नोकरी करणारी बायको हवी असेल तर ती घराला पूर्ण वेळ देऊ शकत नाही, हे आधी स्वीकारा.
मेराज बागवान
बरेचदा प्रत्येक मुलगा आपल्या होणाऱ्या पत्नी मध्ये आईला पाहत असतो.म्हणजे आई कशी घराची काळजी घेते, सर्वांना हवं नको ते पाहते,कोणाला काय आवडते काय नाही याची आठवण ठेवते, प्रत्येकाची आवड जपते आणि संपूर्ण कुटूंबावर निस्सीम प्रेम करते,अपेक्षाविरहित प्रेम करते.
लग्न होण्याआधी प्रत्येक मुलगा प्रथम असेच काहीसे बघत असतो आणि आपली होणारी बायको देखील अशीच हवी असे प्राथमिकरित्या मुलांना वाटत असते.आणि ह्या मूलभूत अपेक्षानंतरच ,तिचे करिअर,ती स्वतंत्र असणे वगैरे बोलण्याच्या गोष्टी असतात.बाकी सर्व प्रथम चूल-मूल सांभाळणे,आई-वडिलांची काळजी घेणे हेच मुलांच्या मनी असते.
मुलांच्या बाबतीत म्हणायचे तर, आजकाल खर्च,महागाई वाढत चालली आहे. बेरोजगारी देखील दिवसेंदिवस वाढतच आहे,कुठे रोजगार आहे पण त्या पैशात घर भागत नाही.चांगले शिक्षण असूनही मनासारखी नोकरी नसते.मग हीच काही कारणे असतात, नोकरीवली मुलगी हवी ह्या मागे.
मग लग्न करण्याचा निर्णय झाला की हा व्यावहारिक दृष्टिकोन पुढे बोलून दाखविला जातो.अनेकदा घरचा आर्थिक भार उचलण्यासाठी नोकरीवाली मुलगी हवी अशी अपेक्षा असते.कधी पूर्ण पगार फ्लॅट चे हफ्ते भरण्यात जातो तर कधी चारचाकी घेण्यात पैसे खर्च होतो.आजकाल मुली शिकलेल्या असतात.त्यामुळे नोकरी करण्याचे प्रमाण देखील जास्त आहे.मग ह्या सगळ्याची जुळवाजुळव सुरू होते.
लग्न होते ,बायको चा पैसा देखील घरात येऊ लागतो.कधी मुलीला खरेच करिअर करायचे असते,स्वतःच्या पायावर उभे राहायचे असते म्हणून ती नोकरी/व्यवसाय करीत असते.दुसरीकडे घरी आर्थिक मदत होईल,नवऱ्याचा भार थोडा कमी होईल हा देखील दृष्टिकोन मुलीचा असतो.
पण हे इतकेच मर्यादित राहत नाही.नोकरी करणारी मुलगी असेल तर कुटुंब आणि नवरा तिच्याकडून स्वयंपाक,घर सांभाळणे वगैरे अपेक्षा ठेवतातच.आणि ह्यात वेगळे असे काही नाही.आपल्याकडे मुलगी कितीही शिकलेली असली तरी देखील चूल-मूल तिला सुटलेले नाही.त्यामुळे ती नोकरी करीत करित घर देखील सांभाळत असते.
पण कधी कधी मुलीच्या ऑफिस मध्ये काही जास्तीचे काम असते,काही कार्यक्रम असतात.त्यावेळी ती घराला पूर्ण वेळ देऊ शकत नाही.किंबहुना आजकाल तर बारा-बारा तास नोकरीत जातात.त्यात घर आणि ऑफिस चे अंतर दूर असेल तर आणखीन जास्त वेळ बाहेरच जातो.म्हणजे घरात कमी आणि ऑफिस मध्ये जास्त अशी अवस्था होते.महानगरात तर भीषण परिस्थिती आहे. लोकल,ट्रेन ने प्रवास करीत ऑफिस गाठावे लागते.हे सर्व करीत असताना मग पूर्ण वेळ घराला कसा बरे देता येईल.
ऑफिस मध्ये अनेक ताण-तणाव असतात. बॉस शी ,इतर सहकाऱ्यांशी जुळवून घ्यावे लागते. काही काही ठिकाणी स्त्री म्हणून तिला कमी लेखले जाते.जर ती बॉस असेल तर तिचे मुद्दाम ऐकले जात नाही.पुरुषी वृत्ती आणि अहंकार याला ती बळी पडते.यांसारखे अनेक त्रास,अडचणी तिला कामाच्या ठिकाणी असतात.’डेड लाईन’ पाळता पाळता तिची तारेवरची कसरत सुरू असते.
ती बाहेर जाते म्हणजे काही फिरायला ,मजा मारायला जात नाही.बारा बारा तास काम करून केवळ काही पैसे तिच्या हाती येत असतात.आणि ह्या सगळ्यात घर देखील पूर्णपणे सांभाळणे ही अपेक्षा योग्य राहील काय ?
