तुम्ही सध्या त्रासातून जात असाल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा.. हा त्रास नेहमीसाठीचा नाहीये.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
रोहन आज परत एकदा समुद्रकाठी येऊन बसला होता. गेले कित्येक दिवस त्याच्या आयुष्यात जी काही उलथापालथ चालली होती, त्या गोंधळात त्याला इथेच खूप शांत वाटत होत. फक्त तो आणि खळाळता समुद्र. कितीतरी वेळ तो तसाच शांतपणे त्याकडे पाहत राही. मनातलं वादळ शांत करायला इथे काहीतरी वाव आहे अस त्याला कदाचित वाटत होत. कारण घरी तर बोलायला संधी मिळत नव्हती की काही करता येत नव्हत. सारखे आरोप प्रत्यारोप, वाद. आपली बाजू मांडावी तरी कशी हे त्याला समजत नव्हत. बर ज्यांच्याकडून तो समजून घेण्याची अपेक्षा करत होते ते देखील आता बाहेरच्या माणसासारखे वागत होते.
बाहेरची लोक बोलली, नाव ठेवली तर आपल्याला इतकं लागत नाही, पण जेव्हा आपली माणसं आपल्याला अपराध्याच्या कठड्यात उभ करून प्रश्न विचारू लागतात तेव्हा अस वाटत आपण खरच काहीतरी चूक केली. ज्यांनी जवळ करून दिलासा द्यायला पाहिजे तिचं जर अशी वागतील तर आपण कोणाकडून काय अपेक्षा ठेवणार अस वाटू लागतं. हे असच काहीस रोहनच्या बाबत झालं होत. तो एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा. घरी कोणी कधी बिझनेस केला नाही तसा विचार देखील केलेला नाही. चांगली सरकारी नोकरी करून एक स्थिर आयुष्य जगायची सर्वांची मानसिकता. त्याचे बाबा असतील किंवा घरातली बाकी मोठी माणसं असतील अश्याच पद्धतीने आयुष्य जगली होती. अश्या आयुष्यात जो एक comfort zone असतो त्याची देखील सर्वांना सवय लागली होती.
त्यामुळे साहजिक आपण जसं एक व्यवस्थित स्थिर आयुष्य जगत आलो किंवा जगलो तसच आपल्या मुलांनी
जगावं अस त्यांना वाटत होत. चांगल शिक्षण घेऊन सरकारी नोकरी पाहून ती करावी अशी रोहनच्या वडिलांची खर तर इच्छा. आईच असच मत नसल तरी ती वडिलांच्या विरोधात पण नव्हती. त्यामुळे एकमत हेच होत की आपल्या मुलाने पण अश्याच पद्धतीने आपलं आयुष्य जगल पाहिजे. नोकरी लगेच लागली की त्याचं लग्न लावून देता येईल. त्याचा संसार सुरू होईल, आयुष्य मार्गी लागले अशी एक त्यांची समजूत.
पण रोहन वेगळा होता. जरी त्यांच्या घरात कोणी बिझनेस केला नसला तरी त्याला आधीपासून हेच वाटत होत की आपण बिझनेसच केला पाहिजे. त्याला सरकारी नोकरी करण्यात कधीही स्वारस्य वाटल नाही. त्याचा कल हा सुरुवातीपासूनच आपलं स्वतःच काहीतरी निर्माण करावं याकडे होता. त्यासाठी त्याच्या डोक्यात काही कल्पना देखील घोळत होत्या. कॉलेज करताना तो मधे मधे ही गोष्ट दोघांच्याही कानावर घालत असे. पण तेव्हा आई बाबांना वाटलं कॉलेज मध्ये मुलांना अस वाटत. तेव्हा वय पण लहान असत. इतरांची काम पाहून लगेच प्रभावित होतात. त्यामुळे त्यांना अशी काही चिंता नव्हती की हा खरच बिझनेस वगैरे करेल.
पण कॉलेज संपल्यावर जेव्हा रोहनने त्याची इच्छा बोलून दाखवली तेव्हा मात्र त्यांना ही गोष्ट पटली नाही. या गोष्टीवरून परत वाद झाले, आपल्या घरात अस याआधी कोणी केल नाही. तुलाच का यात पडायचं आहे. एक स्थिर आयुष्य मिळत असताना तुला हे अस्थिर आयुष्य का हवय? बिझनेस करण म्हणजे साधी गोष्ट नाही. आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांसाठी तर नाहीच नाही. एक ना दहा गोष्टी त्याला ऐकायला मिळाल्या. पण तो देखील जिद्दी होता. एकदा एखादा निर्णय घेतला तर त्यावर अडून राहायचं, त्यावर ठाम राहायचं असा त्याचा स्वभाव होता. त्यामुळे घरातून कितीही विरोध असला तरी त्याने त्याचा निर्णय बदलला नाही.
