इतरांकडून आपण फसवले गेलो आहोत ही भावना हळूहळू कशी कमी करावी?
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
काही दिवसांपूर्वी माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत एक घटना घडली. ती एका यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ सतत पाहायची. त्या खाली कमेंट पण करायची. एके दिवशी तिला त्या चॅनलकडून, त्याच्या एडमिन कडून एक मेसेज आला. अभिनंदन मी जो giveway करणार आहे त्याच्या तुम्ही lucky winner झाला आहात. तुम्हाला माझ्याकडून गिफ्ट मिळेल ते मिळवण्यासाठी खाली दिलेल्या माझ्या आयडी वर मेसेज करा. असा तो मेसेज होता.
माझ्या मैत्रिणीला याचा काहीच अनुभव नव्हता. पण giveway केले जातात हे तिने बऱ्याचदा पाहिलं होत. त्यामुळे तिला हे खर वाटल. तिने त्या आयडी वर जाऊन मेसेज केला तर त्यावर लगेच रिप्लाय देखील आला. चॅनलची एडमिनच बोलत होती. तिने काही प्रश्न विचारले पुन्हा एकदा अभिनंदन केलं आणि काही नंबर्स पाठवून त्यातील एक नंबर निवडायला सांगितला. त्या नंबर नुसार गिफ्ट मिळणार होत.
हिने एक नंबर निवडला. त्यावर तिने काय काय बक्षिसं मिळाली आहेत त्याचा एक मजकूर पाठवला. त्यात बऱ्याच किमती वस्तू होत्या. जे न पटण्यासारख होत. माझ्या मैत्रिणीने त्यावर खात्री करून घ्यायला परत प्रश्न पण विचारले. पण त्या एडमिन ने खात्री पटवून दिली की खरच हे बक्षीस दिलं जाणार आहे. त्यानंतर तिने एका कुरिअर सर्व्हिस चा आयडी पाठवून संपर्क करायला सांगितला जेणेकरून पार्सल लवकरात लवकर मिळेल.
इथे देखील माझ्या मैत्रिणीने परत खात्री करून घेतली व नंतरच संपर्क केला. तिथे अस सांगण्यात आलं की हे पार्सल तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी मिळेल पण त्याआधी तुम्हाला डिलिव्हरी फी भरावी लागेल. तेव्हाच ते कन्फर्म करता येईल. ही फी नेहमीपेक्षा जरा जास्त होती. पण मैत्रिणीने विचार केला की सामान खूप किमती आहे आणि लांबून येणार आहे म्हणून कदाचित इतकी फी असेल. तिने ती फी लगेच भरली. इथे ती खरी फसली.
कारण जेव्हा तिने ही फी भरली तेव्हा त्या कुरिअर सर्व्हिस कडून एक मेसेज आला धक्कादायक होता. त्यात लिहिलं होत की हे बक्षिक मिळवण्यासाठी तुम्हाला ठराविक रक्कम भरावी लागेल नाहीतर ह्या गोष्टी चोरल्या गेल्या आहेत अस वाटू शकत. ती जी रक्कम होती ती साधी नव्हती. सर्वसामान्य माणसाला भरण्याईतपत नव्हती.
माझ्या मैत्रिणीला धक्का बसला. तिने ही रक्कम देण्यास साफ नकार दिला व आधीचे पैसे परत करण्यास सांगितले. पण समोरून ती व्यक्ती फक्त ही रक्कम भरावी लागेल तरच पार्सल येईल अस सांगत होती. त्या बोलण्यात एक प्रकारच ब्लॅकमेलिंग होत जे मैत्रिणीच्या लक्षात आलं. तिने शेवटपर्यंत पैसे देण्यास नकार दिला. आधीचे पैसे त्या व्यक्तीने देऊ शकत नाही अस सांगितलं तेव्हा देखील मैत्रिणीने ठीक आहे अस सांगून बक्षीस रद्द करायला सांगितले. ती व्यक्ती सर्वतोपरी प्रयत्न करत होती की माझ्या मैत्रिणीने ही मोठी रक्कम भरावी. कशी त्यांची इच्छा आहे की तिला बक्षीस मिळाव, कसं ते त्यांच्या परीने मदत करू शकतात हे सर्व बोलून झालं.
पण माझी ही मैत्रीण स्वतःच्या निर्णयावर ठाम राहिली आणि तोच योग्य निर्णय होता कारण तिची सरळ सरळ फसवणूक झाली होती. ज्या चॅनलवरून तो मेसेज आला होता तो काही दिवसांनी नाहीसा झाला आणि एडमिन म्हणून ती ज्या व्यक्तीशी बोलली होती ती देखील दुसरीच कोणतरी निघाली. थोडक्यासाठी खूप मोठं नुकसान होण्यापासून वाचलं. पण जे पैसे गेले त्याच दुःख देखील होतच. कारण ती मेहनीतीची कमाई होती. जी एका क्षणात अशी निघून गेली.
अश्या ज्या घटना आहेत त्या आताच्या काळात सर्रास होताना दिसत आहेत. कधी कोणत्या प्रकारचा स्कॅम आपल्यासोबत होईल हे सांगता येत नाही. त्यात आता सर्व डिजिटल झालेलं असल्याने धोका अजून वाढला आहे. आपली वैयक्तिक माहिती, बँक डिटेल्स हॅक केले जातात, कोणत्या तरी माध्यमातून मागितले जातात आणि त्याचा गैरवापर केला जातो.
