केलेल्या मदतीमागे एखाद्याची खूप मेहनत असेल तर ती मदत नसून तुमच्या दोघांमधील ऋणानुबंध आहेत.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
“आजोबा आपण इंडिया मध्ये गेलेलो ना तेव्हा आपल्या घरी मला हा अल्बम आपल्या जुन्या कपाटात मिळाला. येताना मी सोबत घेऊन आलो. नंतर वेळच मिळाला नाही फोटो पाहायला. आज वेळ होता म्हणून मी फोटो पाहत बसलेलो, तुम्हा सर्वांची ओळख मला पटली पण यात अजून एक माणूस आहे, तो कोण आहे समजलं नाही. म्हणजे तुमचे बाकीचे मित्र मंडळी यात समजत आहेत, पण हा कोण आहे? जरा बघा ना!” निशांतने आपल्या आजोबांकडे फोटो देत विचारलं.
निशांत, त्याचे आई बाबा, छोटी बहिण सान्वी आणि त्याचे आजोबा सर्व कुटुंब अमेरिकेत राहत होत. गिरिधर म्हणजे निशांतचे आजोबा मूळचे रत्नागिरीचे. निशांतच्या वडिलांचं शालेय शिक्षण रत्नागिरीतच झालं. पुढे ते अजून शिकण्यासाठी मुंबईत गेले आणि नंतर चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळवून अमेरिकेत स्थायिक झाले. आजोबांना आपल्या मुलाचा सहवास लाभला तो मुलगा शाळेत जात होता तोपर्यंतच. नंतर जेव्हा तो अमेरिकेला गेला तेव्हा त्याने आई बाबांना खूप आग्रह केला तिथे येण्याचा. पण माणसाने स्वतःच अर्ध अधिक आयुष्य ज्या वातावरणात घालवलेले असत तिथून इतक्या सहजासहजी जाता येत नाही.
त्यामुळे ही दोघं नवरा बायको रत्नागिरीतच राहिली. नंतर मुलगा सतीश म्हणजेच निशांतचे बाबा लग्नासाठी म्हणून आले ते बायकोसोबत गेले. दोन्ही मुलांचा जन्म म्हणजेच निशांत आणि सान्वीचा जन्म अमेरिकेतच झाला. दोन चार वर्षातून एकदा मुल कधीतरी आजी आजोबांकडे येत होती. तेवढाच या दोघांना आपल्या मुला नातवंडांसोबत वेळ घालवायला मिळायचा.
परत जाताना सतीश दर वेळी आग्रह करायचा की आमच्यासोबत राहायला या. इथे एकट्याने राहू नका. तिथे आपण एकत्र राहू. पण दोघांनाही ते मान्य नव्हत. चार वर्षांपूर्वी जेव्हा आईच निधन झालं तेव्हा मात्र सतीशने ऐकलं नाही आणि तो वडिलांना सोबत घेऊनच आला. या वयात त्यांना तिथे अस एकट ठेवणं त्याला पटत नव्हत. आपण पण आता एकटे राहू शकत नाही असा विचार करून आजोबा अमेरिकेला आले.
इथे आल्यावर त्यांना रत्नागिरीची खूप आठवण येई. तिथले त्यांचे मित्र मंडळी त्यांच्यासोबत घालवलेले वेळ क्षणोक्षणी आठवे. नातवंडांना आपल्या लहानपणीच्या गमतीजमती ते अगदी खुलवून सांगत. तेवढाच आठवणींना उजाळा मिळे. आज जेव्हा निशांतने अल्बम मधील तो फोटो दाखवला तेव्हा डोळ्यात नकळत पाणी आल. जणू तो फोटो नव्हता ती एक आठवण होती जी डोळ्यांसमोर आली असावी. निशांतने ते पाहिलं, तो आजोबांच्या समोर येऊन बसला व त्याने विचारलं, “काय झालं आजोबा? तुमच्या डोळ्यात पाणी! कोण आहे ही व्यक्ती? तुम्हाला काही आठवलं का?”
डोळे पुसत आजोबा बोलू लागले. “वसु, वसुदेव माझा मित्र. मित्र कसला, भाऊ म्हटल तरी चालेल. सख्या भावाने केल नसत तेवढं केल त्याने माझ्यासाठी. आम्ही दोघं एकाच गावातले. लहानपणासूनची मैत्री आमची. कुठेही जायचं असलं तरी एकत्र. लहानपणी तर आम्ही इतक्या खोड्या केल्या की नंतर नंतर गावात आमची जोडी प्रसिद्धच झाली होती.” “लाईक जय – विरू!” निशांत म्हणाला. आजोबा हसत म्हणाले, “हो, अगदी तशीच. तुम्ही आताची मुल म्हणता ना ते crime partner तसचं होत आमचं नात. त्याच घर माणसांनी भरलेलं. पण याच मन कधी माणसांमध्ये रमल नाही.
मला म्हणायचा, गिरी तुला सांगतो स्वतंत्र एकट्याने जगण्यात जी मजा आहे ना ती या गोतावळ्यात नाही हे खर! मी त्याची मजा घेत म्हणायचो, बेटा आता अस म्हणतो आहेस, उद्या लग्न होऊन बायको घरात आली की हे सर्व विसरून जाशील. त्यावर त्याच उत्तर ठरलेलं असायचं. चल, मी आणि लग्न शक्यच नाही. मी हा असा उनाड जीव आहे बघ. आज इथे तर उद्या तिथे. पण हा तू मात्र लग्न कर. तू माणसं, नाती छान जपशील. शेवटी हे देखील खरच झालं. त्याने लग्न केलं नाही. घरातल्या माणसांशी किती वाद झाले होते त्याचे यावरून. पण हा अडून राहिला. त्याच्या घरातल्यांनी पण शेवटी हार मानली. त्याला जबाबदारी नको होती अस नव्हत.
