तुमच्या घरचे फारच टोकाकडच्या निराशेत असतील तर या गोष्टी नवचैतन्य आणू शकतात.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
आताचा काळ हा इंटरनेट, टेक्नॉलॉजीचा काळ आहे. सर्व जग कस फास्ट, वेगवान होत चाललं आहे. पूर्वीसारखं आता काही राहिलेले नाही. नवनवीन बदल होत आहेत. मग ते शिक्षणामध्ये असतील, कामामध्ये असतील, समाजामध्ये असतील किंवा मग वेगवेगळ्या ज्या व्यवस्था आहेत त्या मध्ये असतील. आता व्यवस्था म्हटल की त्यात अनेक गोष्टी आल्या. त्यातलीच एक आणि महत्त्वाची म्हणजे कुटुंब व्यवस्था. ज्याला विशेषतः भारतात खूप महत्त्व आहे. भारतीय कुटुंब पद्धती, कुटुंब व्यवस्था, नातेसंबंध यांना आपल्या इथे पहिल्यापासून, अगदी प्राचीन काळापासून विशेष स्थान देण्यात आले आहे, त्यांचे महत्त्व आहे. पण आता, जसं म्हटल सर्व गोष्टी बदलत चालल्या आहेत. त्यातच कुटुंब व्यवस्था, संस्था, त्याच स्वरूप, नात्यांच्या व्याख्या बदलत चालल्या आहेत.
पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती. एकाच घरात तीन चार पिढ्या तरी एकत्र राहत. आजी आजोबा, मुल, काका काकू, नातवंडं. घर म्हणजे एकप्रकारे गोकुळ असायचं. अजूनही काही ठिकाणी गावांमध्ये अशी एकत्र कुटुंब आहेत. पण पूर्वी जे प्रमाण होत ते मात्र आता कमी झालेलं दिसत. शहरीकरण, नोकरी, व्यवसाय, सामाजिकीकरण, व्यक्ती स्वातंत्र्य यासारख्या कारणांमुळे आता कुटुंब व्यवस्था पण बदलत आहे. एकत्र कुटुंब पद्धती होती तिथे आता विभक्त कुटुंब पद्धती आली आहे. ज्यात आई वडील आणि त्यांची मुलं इतकचं कुटुंब असत. या दोन्ही गोष्टींच्या पुढे जाऊन आता सिंगल पेरेंटिंग, लग्न झाल्यावर एकच मुल किंवा मुलच नको अशी एक नवी पद्धती तयार होत आहे. घर माणसांनी त्यांच्या आवाजाने दुमदुमत असे तिथे आता एकप्रकारची शांतता पसरली आहे. कारण नाती, त्यांचं स्वरूप बदलत चालल आहे. एकाच घरात राहून प्रत्येकाचं एक वेगळं विश्व तयार झालं आहे. संवाद, भेटणं, बोलण कमी होत चाललय.
एकत्र कुटुंब पद्धतीचा फायदा हा होता की तिथे सोबत असल्याची जाणीव खूप जास्त असायची. चांगल्या वाईट परिस्थितीमध्ये सोबत करायला, आधार द्यायला आपली माणसं आपल्याबरोबर होती. त्यावेळी समस्या नव्हत्या का? होत्या. पण घरात इतकी माणसं असायची की त्यांच्याशी बोलून, एकमेकांच्या मदतीने आपण आपली समस्या सोडवू शकत होतो.
आपल्याला माहीत होत की आपण एकटे नाही आहोत आपल्याला यातून बाहेर काढायला कोणतरी आहे. मग ते आजी आजोबा असतील, आई वडील, काका कोणीही असतील. फक्त याच बाबतीत नाही, तर आपल्या आयुष्यात आपण जे काही यश मिळवत असू, चांगल्या गोष्टी करत असू, त्या सांगायला त्यांचा साक्षीदार व्हायला पण कोणतरी होत. सण असुदे, वाढदिवस, बाकी कोणते कार्यक्रम सर्व एकत्र असायची, उत्साहाच वातावरण घरात असायचं. त्यामुळे माणूस कधी एकटा पडला नाही. काहीही झालं तरी आपण एक कुटुंब आहोत, आपल्याला ही नाती टिकवायची आहेत, पुढं न्यायची आहेत ही जाणीव मनामध्ये होती. त्यामुळे समजा कोणी निराश असेल तरी उभारी देणारे चार हात पुढे होते. हे यातलं यश होत.
