या शारीरिक गरजा येतात, त्या म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, लैंगिकता जी रिप्रोडक्शनचा एक भाग आहे.

या सर्व गरजा इथे येतात. या गरजा जेव्हा पुऱ्या होतात तेव्हा व्यक्ती सुरक्षिततेकडे वळते. ज्यामध्ये आपलं आरोग्य, आर्थिक स्थिरता या गोष्टी येतात. क्रमा क्रमाने ही वर्चस्व श्रेणी वाढत जाते. ज्यात नंतर सामजिक गरज, नातेसंबंध, स्व आदर आणि शेवटी येते ती आत्मवास्तवीकिकरणाची गरज किंवा टप्पा. गौतम बुद्ध, स्वामी विवेकानंद ह्या महान व्यक्ती इथपर्यंत पोहोचल्या होत्या.

एकंदरीत ही श्रेणी अशी आहे आणि गरजा अश्या आहेत. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत तरी असच होत. पण आताचा जो काळ आहे, परिस्थिती आहे, जे युग चालू आहे त्यात आपल्या ज्या सामान्य, मूलभूत गरजा आहेत त्या रुंदावत चालल्या आहेत अस वाटत नाही का?

खरच आताच आपलं आयुष्य अन्न, वस्त्र, निवारा इथपर्यंतच मर्यादित राहील आहे का? की यात अजून कश्याची भर पडली आहे? या तीन गोष्टी अश्या आहेत ज्या माणसाला तग धरून राहण्यासाठी गरजेच्या आहेत. पण याही पलीकडे आता आपल्या आयुष्यात अजून एका गोष्टीची भर पडली आहे, ज्याच्याशिवाय जगण्याची आपण कल्पनाच करू शकत नाही.

बऱ्याच जणांना याच उत्तर माहीत देखील असेल. तर ही गरज आहे, फोनची गरज. सोशल मीडिया, इंटरनेटची गरज. काही वर्षांपूर्वी सोशल मीडिया म्हणजे काय हे देखील आपल्याला माहीत नव्हत आणि आता आपला दिवस त्याने सुरू होतो आणि संपतो देखील त्यानेच.

जसं पुरेस, पोषक जेवल नाही की आपण आजारी पडू शकतो तस फोन बंद असेल, किंवा इंटरनेट संपलं तर माणूस बेचैन होऊ लागला आहे. फोन बाजूला असला किंवा हातात नसला तर काय करायचं असा अनेकांना प्रश्न पडतो. अस का होतय? कारण ह्या गोष्टीला आपण आपली गरज बनवून टाकलं आहे, अशी गरज ज्याच्यावाचून राहणं केवळ अशक्य वाटत.

एखाद्या गोष्टीच्या आहारी जाणं हा एक मुद्दा झालाच पण त्याला सोडून देखील फोन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आहे. याला कारण देखील अनेक आहेत. सर्वात महत्त्वाचं कारण सोशल मीडिया. फेसबुक, इनस्ट्राग्राम, ट्विटर यावर माणूस इतका गुंतून पडतोय, त्यातल्या आभासी जगात इतका गुंग होतोय की त्याला आजुबाजूच भानच राहत नाही.

अगदी लहान लहान मुलांची देखील आता यावर अकाऊंट असतात. इनस्ट्राग्राम रील्स, सेलिब्रिटींच्या पोस्ट पाहून त्यात रमण, आपल्या आयुष्यात ज्या गोष्टींची कमतरता आहे त्यांना अस दुसऱ्या कोणाच्या तरी माध्यामतून पाहून खुश होण याच प्रमाण वाढलं आहे. दुसऱ्याच्या आयुष्यात काय चालू आहे हे पाहण्यासाठी आपण इतके आतुर झालो आहोत, व्यस्त झालो आहोत की स्वतःकडे लक्ष द्यायला देखील आपल्याला वेळ उरला नाही. हे आताची वास्तविकता आहे.

