अत्यंत सामान्य गोष्टी सुद्धा तुम्ही पर्सनली घेत असाल तर हे थांबवण्यासाठीचे ५ मार्ग वाचा.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
“अग देविका आम्ही तुझ्याबद्दल बोलत नव्हतो. आमचं सहज बोलण चाललं होत तेव्हढ्यात तू आलीस. तुला उद्देशून आम्ही काहीच बोललो नाही. तु का स्वतः वर ओढवून घेते?” नितीन तिला समजावत म्हणाला. पण देविकाला मात्र ते पटलं नाही. तिला वाटलं ते तिच्याचबद्दल बोलत आहेत. गोष्ट अशी झाली की त्या सर्वांचे पेपर सुरू झाले होते. त्यामुळे सर्वांच्या चर्चेत बोलण्यात याच गोष्टीचं बोलण. कोणी किती अभ्यास केला, कसा केला, पेपरला काय येऊ शकत अशी जी एक नॉर्मल चर्चा होते तशीच सर्व मुल करत होती. बऱ्याचदा आपण अंदाज लावतो की अमुक एक प्रश्न येऊ शकतो किंवा या गोष्टीवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. पण दर वेळी तस होत अस नाही. त्याउलट पण प्रश्न अनेकदा येतात.
इथे पण असच झालं होत. अभ्यास करताना देविकाला पण अस वाटलं की असे असे प्रश्न येऊ शकतात. त्यानुसार तिने ते तिच्या ग्रुपमध्ये सांगितले आणि सर्वांनी त्यानुसार अभ्यास पण केला. पण सर्व प्रश्न काही आले नाहीत. त्याबद्दल आज सर्व मुल बोलत होती. पण इथे मुद्दाम देविकाला धरून बोलायच अस कोणाच्याही मनात नव्हत. ते सहज बोलत होते. ग्रुपमध्ये तर असे दोघं तिघं होते ज्यांना माहीत पण नव्हत की देविकाने असे काही प्रश्न suggest केले होते. तरीही देविकाने हे बोलण स्वतःच्या अंगावर घेतल. तिला वाटलं आपण सांगितल तस झालं नाही म्हणून आपल्याला ही सर्व बोलत आहेत. टोमणे मारत आहेत. बर ती सर्व जण समजावत होती तरी हिला पटत नव्हत. ती अजूनच चिडली आणि तिथून निघून गेली.
ही पहिली वेळ नव्हती जेव्हा देविकाने स्वतःच्या अंगावर काही ओढवून घेतल नव्हत. असे बरेच प्रसंग होते जिथे तिचा काहीही संबंध नसताना ती त्यात स्वतः ला गुंतवत होती. ज्याचा त्रास देखील तिलाच होत असे. कोण काही बोलत असेल, वागत असेल तर ते आपल्याला उद्देशून असणार आहे अस तिला वाटायचं. मग त्यातून चिडचड आली, वाद आले प्रसंगी रडणं आल. का? तर हे सर्व माझ्या बद्दल आहे, मीच याला कारणीभूत आहे. माझ्यामुळेच हे सर्व झालं असणार. या सर्व गोष्टी तिला दुःखी करायच्या. अश्या वेळी समरोच्या व्यक्तीने कितीही पटवून दिलं की ती गोष्ट हिच्या बाबत नव्हती तरी तिला पटत नसे. कारण तिचा स्वभावच तसा होता.
देविका प्रमाणेच अनेक लोक आपल्या आजूबाजूला असतात जी अशी वागतात. विनाकारण स्वतः वर गोष्टी ओढवून घेतात. त्यांच्या विचार करण्याची पद्धतच तशी असते. ज्यात कुठेतरी चूक असते. Cbt च्या भाषेत याला personalization असं म्हणतात. यात व्यक्ती स्वतःशी दूर पर्यंत संबंध नसलेल्या गोष्टी देखील स्वतःवर ओढवून घेते. अगदी छोट्या छोट्या गोष्टी ओढवून घेऊन, मनाला लावून घेऊन वाईट वाटून घेणे, त्रास करून घेणं अश्या गोष्टी मग होतात.
