हे वारंवार वापरले जाणारे तिखट वाक्य तुमच्या दोघांच्या नात्यांवर परिणाम करतात.
हर्षदा पिंपळे
वैवाहिक आयुष्य कुणाचं सुखी समाधानी असतं तर कुणाचं अगदी त्याच्या विरूद्ध.दोघांमध्ये सामंजस्य असेल तर सगळ्या गोष्टी सहजपणे हँडल होतात. परंतु दोघांमध्ये काहीच सामंजस्य नसेल तर गोष्टी हाताळणं अवघड होऊन बसतं.दोघांच्या नात्यावर कोणत्या गोष्टीचा वाईट परिणाम होऊ शकतो आणि कोणत्या नाही ते आपण सांगू शकत नाही.कधी कधी एखादी छोटी गोष्ट सुद्धा नात्यावर वाईट परिणाम करू शकते.लग्नानंतर बऱ्याच जोडप्यांमध्ये आपण वाद होताना पाहतो.त्यांच्यात अगदी क्षुल्लक गोष्टींवरून वाद होत असतात.इतकच नाही तर कधी कधी आर्थिक गोष्टींवरून वाद होत असतात.कधी माहेरच्या गोष्टीवरून वाद होतात तर कधी कधी कुठल्याही छोट्या छोट्या चुकांमुळे एकमेकांमध्ये वाद निर्माण होतात.कधी कधी आपले न जुळणारे विचार,मतं
यांचाही एकमेकांच्या नात्यावर परिणाम होत असतो.तर कधी कधी एकमेकांना मुलांच्या प्रत्येक जबाबदारीमध्ये लक्ष घालता येत नाही.कामाच्या ताणामुळे एकमेकांना पुरेसा वेळ देणं शक्य होत नाही.अशा अनेक गोष्टींचा दोघांच्या नात्यावर वेगवेगळा परिणाम होत असतो.
संवाद थांबल्यानेही नात्यावर परिणाम होत असतो.
परंतु अशी काही वाक्य असतात ज्यामुळेही दोघांच्या नात्यावर वाईट परिणाम होतो.
आपण अनेकदा म्हणतो की शब्द हे धारदार शस्त्र आहे.आपले शब्द कधी कुणाला बोचतील काही सांगता येत नाही. त्यामुळे ते जपून वापरायला हवे.पण मग नात्यांमध्येही अशीच काही वाक्य असतात जी बऱ्याचदा त्रासदायक ठरतात.तर ही अशी तिखट वाक्य नक्की कोणती ती एकदा जाणून घेऊयात.
“तुझं तु बघून घे.मला काही सांगू नको.सगळं काय मीच करायचं का ?”
“तुझेच आईबाप आहेत.माझे नाही.तुझ्याच भाषेत समजाव त्यांना.”
“माझ्या पैशाचं काय करायचं ते मी ठरवेन.कुणाला आणि किती द्यायचं ते मी बघेन.”
“मी कोणासोबत जायचं, किती वेळ जायचं हे तु नाही हं ठरवायचं .माझं आयुष्य आहे मला हवं तसच मी जगणार.माझं आयुष्य कसं जगायचं हे तु मला शिकवायची गरज नाही.”
“तुझ्यामुळे माझ्या आयुष्याची वाट लागली.याआधी माझं आयुष्य चांगलं सुखात चाललं होतं.”
“जा निघून जा.तु निघून गेल्याने फारसा फरक पडणार नाही.”
“सगळं करायचा ठेका काय मी एकटीनेच घेतलाय का ? घरात सगळेच राहतात नं ?”
“माझ्या एकटीची/एकट्याची मुलं नाहीत. मीच का सांभाळू ?”
“तु केलं तर तूच निस्तर.माझा याच्याशी काहीही एक संबंध नाही.”
“थोडीही अक्कल दिली नाही तुला.अक्कल असती तर आज ही वेळ आलीच नसती.”
“माझ्या या परिस्थितीला तुच जबाबदार आहे. तु आणि फक्त तुच जबाबदार आहे.”
“माझ्यावर उपकार कर आणि कृपा करून गप्प बस.नाही बोललास तरी चालेल.
अशा प्रकारची अनेक वाक्य कित्येकांना तोंडपाठ असतील यात शंकाच नाही.याचा अनुभवही कित्येकांनी घेतला असेलच.अनेकदा मजा मस्करीमध्ये एकमेकांना असं बोललं जातं.
पण कधी कधी याची गहनता दोघांच्याही लक्षात येत नाही.या अशा वाक्यांचाच खरं तर दोघांच्या नात्यांवर विपरित परिणाम होत असतो.आणि हे दोघांच्याही लवकर लक्षात येत नाही.मजामस्करीत अशा गोष्टी ठिक वाटत असल्या तरी त्या खोलवर मनाला टोचतात.
या अशा वाक्यामुळे एकमेकांमध्ये दरी निर्माण होण्याची शक्यता असते.एकमेकांमध्ये अनेक गैरसमज होण्याची शक्यता असते.यामधून एकमेकांमधील सुरळीत असणारा संवाद बिघडू शकतो.त्यामुळेच एकमेकांना लागतील अशी तिखट वाक्य अवश्य टाळायला हवी.
नातं छान टिकवायचं असेल तर त्यात तिखटाबरोबर प्रेमाचा गोडवाही असायलाच हवा.नेहमीच भांडणं, संशय घेणं , तिरसटपणे बोलणं कोणत्याही नात्यासाठी चांगलं नाही.त्यापेक्षा थोडं समजून घेऊन वागलं,मिळून मिसळून वागलं तर नात्यातील गोडवा नक्कीच वाढेल.एकमेकांमध्ये असणारं बॉंडिंग अधिकाधिक चांगलं होत जातं.
म्हणून, नात्यावर कोणताही अयोग्य किंवा वाईट परिणाम होऊ द्यायचा नसेल तर असं बोलणं, अशी तिखट किंवा टोचणारी वाक्ये सहसा टाळावी.एकमेकांशी नम्रपणे,समजूतदारपणे वागावे.यामुळे नात्यावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही.
बघा,काय बोलायचं आणि काय नाही याचा नीट विचार करा.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
लेख खुप छान आहे