Skip to content

सारखी काळजी करणे, हा प्रकार कमी करण्यासाठी काय करावे ?

सारखी काळजी करणे, हा प्रकार कमी करण्यासाठी काय करावे ?


हर्षदा पिंपळे


काळजी हा शब्द सर्वांच्याच अगदी जवळचा. काळजी शब्द जणू काही मीठासारखाच आहे. मीठ नसलं की जेवण कसं मिळमिळीत लागतं.अगदी तसचं या काळजीच्या बाबतीत म्हणावं लागेल.जेवणात मीठ हवं,तसं आयुष्यात काळजी ही हवीच असा आपण हट्ट करतो.

आणि मुळातच काळजी घ्यायची असते करायची नसते हे का बरं लक्षात येत नाही? काळजी ही घ्यायची गोष्ट आहे करण्याची नव्हे. पण हे आजतागायत काही कित्येकांना कळालच नाही. दिवसरात्र, उठता-बसता,खाता-पिता आपण कोणत्या ना कोणत्या काळजीत अडकलेला असतो.

मान्य आहे की,आपल्याला अनेक गोष्टींची काळजी असते.आरोग्य, रिलेशन्स, करिअर, आर्थिक, आणि सामाजिक अशा अनेक गोष्टींची आपल्याला काळजी सतावत असते.

काय होणार ? कसं होणार ? असं झालं तर? तसं झालं तर? चुकलं तर ? अशा प्रश्नांमध्येच आपण वारंवार अडकत असतो.या ठराविक प्रश्नांभोवती आपलं आयुष्य फिरत असतं.

पण खरं तर या गोष्टींची वेळ का येते तर,आपण मुळातच आधी काळजी घेत नाही.जे करायला हवं ते करत नाही.जेव्हा काळजी घ्यायची गरज असते तेव्हा काळजी घेत नाही.आणि नंतर मात्र काळजी करत बसतो.

याला काय अर्थ आहे यार ?

असो,काळजी करणं वाईट आहे असं नाही.आणि काळजी करणं नैसर्गिक आहे.परंतु अति काळजी आणि सातत्याने काळजी करणं मात्र कैकदा घातक ठरू शकतं.सारखं काळजी करत राहणं ही फार काही चांगली गोष्ट नाही. तिला वेळीच आवर घालायला हवा.

तर अनेकदा कळत नाही, काळजी नाही करायची म्हंटलं तरीही काळजी करणं काही कमी होत नाही.

तर हीच काळजी कमी करण्यासाठी आपण थोडे छोटे छोटे प्रयत्न करून पाहूया.

◆मेडिटेशन करणे –

दिवसभरात थोडा वेळ काढून स्वतःसाठी मेडिटेशन करायला हवं.मेडिटेशनचे अनेक फायदे आहेत.मेडिटेशनमुळे मन शांत,स्थिर आणि प्रसन्न राहण्यास खूप मदत होते. मनात सतत चिंता,नकारात्मक विचार डोकावत नाही.

◆छंद जोपासणे –

आपल्यापैकी प्रत्येकालाच वेगवेगळे छंद असतात.वाचन, लेखन, चित्रकला, नृत्यकला,

संगीत, वाद्य वाजवणे, गाणी ऐकणे,

असे निरनिराळे छंद प्रत्येकाला असतात.

तर त्या छंदांची जोपासना प्रत्येकाने करायला हवी.

छंदांमध्ये मन गुंतवून ठेवायला हवं.

◆व्यायाम करणे-

रोज सकाळी लवकर उठून शरिराला झेपेल इतका व्यायाम करणे.व्यायाम केल्यामुळे शरीराला

आणि मनाला सकारात्मक ऊर्जा मिळत असते.

त्यामुळे मन दिवसभर ताजंतवानं राहतं.

मनात नकारात्मक विचारांच प्रमाण कमी जाणवतं.

◆पुरेशी झोप-

पुरेशी झोप झाली नाही की चिडचिड वगैरे वाढत जाते.आपल्या शरीराला पुरेशी

झोप आवश्यक असते. झोपेअभावी वेगवेगळ्या

समस्या सहजपणे आपल्याला घेरू शकतात.

त्यामुळे कम्पलसरी झोप ही घ्यायलाच हवी.

◆अतिविचार करणे थांबवणे –

आपल्याला विचार करायची सवय असते.पण एखाद्या गोष्टीवर इतका विचार करतो की त्याला काही मर्यादा नसते.पण हाच अतिविचार अनेकदा घातक ठरतो.यामुळेच काळजी वाढत जाते.त्यामुळे विचार करा परंतु अतिविचार करू नका.

◆पोषक आहार घेणे –

इतर गोष्टींप्रमाणेच पोषक आहारही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे शक्यतो पोषक आहार घेण्यावर भर द्यावा.

◆चहा कॉफीचे अतिसेवन केव्हाही घातक ठरू शकते.याचे अतिसेवन करणे योग्य नाही.त्यामुळे शक्यतो या गोष्टी नियंत्रणात ठेवाव्यात.

◆हल्ली सोशल मीडिया सुद्धा या काळजी करण्याला कारणीभूत आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा कमीत कमी आणि योग्य वापर करा.तासनतास एखादी गोष्ट स्क्रोल करत बसू नका.

◆दिवसभरात काहीतरी प्रोडक्टीव्ह करण्याचा प्रयत्न करा.प्रत्येक दिवसाचं छान नियोजन करा.

आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काही गोष्टींची आधी काळजी घ्यायला सुरुवात करा.म्हणजे काळजी करण्याची वेळ येणार नाही.

चांगली झोप, सकस आहार घेतला तर आरोग्याच्या तक्रारी सहसा जाणवणार नाहीत. तासनतास स्क्रीनवर वेळ घालवला नाही तर डोळ्यांवर ताण येणार नाही.दिवसाचं नियोजन केलं तर वेळ सत्कारणी लागू शकतो.सकारात्मक विचार केला तर काळजी जाणवणार नाही.

अशा गोष्टी केल्या तर सारखी काळजी करण्याची वेळ येणार नाही. मनाला चांगल्या ठिकाणी गुंतवणं आवश्यक आहे.एखादी चांगली गुंतवणूक अनेकदा फायदेशीर ठरते.पहा,मनाला पॉझिटिव्हली हँडल करायला शिका.काळजी करणं नक्कीच कमी होईल.

एकच लक्षात ठेवा,

काळजी घ्यायची असते,काळजी करायची नसते.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “सारखी काळजी करणे, हा प्रकार कमी करण्यासाठी काय करावे ?”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!