कॉलेज मध्ये असतानाच तो पार्ट टाईम जॉब करत होता. त्यातून मिळालेले पैसे आणि त्याने आधीपासून साठवेलेले पैसे होते. आई जरी बाबांच्या विरोधात काही बोलली नसली तरी शेवटी तिला आपल्या मुलाला एकट पडू द्यायचं नव्हत. तिला यातलं काही माहीत नव्हत, पण आपला मुलगा जर अस काही करत आहे तर नक्कीच त्याने याचा नीट विचार केला असणार अस तिला वाटत होत. म्हणून तिने तिच्याजवळ असलेले काही पैसे त्याला दिले.
रोहन ते पैसे घेत नव्हता. कारण बाबांना हे आवडल नसत. पण तिने आग्रह करून त्याला ते घ्यायला लावले. बिझनेस चांगला सुरू झाला की तुझे पैसे परत करेन या अटीवर त्याने ते घेतले. अस करून स्वतःच्या एका मित्राला सोबत घेऊन त्याने स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू केला. पहिलाच प्रयत्न होता, पैसे पण गुंवतले होते. आश्चर्य म्हणजे सुरुवात पण छान झाली. पण शेवटी आयुष्य म्हणजे एक रोलर कॉस्टर राईड आहे. आता आपण वर असलो तर कधी खाली येऊ समजणार नाही. तसच झालं. सर्व काही ठीक चालेलेल असताना त्याला बिझनेस मध्ये खूप लॉस झाला. गुंतवलेले पैसे पण मिळवणं मुश्किल झालं. हा त्याच्यासाठी एक मोठा धक्का होता. त्यात भर म्हणून की काय टोमणे पण मिळू लागले. मी आधीच सांगितल होत हे असल करण आपल्या रक्तात नाही.
आपल्याला जी गोष्ट येत नाही ती करायला गेलं की असच होत. जितकं नुकसान केलस तेव्हढा पैसा मिळवायला किती मेहनत लागते हे तुला नाही समजणार. त्यात आईने पैसे दिले होते ते देखील समजलं होत. त्यामुळे त्याबद्दल पण बोलून घ्यावं लागत होत. गप्प बसण्याशिवाय त्याच्याकडे काही पर्याय नव्हता. याच कारण त्याने व्यवसाय करायला घेणं हे नव्हत. तर त्याने आईचे पैसे पण घालवले होते याचा अपराधीपणा त्याच्या मनात कुठेतरी होता. जे काही झालं ते कसं काय पुन्हा नीट करता येईल यावर विचार करण्याची संधी पण मिळत नव्हती. कारण घरी बसलेलं दिसल तरी बाबांच बडबडण सुरू होई. त्याची अस्वस्थता, दुःख कोणीच समजून घेत नव्हत.
आता एका टप्प्यावर आपण यातून बाहेर तरी पडू शकतो का नाही असा त्याला प्रश्न पडत होता. बर हा त्रास कोणाला नीट सांगता पण येत नव्हता. सर्व बाजूंनी जेव्हा आपण कसे चुकीचे आहोत हे भासावल जात तेव्हा खरच स्वतःवर शंका येऊ लागते. तस त्याच झालं होत. म्हणून तो हल्ली समुद्रावर येऊन बसे. पुढे काय करायचं याचा विचार करी. घरी जाताना आज काय ऐकायला मिळेल अस वाटून तो अस्वस्थ होई. असाच आज तो किनाऱ्यावर बसला होता. घरी जायला निघणार तेव्हड्यात लाटेसोबत एक बाटली वाहत आली. ती साधी बाटली नव्हती. त्याच्या आत एक कागद होता व त्यात काहीतरी लिहिलेले होत. त्याने तो कागद बाहेर काढला व त्यात जे काही लिहिलं होत ते वाचलं. ते अस होत,
“No situation is the same;
Either it’s good or bad, happy or painful
It takes courage to start new life and
courage doesn’t always roar
Sometimes courage is the little voice
At the end of the day that says
I’ll try again tomorrow.”
रोहन साठी हे शब्द साधे नव्हते. इतक्या दिवसात जी निराशा मनात दाटून आले होती, जो त्रास तो सहन करत होता त्यात हे शब्द त्यासाठी आशेचा किरण बनून आले होते. मनात कुठेतरी एक नवीन उर्मी, आशा जागी झाली की अजूनही वेळ गेलेली नाही आणि हे दिवस नक्की आपण बदलू शकतो. तो उत्साहाने उठला व घराच्या दिशेने जाऊ लागला. असेच काहीसे प्रसंग आपल्या आयुष्यात येतात. इतका त्रास जाणवतो की आपल्याला वाटत हा त्रास न संपणारा आहे. आपण आता यातच अडकून राहणार. पण अस नाही. कोणतीही परिस्थिती कायम राहत नाही. ती बदलते. हे इतकं जरी आपण लक्षात ठेवलं तरी आपल्या मनात एक आशा निर्माण होईल आणि आपण ती परिस्थिती बदलण्यासाठी काही प्रयत्न करू.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

