जेव्हा आपण आशावाद निवडतो तेव्हा सगळं काही शक्य होण्याची शक्यता वाढते.
सोनाली जे.
मानवी आयुष्य हेच मुळात आशावादी आहे. रोजचे आयुष्य जगताना माणूस आशावादी असतो. उद्या आपण एखादी गोष्ट करू असे ठरविणे म्हणजे काय झाले ? तर हा आशावाद च.
आपण घर , गाडी , काही वेळेस गॅजेट्स घेतो, याकरिता कर्ज घेतो. कधी शैक्षणिक कर्ज घेतो हे कशाच्या भरवशावर घेतो ? तर उद्या आपण हे कर्ज भागवू ही खात्री असते. आणि ही खात्री म्हणजेच आशावाद. थोडक्यात सकारात्मक दृष्टिकोन.
काही वेळेस कठीण प्रसंग असतात, अपयश येते , निराशा येते, कधी प्रेमभंग होतो, अचानक जवळच्या व्यक्तीचा मृत्यू .अशावेळी आपण खचून जातो. तरी ही काळ हे सगळ्या वरचे औषध आहे. जसं जसा वेळ जातो तसे माणूस ते दुःख , त्रास, अपयश विसरून पुढे जाण्याचा , मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत असतो. उमेद न हरता, जीवनचक्र सुरू ठेवतो. हा आशावाद च म्हणावा लागेल.
जेव्हा आपण आशावाद निवडतो तेव्हा सगळं काही शक्य होण्याची शक्यता वाढते.
मनाची ताकद , आत्मविश्वास, संकटांवर मात , समस्या निराकरण करणे, अयशस्वी होणे तरीही हिमंत न सोडता, न हरता , धैर्य सोडत नाही. म्हणजे हा आशावाद च असतो ना की जो पुढे काही तरी चांगले घडेल म्हणून प्रयत्नशील ठेवतो .
एखाद्या धावण्याच्या स्पर्धेत आपण भाग घेवून पहिल्यांदा आपण नंबर मिळवू शकत नाही. म्हणून आपण हार मानून परत धावण्याच्या स्पर्धेत भाग घेणारच नाही असे करत नाही. उलट अजून जास्त जोमाने practice आणि प्रयत्न करतो. कारण पुढच्यावेळी स्पर्धेत आपला नंबर येईल ही आशा असते.
याशिवाय जरी आपण धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला तरी ही आपण practice सुरू ठेवतो कारण काय तर या स्पर्धेत आपण ते अंतर पार करण्यासाठी किती वेळ घेतला त्याच्यापेक्षा कमी वेळात ते अंतर पार पाडण्याचा प्रयत्न आपण करतो. म्हणजेच आपलेच रेकॉर्ड ब्रेक करणे हा हेतू असतो. आणि कमी वेळात तेवढे अंतर पार पाडून क्रमांक मिळवू हा आशावाद आपल्याला अजून सराव करण्यास उत्साही ठेवतो. किंवा सराव करण्यास भाग पाडतो म्हणले तरी योग्य ठरेल.
मानवी इच्छाशक्ती मध्ये एक प्रयत्नशील शक्ती च आहे.
एकदा एक राजा दुसऱ्या राज्यात जातो. तिथे त्याला एका शेतकऱ्याकडून दोन सुंदर पक्षी भेट म्हणून मिळतात. तो राजा खुश होतों आणि त्या दोन्ही पक्षांना घेवून येतो आणि आपल्या बागेत सोडतो . त्यातला एक पक्षी त्याचे सुंदर रंगी बेरंगी पंख पसरवून उंच झेप घेवून हवेत स्वच्छंद भराऱ्या घेत असतो. आणि त्याचे खाणे ही गोळा करून आणत असतो.