स्त्री देखील एक माणूस आहे.ती काही कोणते यंत्र नाही.तरी देखील ‘मल्टीटासकिंग’ हा उपजत गुण निसर्गाने तिला दिला आहे.पण याचा अर्थ असा नाही की तिनेच सर्व काही पाहिले पाहिजे. नोकरिवाली पण पाहिजे आणि घर सांभाळणारी देखील पाहिजे. असे कसे शक्य आहे. त्यामुळे ज्या मुलांना वाटते की नोकरी करणारी बायको हवी तर प्रथम त्यांनी हे वास्तव स्वीकारले पाहिजे की ,नोकरी करणारी बायको असेल तर ती घराला पूर्ण वेळ देऊ शकणार नाही.तिला पतीची,कुटुंबियांची साथ,पाठिंबा प्रत्येकवेळी लागणार.त्याशिवाय ती नोकरी करू शकत नाही.
कधी तिला घरी यायला उशीर होणार असेल तर स्वयंपाकाची तयारी कुटुंबीयांनी करणे ही साधी गोष्ट आहे.सकाळी देखील तिला घरकामात मदत करणे हे अपरिहार्य आहे हे समजून घेण्याची मानसिकता मुलगा आणि सासू-सासरे यांच्याकडे हवी.त्यामुळे नोकरीवली मिळवण्याआधी ह्या सर्व गोष्टी मुलाने विचारात घेतल्या पाहिजेत.पूर्वी शिक्षणाचा अभाव होता.रंधा-वाढा-उष्टी काढा इथपर्यंतच स्त्री चे विश्व होते.पण आता तसे नाही, मुली स्वावलंबी आहेत,आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत त्यामुळे पूर्वीची जुनी मानसिकता मुलांनी आणि कुटुंबीयांनी देखील बदलायला हवी.
कधी कधी मुले समजून घेऊ इच्छित असतात.पण मुलाचे आई-वडील वेगळी अपेक्षा सुनेकडून ठेवत असतात.जसे की घराचे सर्व काही पाहिले पाहिजे. मुलगा आई-वडिलांना नाही म्हणू शकत नाही,त्यांचे वय झाले आहे,आपणच त्यांचा आधार बनले पाहिजे असे म्हणून मुलीला घर देखील पूर्णपणे सांभाळ असे बीमबवले जाते.
पण हे योग्य नाही.जर खरेच नोकरी करणारी बायको हवी असेल तर घर,संसार सांभाळण्यासाठी तिला पूर्णपणे पाठिंबा दिला पाहिजे,खऱ्या अर्थाने साथ दिली पाहिजे.मग ती आपोआपच घराचे देखील तितक्याच काळजीने पाहिल जितके ती तिच्या नोकरीचे पाहते.
नोकरी असणारी बायको हवी ही अपेक्षा अजिबात चुकीची नाही.पण ह्या मागे अनेक गोष्टी दडलेल्या आहेत ह्याचा विचार मात्र लग्न होण्याआधी प्रत्येक मुलाने आणि त्याच्या कुटुंबियाने केला पाहिजे.काही जण तसा सारासार दृष्टिकोन ठेवतात देखील.पण अनेक ठिकाणी परिस्थिती गंभीर आहे.त्यामुळे काही वास्तव गोष्टी स्वीकारायला हव्यात.
मुलगी नोकरी करते.कारण तिच्या आई-वडिलांचनि तिला चांगले शिक्षण दिलेले असते.त्या साठी खूप कष्ट सोसलेले असतात.तिने देखील ही जण ठेवून अहोरात्र मेहनत करीत आपले करिअर घडवलेले असते.त्यामुळे खरेच जर का तुम्हाला नोकरी करणारी बायको हवी असेल तर प्रथम तिचा,तिच्या शिक्षणाचा, तिच्या नोकरीचा आदर करायला शिका.आणि घर -संसार फक्त तिच्या एकटीचा नाही,ह्या प्रवासात तुम्ही नेहमी तिच्यासोबत आहात याची जाणीव तिला नेहमी करून देत चला.पुरुषी अहंकार बाजूला ठेवा.नाते आपोआप फुलत जाईल.
संसार-लग्न म्हणजे नेमके हेच तर असते.एकमेकांना समजून घेणे,एकमेकांना साहाय्य करणे आणि प्रतिकूल परिस्थिती त एकमेकांचा हात घट्ट धरून एकमेकांची साथ कायम आणि शेवटपर्यंत देणे.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
खुप छान लेख आहे.
सर्वांनीच या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, स्त्री देखील एक माणूस आहे, ती काही कोणते यंत्र नाही. हे अगदी बरोबर आहे.
Khupch chan
खूप खूप छान आहे