सुंदर दिसणाऱ्या नवऱ्यापेक्षा काळजी घेणारा नवराच खूप सुंदर असतो.
हर्षदा पिंपळे
सुंदर नवरा असावा असं कुणाला नाही वाटत बरं ? सर्वांना सुंदर नवरा हा नेहमीच हवाहवासा वाटतो. जगात सर्वात सुंदर माझा नवरा आहे असं मिरवत मिरवत सांगायला बायको नेहमीच तयार असते.
पण सुंदर नवरा म्हणजे नेमका कसा ?
पिळदार मिशा असलेला
नवरा सुंदर ?
गोरा , गोबऱ्या गालाचा
नवरा सुंदर ?
ताडामाडासारखा वाढलेला
उंच आणि स्लीम नवरा सुंदर ?
पैशाने श्रीमंत असलेला
नवरा सुंदर ?
नेमका कसा असतो सुंदर नवरा ?
काही जणांच्या मते असाच नवरा सुंदर असतो.त्याचं दिसणं म्हणजे त्याची सुंदरता.पण मुळातच सुंदरता म्हणजे केवळ त्याचं बाह्य सौंदर्य असतं का ? त्याचं आंतरिक सौंदर्य तितकसं महत्वाचं वाटत नाही का ?
बाह्य सौंदर्य सुंदर असणारा नवराच केवळ सुंदर असतो का ?
मुळातच बाह्य सौंदर्य आणि आंतरिक सौंदर्यामध्ये खूप फरक आहे.खरं तर आपलं आंतरिक सौंदर्य सुंदर असलं की, आपलं बाह्य सौंदर्य नैसर्गिकरित्या खुलत जातं.आंतरिक सौंदर्यावर आपलं बाह्य सौंदर्य अवलंबून असतं.बाह्य सौंदर्यावरून एखाद्याला जज करणं चुकीचं आहे.कारण काळ्या रंगाची सगळीच माणसं वाईट असतात असं नाही.आणि गोऱ्या रंगाची माणसं नेहमीच चांगली असतात असं नाही.दिसायला सुंदर नसलेली माणसं मनानेही सुंदर नसतात हा समजच चुकीचा आहे.
तर असो,
सुंदर दिसणाऱ्या नवऱ्यापेक्षा काळजी घेणारा नवरा खूपच सुंदर असतो.
कसं ते जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा.
सानिया दिसायला खूप सुंदर होती.रंगाने तशी गोरी होती.लांबसडक केस होते.प्रोफेशनने मेकअप आर्टिस्ट होती.तिला तिच्यासारखाच गोरा गोरा रंग असलेला,पिळदार मिशा असलेला, महागडे कपडे घालणारा नवरा हवा होता.तिच्या मते सुंदर नवऱ्याची व्याख्या अशीच होती.पण शेवटी त्याचा काही उपयोग झाला नाही. तसा नवरा तिला मिळालाही.परंतु त्याच्यामध्ये माणूस म्हणूनही फार चांगले गुण नव्हते.नुसताच देखणा दिवा म्हणतात नं तशी काही अवस्था होती त्याची.कधी म्हणून तो सानियाची काळजी घ्यायचा नाही. नेहमी तिला घालून पाडून बोलायचा.चार चौघात अपमान करायचा.
सानियाला मात्र तेव्हा फार वाईट वाटलं. रंगाने गव्हाळ असलेल्या निरजला रिजेक्ट केल्याचं दुःखं तिला त्यावेळी प्रचंड जाणवत होतं.ज्याला काळजी, माया ,रिस्पेक्ट काय असतं हे माहीत होतं त्याला केवळ त्याच्या दिसण्यावरून नाकारणं सानियाला खरचं खूप त्रासदायक ठरलं.तिला तिची चुक लक्षात आली.सुंदर नवरा म्हणजे नक्की काय हे तिने जाणून घेतलं.आधीच्या नवऱ्याशी फार काही जमलं नाही. शेवटी नातं तुटलं.
नंतर काही वर्षानंतर मात्र तिने दुसऱ्यांदा लग्नाचा विचार केला.पण सुंदर नवरा म्हणून तिने अचूक निवड केली होती.दिसायला अगदीच चवळीची शेंग होता.पण मनाने मात्र खूप सुंदर होता.एक सुंदर नवरा काय असतो याचं तो एक उत्तम उदाहरण होता.काळजी घेणं काय असतं हे सानिया त्याच्याकडून शिकली.”आपल्या सुखात दुःखात नेहमी सोबत असणारा नवरा सुंदर असू शकतो.”असं ती सहज बोलून गेली.
तर दिसणं matter करतं की एखाद्याचा स्वभाव हे या उदाहरणावरून लक्षात आलं असेलच.
तरीही सुंदर नवरा म्हणजे कसा हे थोडक्यात पाहूयात.
◆ बायकोच्या आजारपणात तिची मनापासून काळजी घेणे.तसेच इतर वेळीही मनापासून तिची काळजी घेणे.
◆वेळप्रसंगी घरातील गोष्टींमध्ये तिला शक्य होईल तितकी मदत करणे.
◆बायकोबरोबरच तिच्या घरच्यांचीही काळजी घेणे.त्यांनाही तितकाच रिस्पेक्ट देणे.
◆ सामंजस्याने वागणे.
◆हक्काने कान पिळला तरी चालेल परंतु कोणत्याही प्रकारची विनाकारण आरडाओरड न करणे.
◆मुलं असतील तर त्यांच्या संगोपनात तिला आवश्यक तेवढी मदत करणे.
◆प्रेग्नन्सी असो,पिरिअड्स असो किंवा अगदी नॉर्मल दिवसातही तिची प्रामाणिकपणे काळजी घेणे.
◆अपमानास्पद वागणूक न देणे.
◆चुकल्यास एखादी गोष्ट समजून सांगणे.
◆चांगल्या गोष्टीसाठी तिला प्रोत्साहन देणे.
◆तिचा आनंदासाठी घरातील वातावरण खेळतं ठेवणे.
अशा बेसिक गोष्टी एखादा नवरा करत असेल तर त्या नवऱ्याइतका सुंदर नवरा अजून कोणता ?
सांगायचा मुद्दा असा की,
सुंदर दिसणाऱ्या नवऱ्यापेक्षा काळजी घेणारा नवराच खूप सुंदर असतो.
मग तो दिसायला सुंदर असो वा नसो !
काळा / गोरा, उंच/बुटका
अशा गोष्टी पाहण्यापेक्षा काळजीचा सूर कुणामध्ये वाहतो हे लक्षात घ्या.नवरा मनापासून काळजी घेत असेल तर तो नवरा खरचं खूप सुंदर असतो.
पटतय का ? विचार करून पहा.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.