मजा म्हणून ह्या गोष्टी पाहणं वेगळं. पण गंभीरपणे याचा विचार केला तर माणसाची यातून स्वतःच्या आयुष्याची दुसऱ्याशी तुलना करण्याचं प्रमाण वाढत आहे. तो किंवा ती कशी आनंदी आहे, त्याने कसं आपल्या आयुष्यात सर्व अचिव केल, मिळवल आणि मी कसा अजून इथेच आहे वाटून एक न्यूनगंड तयार होऊ लागलाय ज्यातून नैराश्याचे प्रमाण वाढत आहे.

या अनुषंगाने आपणच आपल्या वेगळ्या गरजा तयार केल्या आहेत. कोणत्या तर लोकांनी मला ओळखलं पाहिजे, आपल्याला सर्वांसमोर कसही करून आलं पाहिजे. सोशल मीडिया आता सर्वांना हाताळता येतोच. मग त्यावर स्वतःचे रील तयार करण, काही ना काही पोस्ट करत राहण, प्रत्येक वेळी त्यात काही चांगल असेलच अस नाही. ही गोष्ट खरी आहे की या गोष्टी पैसे कमवण्याच एक माध्यम झाल्या आहेत.

बरीच चांगली लोक पण यात आहेत, ज्यांच्या व्हिडिओ मधून प्रबोधन होत. पण हे देखील तितकच खर आहे की आपण लोकांना दिसावं आणि प्रसिद्ध व्हावं यासाठी काही तरी तयार करण्याचं प्रमाण आता खूप वाढलं आहे.

काहीही करून आपल्याला चर्चेत राहायचं आहे. ते कोणत्या कारणाने राहायचं ही गोष्ट दुय्यम झाली आहे. याशिवाय आता अस काही राहील नाही जे फोनवर मिळत नाही. कपड्यांपासून खाण्यापर्यंत सर्व गोष्टी यावर आता असल्याने फोन का असला पाहिजे याची कारण देखील वाढत आहेत.

पण इथे आपण ही एक गोष्ट लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण गरज अस म्हणतो तेव्हा त्याचं काहीतरी प्रमाण, मर्यादा ठरलेली असते. शरीर जगवायला जितकं खाल्ल पाहिजे तितकं आपण खाल्ल तरच आपल्याला त्याचा फायदा होणार. ते अतिप्रमाणात खाल्ल तर त्याचा त्रासच होणार आहे.

फोन निर्माण करण्याचं, किंवा त्याची गरज निर्माण होण्याच कारण लोकांना जोडणं हे होत. यातून संपर्क वाढवणं हे होत. पण आता त्याची व्याख्याच बदलून गेली आहे. ही अशी गरज झाली आहे ज्यातून आपलं जेवणाकडे लक्ष नसत, झोपकडे लक्ष नसत, समोरच्या माणसाकडे देखील लक्ष नसत. फोनचे, इंटरनेटचे फायदे नाहीत का? तर खूप आहेत. पण आपण एखादी गोष्ट कशी आणि किती प्रमाणात वापरतो यावर ते अवलंबून आहे.

आताच्या काळात फोन ही एक महत्त्वाची गरज जरी असली तरी त्यातून आपल्या बाकीच्या गोष्टींवर कसा परिणाम होतो हे पाहून, याचा विचार करून आपण वागलो, त्यानुसार याचा वापर केला, आभासी जीवनात जगण्यापेक्षा आपल्या खऱ्या आयुष्यात आपण कसं यशस्वी होऊ शकतो याकडे आपण लक्ष दिलं तर आपलाच त्रास कमी होईल.

कारण खोट्या जगात आपण जास्त काळ वावरू शकत नाही, आपल्याला कधी कधी वास्तवाला सामोरं जावच लागत. ज्याचा आपण आधीच विचार केला, तेवढ्या सुज्ञापणे आपण वागलो तर आपली ही गरज चांगल्या पद्धतीने पूर्ण करता येईल.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!