परंतु दुसरा पक्षी मात्र उडायला ही शिकत नाही. तो त्याच्या फांदीवर बसून राहतो. तेव्हा राजाला आश्चर्य वाटते असे का ?? म्हणून तो प्रधानजी ना बोलवतो आणि अशी चिंता व्यक्त करतो..आणि म्हणतो त्या शेतकऱ्याने आपल्याला फसविले . एकच पक्षी चांगला दिला. प्रधानजी राजाला शांत करतात आणि म्हणतात मी बघतो. तुम्ही थांबा. मला वेळ द्या थोडा.
काही दिवसात तो दुसरा पक्षी ही त्याचे सुंदर , रंगी बेरंगी पंख फुलवून आकाशात उंच भरारी घेत मुक्तपणे फिरतं असतो . हे बघून राजा प्रधानजी ना म्हणतो हे कसे शक्य झाले. तेव्हा प्रधानजी म्हणतात. पहिला पक्षी सामर्थ्यवान होता. त्याचा त्याच्या पंखांवर , त्याच्या स्वतः वर विश्वास होता. सुरुवातीला तो ही छोटी छोटी भरारी घेवून झाडावर परत येवून बसे. हळूहळू त्याने थोडे थोडे अंतर वाढवून , आपली क्षमता वाढविली , आणि जसजसे त्याच्या पंखात मधले बळ वाढत जाईल तसे तसे आकाशात मोठ्या उंच भरारी घेण्यास सुरुवात केली.
तर दुसरा पक्षी मात्र या झाडावर सुरक्षित असल्याचं समाधान मानत होता. त्याला तो पहिला पक्षी खाण्या करिता फळे , छोटे कीटक आणून देत होता त्यामुळे हा स्वतः उडण्याचे प्रयत्न ही करत नव्हता. पहिल्या पक्षाच्या सावलीत स्वतः ला सुरक्षित समजत होता. त्याच्या मदतीने आपल्या गरजा बसल्या जागी पूर्ण करीत होता. त्याच्या मध्ये नवीन काही करावे , आपण स्वतः प्रयत्न करून आपल्या साठी खाणे मिळवावे , आपण उंच भरारी घेवून आकाशातल्या गमती जमती ची मजा घ्यावी ..आनंद घ्यावा असे वाटत असून तो प्रयत्न करत नव्हता.. भीती वाटत होती त्याला उडण्याची. आणि आपणहून तो आपली संधी गमावत होता उंच उडण्याची. राजा विचारतो मग अचानक कसा तो उडायला लागला??
प्रधानजी :-
राजा जी मला माफ करा , मला पक्षाला दुखविण्याचा ,त्रास देण्याचा उद्देश नव्हता , तो ज्या फांदीवर बसला होता ती फांदी मी तोडून टाकली तेव्हा तो पक्षी फांदीवरून खाली पडणार या भीतीने त्याने त्याच्या सर्व सामर्थ्य शक्तिनिशी आकाशात उंच भरारी घेतली.
मी फांदी तोडून फक्त त्याला त्याच्या comfort zone मधून बाहेर काढले. त्याला त्याच्यातल्या स्व ची , क्षमतेची जाणीव झाली..आणि आपल्या पंखांची उघड झाप करून , पंख फडफडविल्या शिवाय , उंच उडण्याशिवय पर्यायच नाही हे लक्षात आल्यावर त्याने प्रयत्न पूर्वक आपला comfort zone सोडला आणि आकाशात सामर्थ्य , बळ लावून उंच भरारी घेतली. मी बाकी काहीच केले नाही फक्त त्याला प्रोत्साहन दिले. त्या झाडाखाली, सभोवताली संपूर्ण नेट लावले होते जेणेकरून सुरुवातीला पक्षी उडताना जरी पडला तरी त्या नेट वर तो सुरक्षित होता. आणि त्या नेटवरून परत उडण्याचा तो प्रयत्न करत होता. आता खाली पडून आपल्याला काही होईल ही भीती ही मनातून निघून गेली होतो. त्यामुळे तो उंच उडणार , त्याकरिता थोडा प्रयत्न करावा लागणार ही खात्री निर्माण झाली होती त्या पक्षात .
