वारंवार मनात येणारे घाणेरडे विचार कसे मॅनेज करावे??
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
मानवी मन जे विविध वेदना, संवेदना, भावना, विचार, स्मृती यासारख्या गोष्टींनी भरलेलं आहे. आपण कसं वागतो, कसा विचार करतो, आपल्या गोष्टी लक्षात राहणे, न राहणे ह्या सर्व व्यक्तीच्या मानसिक म्हणजेच मनाच्या बाजू आहेत. अश्या या मनाला एखाद्या विशाल समुद्राची उपमा दिली तर वावग ठरणार नाही. जसा समुद्र आपल्या पोटात कित्येक गोष्टी साठवून असतो, ज्याची आपल्याला कल्पना देखील नसते. आपल्याला समुद्राचा फक्त वरचा भाग दिसतो. त्याची खोली त्याहून खूप मोठी असते जी आपल्याला दिसत देखील नाही. ज्यात अश्या अनेक गोष्टी असतात ज्या कल्पनेपलिकडे असतात. आपलं मन देखील असच आहे. रोजच्या जीवनात आपल्याला जे वागणं बोलण दिसत, जाणवत तो मनाचा फक्त वरचा भाग असतो. त्याखाली खूप खोलवर मनात खूप काही गोष्टी असतात. ज्याला अबोध मन म्हटल जात. आपल्या दबलेल्या इच्छा, वासना, आठवणी या सर्व यात असतात अस फ्रॉइड म्हणतो. माणसाला स्वतःला याची बऱ्याचदा कल्पना नसते.
पण ही झाली unconsious mind ची गोष्ट. नेहमीच्या जीवनात वावरताना म्हणजे conscious level ला असताना आपल्या मनात इतक्या प्रकारचे विचार येत असतात की आपल्याला त्यांना टाळणं देखील मुश्किल होऊन जात. एकसारखे येणारे विचार आपल्याला बरेचदा अस्वस्थ करून सोडतात. जसं आधी म्हटल हे विचार कोणत्याही प्रकारचे असतात. त्यामुळे ते चांगलेच असतील अस नाही. बरेचदा नको ते घाणेरडे विचार देखील आपल्या मनात घर करून बसतात, वारंवार येत राहतात. घाणेरडे म्हणजे आपल्याला नको असणारे, असे विचार जे मनात आल्याने आपल्याला त्रास होतो. आपण त्याने डिस्टर्ब होतो. बरेचदा असे विचार आल्यावर आपण त्यावर काही कृती करतोच अस नाही.
OCD म्हणजेच obsessive compulsive disorder हा anxiety disorder चा एक प्रकार आहे. ही एक अशी अवस्था आहे ज्यात व्यक्तीच्या मनात एकाच प्रकारचे विचार जे टाळता येत नाहीत, असे विचार वारंवार येत राहतात आणि त्यावर कृती केल्याशिवाय व्यक्तीला चैन पडत नाही. हे चक्र चालूच राहतं. अर्थात हा एक मानसिक आजार आहे व त्याच निदान करण्याचे देखील काही निकष आहेत.
एखादी व्यक्ती एकच कृती सारखी करते किंवा त्या प्रकारचे विचार तिच्या मनात येत असतील तिला लगेच OCD आहे अस म्हणता येत नाही. तश्याच प्रकारे हे जे विचार येतात जे नको आहेत त्यावर दर वेळी कृती केली जाते अस नाही. ते फक्त येत राहतात. आता घाणेरडे विचार अस जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते फक्त सेक्सशी संबधित असतील अस नाही. असे विचार ज्याने आपल्याला त्रास होतो. सेक्स संबधित विचार डोक्यात येणं हा एक त्यातला भाग झाला. अनेक जणांच्या डोक्यात असे विचार येत राहतात. आपल्याला कोणीतरी चुकीच्या पद्धतीने स्पर्श करेल किंवा आपल्याकडून तस काहीतरी होईल, मनात सेक्स करण्यासंबधित येत असलेले विचार हे असे विचार येतात. जे आपल्याला अस्वस्थ करतात.
पण याहूनही वेगळे विचार येतात. त्यातलाच म्हणजे स्वतःला इजा पोहोचवणे, बऱ्याच जणांच्या डोक्यात स्वतः ला इजा पोहोचवण्याचे विचार येतात. ज्यात स्वतः ला दुखापत करून घेणे, इजा करून घेणे, हात कट करून घ्यावा, माझा अपघात झाला तर असे विचार येतात. स्वतः ला इजा करायचे त्याप्रमाणेच दुसऱ्या कोणालातरी इजा करण्याचे विचार पण मनात येतात.
आपण एखाद्याला मारलं तर, ढकलल तर असे हे विचार येत राहतात. आपल्याला अश्या विचारांनी आनंद मिळत नसतो की आपली तस करायची इच्छा असते. उलट हे विचार आपल्याला घाबरवून सोडतात. याचप्रमाणे समाजाच्या विरोधात जाऊन काहीतरी करण्याचे, नियम, नीतिमत्ता सोडून देण्याचे विचार, आरोग्यासंदर्भात येत असलेले विचार म्हणजेच मला कोणता असाध्य रोग झाला नाही ना अश्या प्रकारचे विचार व्यक्तीच्या मनात येतात जे त्रासदायक ठरतात.
