“तुमच्या जवळची व्यक्ती तुमच्या पासून काहीतरी लपवत आहे हे या १० मार्गांनी ओळखा.”
मधुश्री देशपांडे गानू
प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य हे अनेक नातेसंबंधांनी बांधलेलं असतं. या नात्यांशिवाय त्याच्या आयुष्याला अर्थ प्राप्त होत नाही. जन्मापासूनच आई-वडील, भावंडं, नातेवाईक, शेजारीपाजारी, मित्रमंडळी किंवा फक्त परिचित असे कितीतरी.
काही नाती ही आपल्या “दिल के करीब” असतात. प्रत्येक नात्याचं त्याच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान असतं. आणि या प्रत्येक नात्याच्या आपापल्या गरजा, जबाबदाऱ्या, कर्तव्ये प्रेम, जिव्हाळा असतात. ही नाती निभावण्याची जबाबदारी दोघांवरही समान असते. आणि कोणत्याही प्रत्येक नात्यात प्रेम, विश्वास, आदर अत्यंत महत्त्वाचा असतो. त्याचप्रमाणे योग्य वेळोवेळी होणारा संवाद, विश्वासाहर्ता, सच्चेपणा आणि पारदर्शकता ही तितकीच गरजेची असते. मग नातं कोणतंही असो. पण एखाद्या नात्यात मग ते नवरा बायको, प्रियकर प्रेयसी, आई वडील आणि मुलगा/ मुलगी, भावंडं, मित्र-मैत्रिणी यामध्ये जर एखाद्या व्यक्तीचं वागणं अचानक बदललं तर?? ती व्यक्ती पूर्वीसारखी वागेनाशी, बोलेनाशी झाली तर?? हळूहळू दुसऱ्या व्यक्तीच्या लक्षात हा बदल येतोच.
उदाहरणार्थ आपला पती आपल्याशी पूर्वीसारखा वागत नाही. काहीतरी लपवतोय असं त्याच्या पत्नीच्या लक्षात येऊ लागलं तर? त्याचा स्वभाव, त्याच्या सवयी बदललेल्या लक्षात येतं. आणि यावर खात्रीलायक, समाधानकारक उत्तर मिळत नाही. प्रेमाने, विश्वासाने, पूर्ण मनाने एखाद्या नात्यात गुंतलेली व्यक्ती अशावेळी सैरभैर होते. तिचा या बदललेल्या नात्यावर विश्वास बसत नाही. तिला काही केल्या खरं कारण समजून येत नाही. आपल्या अगदी जवळचं माणूस आपल्यापासून काहीतरी लपवतंय हे ओळखायचं कसं ते पाहू.
१) एक तर जी व्यक्ती आपल्याच प्रेमाच्या माणसापासून काहीतरी लपवत असेल तर ती खूप चिडचिडी होते. तिचा संयम फार लवकर संपतो. २) अचानक ही व्यक्ती out of the way जाऊन तुमच्याशी खूप चांगली वागू लागते. उदाहरणार्थ महागड्या भेटवस्तू देणं. जे नाटकी वाटू लागतं. ३) स्वतःच्या सेलफोन बाबत अचानक जागरूक, संरक्षणात्मक वागू लागते. कोणालाही हात लावू देत नाही.
४) अशी व्यक्ती छोट्या छोट्या प्रसंगांवरही overreact करते. स्वतःचा खोटेपणा लपवण्यासाठी तुमच्यावरच खोटे आरोप करते.
५) अशा व्यक्तीची तुमच्यातील भावनिक गुंतवणूक संपलेली असते. तुमच्या सुखदुःखांशी, भावनांशी त्यांना काहीही देणं-घेणं उरलेलं नसतं.
६) त्यांचे रुटीन अचानक बदलतं. त्यांच्या जाण्या येण्याच्या वेळा बदलतात.
७) या व्यक्ती जाणीवपूर्वक तुमच्याशी संवाद, फोन करणं, भेटणं कमी कमी करू लागतात.
८) अनेकदा ते तुमच्याशी सर्रास खोटे बोलतात, जे तुमच्या सहज लक्षात येतं. ९) अशा व्यक्ती हळूहळू त्यांच्या आयुष्यातून तुम्हांला बाजूला करतात.
१०) कोणतीही लहान-मोठी गोष्ट, घटना, तपशील ते तुम्हांला आता सांगत नाहीत. कोणत्याही परिस्थितीत ते तुम्हांला टाळू लागतात.
या आणि अशा अनेक मार्गांनी तुम्हीं तुमचंच माणूस तुमच्या पासून काहीतरी नक्की लपवत आहे, हे ओळखू शकता.
तुमचा प्रथम विश्वास बसत नाही. तुम्हीं अंतर्बाह्य हादरता. तुम्हांला अतीव दुःख होतं. भावनिक पातळीवर तुम्हीं कोलमडून जाता. हे अगदी साहजिक आहे. पण असं प्रेम, विश्वास, आदर, संवाद न उरलेल्या नात्याचं ओझं तुम्हीं तरी का आणि किती काळ बाळगायचं?? स्पष्टपणे बोलून मार्ग काढायचा.
अशा संपलेल्या नात्यात स्वतःची फरफट करून घेऊ नका. तर माणसं अचानक बदलतात. अनोळखी होतात. हे वास्तव वेळीच स्वीकारा. अशा नात्यातून लवकरात लवकर बाहेर पडा. स्वतःला सावरा. स्वतःचा आत्मसन्मान प्रथम जपा. आणि जीवन खूप सुंदर तर आहेच हो! नवीन प्रवासासाठी, नवीन नाती जोडण्यासाठी नव्याने सज्ज व्हा.. बस इतकंच!
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


Nice
ठिक आहे पण एवढा विशेष नाही