Skip to content

एखाद्यावर पूर्ण विश्वास ठेवण्याआधी या ६ गोष्टींचा नक्की विचार करा.

एखाद्यावर पूर्ण विश्वास ठेवण्याआधी या ६ गोष्टींचा नक्की विचार करा.


अपर्णा कुलकर्णी


विश्वास मिळवणे ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. पण एखाद्याचा विश्वास संपादन करण्यासाठी संपूर्ण आयुष्य लागते तर घालवण्यासाठी एक क्षण सुधा पुरेसा असतो. माझ्यावर विश्वास ठेव असे सांगावे लागणे हीच खूप दुर्दैवी गोष्ट आहे. सहज बोलताना आपण ऐकतो की विश्वास पानिपतच्या लढाईत मेला आता कोणावर विश्वास ठेवण्याचे दिवसच राहिले नाहीत. अगदी खरी गोष्ट आहे मित्रांनो, कधी कधी सहज बोलून गेलेल्या वाक्यात पण खूप तथ्यता दडलेली असते, व्यापक अर्थ असतो.

आजकाल नात्यांच्या बदलत्या ट्रेण्डमध्ये विश्वास हाच सगळ्या नात्यांचा मुळ पाया आहे हेच विसरून गेलो आहोत आपण. मग ते नातं मैत्रीचं, प्रेमाचं, नवरा बायकोचे, आई वडिलांच, बहीण भावाच किंवा मग कोणतेही असो. नात्यात विश्वास नसेल तर नात्याला अर्थच उरत नाही. एकवेळ प्रेम नसेल तर चालेल, कारण प्रेमासाठी आवश्यक असतो तो सहवास, जाणीव आणि प्रेम एकाच क्षणात फुलेल असे नाही त्यामुळे हळू हळू या भावना निर्माण झाल्या तरी चालते पण आधी विश्वास निर्माण होणे महत्त्वाचे ठरते. तरच नात्यात प्रेम निर्माण होऊन ते फुलेल, बहरेल आणि त्याला भविष्य असेल. पण विश्र्वासच नसेल तर नात्यांचे ओझे वाटायला लागते.

कोणावरही पटकन विश्वास ठेवणाऱ्या व्यक्ती प्रांजळ तसेच स्वच्छ मनाच्या आणि माणुसकीच्या असतात. अगदीच खर आहे, पण या घोर कलियुगात कोणावरही पटकन विश्वास ठेवणे हे अत्यंत धोकादायक लक्षण मानले जाते. एकदा का विश्र्वासघातकी ठेच लागली की मग माणुसकी, चांगुलपणा, विश्वास या शब्दावरचा विश्वास उडून जातो आणि कोणावरच विश्वास ठेवायला व्यक्ती धजत नाही. मानसिकता विचित्र होऊन जाते आणि निराशा येते. म्हणूनच एखाद्यावर पूर्ण विश्वास ठेवण्याआधी विचारात घ्यायला हव्यात अशा आठ गोष्टी येथे पाहूया.

१. स्वभाव :

ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवणार आहोत त्याचा स्वभाव पूर्णपणे माहीत असणे गरजेचे आहे. स्वभावातील कंगोरे माहीत असले की विश्वास ठेवणे सोपे होते. एखाद्याने एखादी गोष्ट सांगितली की लगेच दुसऱ्याजवळ बोलून मोकळे होण्याचा स्वभाव असतो अनेकांचा. म्हणजे म्हणतात ना, की एकही गोष्ट पोटात रहात नाही असा स्वभाव असतो बऱ्याच लोकांचा. किंवा मग जे सांगितले आहे त्याला तिखट मीठ लावून सांगण्याची थोडक्यात ध चा मा करण्याची सवय असते बऱ्याच जणांची. त्यामुळे ज्याला आपण आपल्या मनातील गोष्टी सांगणार आहोत त्या त्याच माणसापर्यंत राहतील याची खात्री असेल तर आपण विश्वास ठेवून बोलाव्या.

२. ओळख किती जुनी आहे ??

अनेकदा असे होते की क्षणात एखादी व्यक्ती खूप ओळखीची आहे किंवा या व्यक्तीचा आणि आपला स्वभाव सारखाच आहे असे वाटायला लागते. त्यामुळे मिळत्या जुळत्या स्वभावाच्या व्यक्तीबरोबर आपण बऱ्याच गोष्टी बोलून मोकळ्या होतो. पण कधी कधी आपला अंदाज चुकीचा ठरू शकतो. त्यामुळेच काहीच दिवसांपूर्वी किंवा महिन्यापूर्वी भेटलेल्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापूर्वी जरा विचारच करावा.

३. वैयक्तिक जीवन :

ज्याच्यावर विश्वास ठेवणार आहात किंवा जो व्यक्ती विश्वासपात्र वाटत आहे त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती असणे खूप आवश्यक आहे. म्हणजे त्याच्या कुटुंबातील व्यक्ती, घरातील वातावरण, त्याची संगत अशा सगळ्याच गोष्टीवर व्यक्तीचा स्वभाव आणि विचार अवलंबून असतात म्हणून त्याचे वैयक्तिक जीवन माहीत असणे आवश्यक आहे.

४. विचार :

वागण्यातून नव्हे तर विचारांनी माणूस ओळखावा. साधी राहणी उच्च विचारसरणी म्हणतात ना तसे, विश्वास ठेवली जाणारी व्यक्ती ही अगदी उच्च विचारांची असायला हवी. त्याचे विचार सकारात्मक आणि प्रेरणादायी असावेत.

५. व्यक्तिमत्वाची तपासणी करा :

आपल्याला एखादी व्यक्ती विश्वासपात्र वाटत असेल तर एखादी गोष्ट त्याच्याजवळ बोलून बघा आणि अपेक्षित परिणाम दिसून आले तरच पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवा. म्हणजे एखादी गोष्ट सांगून तो व्यक्ती ती गोष्ट स्वतःपुरते ठेवतो की नाही, एखादी अडचण ऐकून त्यावर योग्य तो पर्याय सुचवतो की नाही, आपल्याला त्याच्याशी बोलून खरंच मोकळे वाटते की नाही हे तपासून बघा आणि मगच त्याच्यावर विश्वास ठेवा.

६. चौकशी करा :

एखादा व्यक्ती विश्वासू वाटत असेल पण त्याबद्दल, त्याच्या स्वभवाबद्दल, आयुष्याबद्दल फारशी माहिती नसेल तर काही लोकांकडून त्याबद्दल माहिती करून घ्या. सगळीकडून सारखीच माहिती मिळत असेल तर विश्वास ठेवायला हरकत नाही असे समजा.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “एखाद्यावर पूर्ण विश्वास ठेवण्याआधी या ६ गोष्टींचा नक्की विचार करा.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!