हे जे विचार आहेत त्यांचं स्वरूपच अस आहे की व्यक्तीला त्याबद्दल अपराधीपणा येऊ लागतो, तसच भीती देखील वाटू लागते. त्यामुळे कोणाकडे तरी याबद्दल बोलावं किंवा मदत घ्यावी अस पण होत नाही. पण इथे एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की अश्या प्रकारचे विचार येण्याने आपण माणूस म्हणून कोणतरी वेगळे ठरतं नाही किंवा आपल्यात काहीतरी दोष आहे अस ही होत नाही.
आपल्या मनात जे काही येत ते खरच असेल किंवा आपण त्यावर काहीतरी कृती करूनच बसू अस होत नसत. जसं आधी म्हटल की हे असे विचार सामान्य माणूस, ocd, चिंता ग्रस्त माणूस, आरोग्यदायी माणूस कोणालाही येऊ शकतात. त्यामुळे असे विचार येणं म्हणजे आपण आजारी आहोत अस होत नाही. हे विचार आपल्याला अस्वस्थ करून सोडतात म्हणून आपल्याला त्यांना मॅनेज करायचं आहे.
१. हे विचार कुठून येतात त्याची कारण शोधणे: कारण शोधणे म्हणजेच असे ट्रिगर जे हे विचार उत्पन्न करत आहेत. आपल्या कळत नकळत असे बरेच ट्रिगर आपल्या आजूबाजूला असतात ज्यातून हे असे विचार उत्पन्न होऊ शकतात. सतत violence पाहणे, sexual content पाहणे यासारख्या गोष्टी प्रभाव पाडतात. कोरोना काळात बऱ्याच लोकांना काही झालेले नसताना देखील आपल्याला कोरोना झाला आहे अस वाटत होत. याच कारण दिवसभर त्याच बातम्या चालू असायच्या, तेच सतत पाहिलं जायचं. त्यामुळे मनात एकप्रकारची भीती बसली होती. याचा परिणाम साधी सर्दी झाली तरी कोरोना झाला अस वाटत होत. त्यामुळे हे जे ट्रिगर पॉइंट आहेत ते ओळखून ते कमी करणे.
२. स्वतःला चांगल्या माईंडफुल गोष्टींमध्ये गुंतवा: आपल्याला कश्या पासूनही पळ काढायचा नाहीये. तर अश्या गोष्टींमध्ये आपलं मन गुंतवायचे आहे जिथे आपलं मन एकाग्र होईल आणि आपली सर्जनशीलता वाढेल. मग त्यात छंद असतील, काहीतरी कला असेल. या गोष्टींना एकाग्रता लागते. अश्या गोष्टीमध्ये जेव्हा आपण गुंततो तेव्हा सहसा बाकीचे चुकीचे विचार मनात येत नाहीत. बरेचदा आपल्या मनात नको ते विचार येतात म्हणून मोबाईलच घेऊन बसणे किंवा मग हे विचार घालवायला काहीतरी व्यसन करणे अश्या गोष्टी होतात. पण हे चुकीचे मार्ग आहेत. यातून आपलं अधिक नुकसान होऊ शकत. याउलट चांगले छंद, कला ह्या गोष्टी आपल्याला सजग ठेवतात.
३. मित्र परिवार, कुटुंबासोबत वेळ घालवा: आता माणूस बराचसा एकटा पडत चालला आहे. आभासी जातात लाखोंनी माणसं जोडली गेली असली तरी प्रत्यक्षात बोलायला अस कोणी नाही. हे अस का होत आहे? कारण आपण कुठेतरी या आभासी जगात गुंतून पडलोय. अस करायचं नाहीये. घरातील माणसं, मित्र मैत्रिणी यांच्यासोबत. वेळ घालवा, गप्पा मारा, फिरायला जा. या गोष्टी आपल्याला आनंद देतील आणि यातून आपल्या मनात येणारे विचार पण कमी होऊ शकतात.
४. स्वीकारून सोडून द्यायला शिका: आपण सर्वांनी स्प्रिंग पाहिली असेल तर आपल्याला माहीतच असेल की ती जितक्या जोरात दाबली जाते तितक्या किंबहुना त्याहून जास्त वेगाने उडते, वर येते. तसेच हे विचार जर आपण दाबून टाकायला पाहिले, टाळायला पाहिले तर ते अजून तीव्रतेने येणार. त्यामुळे त्यांना आधी स्वीकारणं गरजेचं आहे. स्वीकारणं म्हणजे त्यावर काहीतरी कृती करण नाही. माझ्या डोक्यात असे विचार येत आहेत. ठीक आहे. तिथल्या तिथे त्यांना सोडून द्यायचं. त्यावर आपण परत विचार केला तर त्याचा अधिक त्रास होतो.
५. तज्ज्ञांची मदत घेणे: आपल्या बाजूने आपण सर्व प्रयत्न करायचे आहेतच. पण जेव्हा आपल्याला अस वाटेल की आपल्याला हे विचार खूप जास्त अस्वस्थ करत आहेत किंवा याचा आपल्या बाकीच्या गोष्टींवर कुठेतरी परिणाम होतोय तेव्हा आपल्याला तज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. आणि अशी मदत घेणं अगदी नॉर्मल आहे. कारण दर वेळी आपण स्वतः ला मदत करू शकतो अस नाही. आपल्याला इतरांची पण मदत लागते आणि आपण ती घेतली पाहिजे.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


लेख आवडला
विचार करणारा…मनापासुन मनाला.. सचेतन करणारा लेख