आपला मुलगा जर नीट वागत नाहीये, अभ्यास करत नाहीये तर आपणच याला कारणीभूत आहोत अस बऱ्याच आयांना वाटत. एखाद काम सुरू केलं आणि ते काही कारणाने बंद झालं तर याला मीच जबाबदार अस अनेकांना वाटत. समोरचा माणूस त्याचा म्हणून काहीतरी विषय बोलत असेल तरी तो आपल्याच बाबत बोलत आहे अस वाटून घेणे अस होत. हे सर्व करून आपण स्वतःलाच त्रास करून घेतो. म्हणून हे कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करायला लागतात.
१. स्वतःवर ओढवून घेण्याच्या या वागण्यावर लक्ष ठेवा, त्याबद्दल सजग रहा. आपण जेव्हा आपल्या अंगावर गोष्टी घेत आहोत तेव्हा आपण थेट चुकीच्या निष्कर्षावर तर उडी मारत नाही ना याकडे लक्ष द्या. खरच आपल्याला जसं वाटत त्याला काही पुरावा आहे का? आणि जरी असला तरी तो इतका भक्कम आहे का जो आपल्याशी संबधित असेल? असे प्रश्न आपण त्या त्या प्रसंगात स्वतःला विचारले पाहिजेत.
२. दुसऱ्यांच्या अश्या वागण्याचं खर कारण आपल्याला नक्की माहित आहे का? हा प्रश्न आपण स्वतः ला विचारला पाहिजे. बऱ्याचदा अस होत की त्यांच्या वागण्यामागे किंवा एखादी गोष्ट घडण्यामागे अनेक कारण असतात. ज्याचा आपल्याला अंदाज देखील नसतो. आपल्याला ती माहीत पण नसतात. ती कारण समजून घेणं गरजेचं असत. एकाच गोष्टीच्या वेगवेगळ्या बाजू असतात. आपण स्वतः वर गोष्टी जेव्हा ओढवून घेतोय तेव्हा या सर्व बाजूंचा आपण विचार करत आहोत का हो गोष्ट पण लक्षात घेतली पाहिजे.
३. लोकांच्या बोलण्याकडे खूप जास्त लक्ष द्यायचं सोडून द्या. लोक आपल्याबद्दल काय बोलतात, आपल्याशी कसं वागतात याबद्दल विचार करण्याची अनेकांना सवय असते. त्याकडे लक्ष द्यायची, नको तितकं महत्त्व द्यायची सवय असते. ज्याची खर तर काहीही गरज नाही. प्रत्येक वेळी लोक काय म्हणतात याकडे लक्ष द्यायची काही गरज नाही. कारण लोक चांगल पण बोलतात, वाईट पण बोलतात. त्यांनी कसं वागावं, बोलावं हे आपल्या हातात नाही. पण त्याला किती महत्त्व द्यावं हे आपल्या हातात आहे. त्यामुळे अश्या गोष्टींकडे जास्त लक्ष न देणं हेच शहाणपणाचे ठरते.
४. स्वतःच मूल्य ओळखा. मी माणूस म्हणून कसा आहे? माझ्यात कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत? काही कमी पडत असेल तर ते कश्याने कमी पडत आहे याची उत्तरं मिळवा. आपली सेल्फ वर्थ आपल्याला समजली की लोक काय बोलतात याकडे आपण लक्ष देत नाही. आपण कसे आहोत आपला स्वभाव कसा आहे हे आपल्याला जितकं चांगल समजेल तितकं आपण लोकांचं बोलण स्वतः ला कमी लावून घेणार.
५. समोरच्या माणसाला समजून घ्यायचा प्रयत्न करा. अनेकदा अस होत की व्यक्ती काहीतरी बोलते जे आपल्याला उद्देशून आहे अस आपल्याला वाटत. पण खरी गोष्ट ही असते की त्यांना याची कल्पना देखील नसते. त्यांना माहीतच नसत की आपण जे काही बोलत आहोत, वागत आहोत ते कोणाला तरी लागू पण होत असेल. त्यांनी ही गोष्ट डोक्यात ठेवून काही बोललेल नसत. त्यांच्या स्वभावाचा तो भाग असतो की पटकन काहीतरी बोलून जाणं. आपण जर हे समजून घेतलं तर आपण वाईट वाटून घेणार नाही.
असे हे काही मार्ग आहेत ज्यातून आपण आपली ही वैचारिक चूक कमी करू शकतो.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