अश्या तऱ्हेने बरीच लोकं फसवली जात आहेत. पण जरी अस झालं तरी आपण त्यात किती अडकून पडायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. कारण जितके जास्त आपण त्यात अडकून पडणार तितका जास्त आपल्याला त्याचा त्रास होणार. म्हणून जेव्हा अस काही होईल तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण स्वतः हुन काही प्रयत्न करण आवश्यक आहे.
पहिलं म्हणजे जेव्हा आपल्याला लक्षात येईल की आपली फसवणूक होत आहे, काहीतरी गडबड आहे तेव्हा आपण लगेच कोणाचीतरी मदत घेणं किंवा आपल्या परीने त्यातून बाहेर पडणं आवश्यक आहे. जेणेकरून आपलं अजून नुकसान होणार नाही.
माझी जी मैत्रीण जिच्या बाबत हे सर्व झालं तिला जेव्हा ते समजल तेव्हा तिने तिच्या जवळच्या व्यक्तीला, मैत्रिणीला हे सर्व सांगितल आणि पहिल्यांदा ते सर्व अकाऊंट ब्लॉक केले ज्यावरून ते सर्व मेसेज आले होते. तश्याच पद्धतीने आपण काहीतरी कारवाई करण आवश्यक आहे. कोणाचीतरी मदत घेणं आवश्यक आहे.
जेव्हा अशी फसवणूक होते तेव्हा आपण स्वतःला खूप दोष देऊ लागतो, स्वतःवर रागावतो कारण आपण कुठेतरी विश्वास ठेवून आपल्या गोष्टी शेअर केलेल्या असतात, पाठवलेल्या असतात. पण स्वतः ला नाव ठेवून आपला त्रास कमी होत नाही की आपलं नुकसान भरून निघत नाही. आपण काही श्या गोष्टी मुद्दाम केलेल्या नसतात, आपल्याकडून चुका होऊ शकतात. माझ्या मैत्रिणीची चूक ही झाली की तिने लगेच विश्वास ठेवला आणि पैसे पाठवण्याआधी कोणाचा सल्ला घेतला नाही. अश्याच काही ना काही चुका झालेल्या असतात. पण त्या नकळत झालेल्या असतात. यापुढे अशी चूक होऊ न देणं, यातून धडा घेणं आणि आपली चूक सुधारण हा शहाणपणा आहे. हा विचार जरी आपण केला तरी आपला त्रास कमी होईल.
जे काही झालं ते वाईट असल तरी आपण यातून वाचलो यासाठी देवाचे आभार माना. अनेकदा अश्या गोष्टी होतात की जरी आपलं नुकसान झालं तरी आपण मोठ काहीतरी होण्यापासून वाचतो. थोडक्यात बचावतो. ते पण विचारात घेणं गरजेचं आहे. आता जरी फसवणूक झाली असली तरी गोष्टी हाताबाहेर गेल्या नाहीत, आपण ठीक आहोत आपण यापुढे विचार करून, सावधान होऊन वागू शकतो निर्णय घेऊ शकतो आणि तेव्हढी क्षमता अजूनही आपल्यात आहे ही गोष्ट खूप चांगली आहे आणि तिथे आपण लक्ष दिले पाहिजे.
जेव्हा आपली फसवणूक होते तेव्हा आपल्याला पुढच्या सर्वच गोष्टींवर संशय येऊ लागतो आणि आपण काही करायला कचरतो. लगेच विश्वास ठेवत नाही. गोष्टीचं अतिसामान्यीकरण करतो. म्हणजे अमुक एका माणसाने फसवणूक केली तरी तश्या प्रकारची सर्वच माणसं वाईट. एका नात्यात वाईट अनुभव आला तर सर्वच नाती वाईट. अस होत नाही.
माणसं कधीच एकसारखी असत नाहीत आणि एकदा एखादी घटना घडली म्हणजे प्रत्येक वेळी ती तशीच होईल अस देखील नाही. यावेळी आपण फसवले गेलो कारण आपल्याला पण काही कल्पना नव्हती, आपल्याकडून पण काही चुका झाल्या, अजूनही अनेक कारण त्याला कारणीभूत होती. पण अस दर वेळी होणार का? नाही. यातून शिक्षण घेऊन जर आपण पुढे जबाबदारीने वागलो तर पुन्हा अस होत नाही.
सर्वात महत्त्वाचं आणि लक्षात घेण्याची गोष्ट ती म्हणजे खरच आपण फसवले गेलो आहोत का? हे आधी तपासणे. कारण बरेचदा अस होत की कोणी तिसरीत व्यक्ती किंवा परिस्थिती यातून गैरसमज निर्माण होतात, केले जातात. जवळच्या नात्यात अश्या गोष्टी होतात. अश्या वेळी त्या माणसापासून दूर जाणं, त्याच्याशी बोलायचे टाळणं अस केल जात. पण हे करून आपण आपलंच नात खराब करत असतो. कारण दिसेल तर दर वेळी खर असेलच अस नाही. त्यामुळे ज्याने आपल्याला फसवल किंवा ज्याच्यकडून आपण फसवले गेलो आहोत अस आपल्याला वाटत आहे त्याच्याशी प्रत्यक्ष बोला, आपल्याला जे काही समजलं असेल ते क्लिअर करा, निर्माण झालेले गैरसमज दूर करा. बोलण्याने बऱ्याच गोष्टी सुटतात.
अश्या प्रकारे आपण या भावनेतून बाहेर पडू शकतो.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