पण त्याला कोणतच बंधन नको होत. लग्न जरी केल नसल तरी त्याने स्वतःच्या आई वडिलांची, भावंडांची जबाबदारी कधी नाकारली नाही. त्यांच्यासाठी जे काही करता येईल त्याने सर्व केल. या दरम्यान माझं लग्न झालं. खुप खुश होता तो त्यादिवशी. नंतर सतीश झाल्यावर तर त्याला आकाश ठेंगणं झालं. अगदी आपल्या पोटच्या पोराला माया लावील तसा तो सतीशला करायचा. सतीश वर त्याचा खूप जीव. मी कधी सतीश वर ओरडलो, त्याला मारलं तर हा त्याला जवळ घेऊन मलाच चार गोष्टी सूनवत असे.
बोलता बोलता आजोबांनी उसासा सोडला व ते शांत झाले. जणू ते खरच त्या काळात गेले होते. “आजोबा, काय झालं? बोला ना! कुठे हरवलाय?” निशांत आजोबांना हलवत म्हणाला. “निशु, काही आठवणी अश्या असतात ज्या शब्दांनी व्यक्त करता येत नाहीत. फक्त इतकचं सांगेन की आज जे आपण इथे राहत आहोत ते सर्व वसुमुळे झालय. तो नसता तर हे शक्यच नव्हत.” निशांतला समजल नाही. तो पुन्हा आजोबांना विचारू लागला, “आजोबा तुम्हाला नेमक काय म्हणायचं आहे? आपण इथे राहतो त्याचा वसु आजोबांशी काय संबंध? मी तर त्यांना कधी पाहिलं पण नाही.” आजोबा त्या फोटो कडे पाहत म्हणाले, “त्याचाच तर संबंध आहे.
अरे तुझ्या बाबाला पुढच्या शिक्षणासाठी मुंबईला जायचं होत. तिथे जायचा, शिकायचा खर्च काही कमी नव्हता. माझ्याकडे कुठून येणारं होते त्यावेळी इतके पैसे. ना आपली काही जमीन होती ना कोणती मोठी मालमत्ता. माझ्या नोकरीत मी कसतरी घर चालवत होतो. माझी खूप इच्छा होती सतीशला त्याच्या मनासारखं शिक्षण मिळावं. पण मी हतबल होतो. सहज कधीतरी बोलता बोलता हा विषय मी वसुकडे काढला. त्या माणसाने स्वतःच्या वाट्याला आलेली हक्काची जमीन विकली आणि माझ्या हातात पैसे आणून ठेवले.
त्यावेळी मला काय वाटलं होत मी सांगू शकत नाही. मला हा माझा स्वार्थीपणा वाटत होता. त्याला बिचाऱ्याला तरी कोण होत रे! भावंडं सर्व आपालल्या मार्गाला लागलेली, आई वडील थकेलेले. बायको मुलांची साथ मिळाली असती तर याने लग्नच केल नाही. आपलं म्हणून ज्यावर हक्क होता ते हेच होत. ते ही त्याने विकल, सतीशसाठी. ते पैसे घ्यायची माझी हिंमतच होत नव्हती.
पण त्याने आग्रह करून मला ते पैसे घ्यायला लावले. म्हणाला, अरे तो काय फक्त तुझा मुलगा आहे का? माझा कोण नाही का तो? मी माझ्या मुलासाठी केल असत तेच करतोय. ही जमीन माझ्यासाठी महत्त्वाची नाही, माझ्या मुलाचं शिक्षण महत्त्वाचं आहे. ते थांबता नये. पैसे देताना त्याने अट देखील घातली की याबद्दल सतीशला काही कळता कामा नये. सतीशला जेव्हा मुंबईला एडमिशन मिळालं तेव्हा आमच्याहून जास्त वसुलाच आनंद झाला. आम्ही पण नंतर आमच्या आमच्या रोजच्या जीवनात गुंतलो.
ह्याचा कधी एका ठिकाणी पाय राहिलाच नाही. सारखा फिरतीवर असायचा. पण रत्नागिरीला आल्याशिवाय राहायचा नाही. आल्यावर मला भेटून, सतीशची विचारपूस करूनच जायचा. असाच एकदा जो गेला तो परत काही आलाच नाही. शेवटीच भेट अशी झालीच नाही. आम्ही विचारणार तरी कुठे आणि कोणाला. याचा स्थिर असा पत्ता कधी नव्हताच. त्यावेळी जो गेला तो आजतागायत समजलं नाही तो कुठे आहे. असेल तरी की नाही काय माहीत? पण ही गोष्ट पण खरी आहे त्याची आठवण माझ्या मनात नेहमीच राहील.
ती कधीच जाऊ शकत नाही. वसुशी माझे जे ऋणानुबंध आहेत ते कधीच न तुटणारे आहेत. निशांत माणसं येतात जातात, नाती तयार होत राहतात, पण ही जी निवडक माणसं आपल्या आयुष्यात येतात ना त्यांच्याशी आपलं नातं कुठेतरी आधीच जोडलं गेलेलं असत. जे कधीच तुटू शकत नाही. जरी शरीराने आपण लांब गेलो तरी मनाने आपण अश्या माणसांपासून लांब जाऊ शकत नाही आणि हीच खरी ताकद आहे या नात्याची.”
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