आणि एकदा त्याने उंच भरारी घेतल्यावर परत तो झाडाच्या दुसऱ्या फांदीवर येवून बसून परत खूप उंच भरारी घेवून आकाशात स्वच्छंदपणे उडू लागला. असे त्याने दोन चार वेळा प्रयत्न केले की , खरेच परत झाडाच्या फांदीवर बसल्यावर आपल्याला परत भीती नाही ना वाटत ? परत आपण अजून उंच भरारी घेवू शकतो का ? तर तेव्हा त्याच्यात ही आशा निर्माण झाली , की आता तो केव्हाही उंच भरारी घेवू शकतो.
प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी अशी एखादी संधी येतेच येते जी तुमचं आयुष्य बदलू शकते, जिच्यात तुम्हाला जगण्याचा एक वेगळा अनुभव देण्याची , स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची क्षमता असते पण दुर्दैवाने आपण मात्र आपला “कंफर्ट झोन” सोडायला तयार नसतो. आणि मग आपणच आपली प्रगती खुंटवतो.
प्रत्येकालाच आकाशाला गवसणी घालण्याची इच्छा असते. उंच भरारी घेण्याची इच्छा असते. काही तरी करण्याचे ध्येय असते. मला मोठे व्हायचे. मला इंजिनिअर , डॉक्टर , आर्टीस्ट , शिक्षक बनायचे आहे हे ध्येय म्हणजे काय आशावाद च असतो ना ..की आयुष्यात मला काही तरी करायचे आहे. हे ध्येय पूर्ण करताना वारंवार येणाऱ्या अडचणी , अपयश यातून पुढे जाताना आशावाद असतो म्हणून सगळं काही होणे शक्य असते.
जर निराशा निर्माण झाली तर माणूस तिथेच थांबून राहील. आता मला काही करायचे नाही असेच मनात ही धरून बसेल आणि कृती ही काही न करण्याची घडेल. शिवाय मला जमतच नाही. असे सतत वाटत राहिलं. आणि खरेच ते जमणार ही नाही.
आपण निराश होवून तिथेच थांबलो तर पुढची संधी आपल्याला मिळणार च नाही. धावण्याच्या स्पर्धेत हरलो म्हणून पुढच्यावेळी घाबरून भागच घेतला नाही तर आपण च आपल्याला मिळणारा एक चान्स , एक संधी गमावून बसतो. कारण भीती आणि निराशेच्या पोटी संधीचा लाभ घेत नाही. मग अशी आशा ही वाटत नाही की अरे मला भाग घेण्याची संधी मिळाली , इतर काही लोकांना ती ही मिळाली नसेल. आणि मिळाली आहे संधी तर आपण आपले बेस्ट प्रयत्न करून number ही मिळवू. अशी आशा निर्माण होवू असते . पण भाग घेतच नाही म्हणजे संधीवर कायमचे पाणी फेरल्यासारखे .
याउलट जेव्हा आपण आशावाद निवडतो तेव्हा सगळं काही शक्य होण्याची शक्यता वाढते.हीच स्पर्धा आपण जिंकण्याची शक्यता असते. मला नाही जमत . मी नाही करणार म्हणले की नाहीच जमणार. या उलट मी प्रयत्न करतो हा आशावाद. तुमची स्पर्धा जिंकण्याची इच्छा , आशा शक्य करतो. पूर्ण करतो.
आयुष्य सुंदर आहे. एवढ्याशा त्रास , दुःख , अपयश , प्रेमभंग , किंवा एखादा छोटा अपघात याने खचून जाता धैर्य ठेवा. आशा ठेवा की ही गोष्ट तात्पुरती आहे. ती बदलता येणारी आहे. त्याकरिता जिद्द , प्रयत्न करणे जरुरी आहे. आणि आशावादी राहणे. सर्वांना all the best.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


Lekh khupch chan aahe
लेख छान आहे