आता घरात माणसचं कमी असतात, जी असतात ती स्वतःच्या कामात इतकी गुंग असतात की आपल्याच घरात जी दुसरी व्यक्ती आहे त्याच्या आयुष्यात काय चालू आहे, त्याला कसं वाटत, तो/ती कशी आहे, याबद्दल पण काही माहीत नसत. पहिल्यासारखा जो मोकळा संवाद होता तो राहिलेला नाही, त्यामुळे जे काही सांगावस वाटत ते मनातच राहत. मग ते सुख असुदे किंवा दुःख. व्यक्त करायचं कोणासमोर असा प्रश्न पडतो. कामाच्या व्यापात माणूस इतका व्यस्त झालाय की ज्या गोष्टी सुरुवातीला साजऱ्या केल्या जायच्या, ज्यांचे सोहळे व्हायचे ते देखील केले जात नाहीत.
या सारख्या गोष्टीमुळे घरात माणसं असूनदेखील माणूस एकटा पडतोय, निराश होतोय. आणि खंत ही आहे की आपल्याच घरातलं माणूस अस मनातल्या मनात कुठेतरी निराश आहे, हताश आहे आपल्याला समजत देखील नाहीये. कारण या गोष्टी आतल्या आत दाबून ठेवल्या जातात. नंतर कधीतरी याचा विस्फोट होतो जो खूप त्रासदायक असतो. म्हणून वेळीच आपल्या माणसांना जपणं, त्यांच्या मदतीला जाणं खूप गरजेचं आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे माणूस आता एकटा होतोय, निराश होतोय. जर तुमच्या घरातले अश्या प्रकारे निराश असतील, टोकाच्या निराशेत असतील तर आपण स्वतः हुन काही गोष्टी केल्या पाहिजेत ज्या त्यांना चैतन्य मिळवून देऊ शकतात.
१. संवाद: ही आताच्या काळात खूप महत्त्वाची गरज बनलेली आहे. बोलणंच होत नाही त्यामुळे गैरसमज निर्माण होतात, माणूस एकटा पडतोय. अश्या वेळी आपल्या घरातल्या व्यक्तीशी मनमोकळेपणे बोलण, गप्पा मारणं खूप आवश्यक आहे. इथे आपल्याला त्यांच्या दुःखाला मुद्दाम पॉइंट आऊट करायचे नाही. किंवा त्याला केंद्रस्थानी ठेवून बोलायचे नाही. आपल्याला फक्त ही जाणीव त्यांना करून द्यायची आहे की काहीही झाल तरी मी तुझ्यासोबत आहे. तुझी मनात जे काही आहे ते तू मला सांगू शकतो/शकते. तु एकटी/एकटा नाही. इतकी जाणीव पण टी माणसाच्या आयुष्यात बऱ्याचदा फरक पाडून जाते.
२. आवडीच्या गोष्टी करणे: त्या व्यक्तीला जे काही आवडत ते करायचा प्रयत्न करा. छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद निर्माण करायचा प्रयत्न करा. त्यांना एखाद छान गिफ्ट देणं, वाढदिवस असेल तर तो साजरा करण, सरप्राइज देणं. लहानपणीचे मित्र मैत्रिणी असतात त्यांची जरी भेट घडवून आणली तरी माणूस आनंदी होतो.
कारण या लोकांसोबत माणसाच्या खूप आठवणी, चांगल्या आठवणी असतात. त्यांना उजाळा मिळतो. यातून आताच्या दुःखाचा विसर पडायला मदत होते. त्यामुळे अश्या भेटी घडवून आणणं, त्यांनी काही यश मिळवलं असेल तर त्याचा सोहळा करण, छोटा का असेना पण आपण ते विचारात घेऊन करतोय हे खूप महत्त्वाचं ठरत.
३. बाहेर फिरायला जाणे: बरेचदा त्याच वातावरणात राहून माणसाची एकप्रकारची मानसिकता बनते. तेच तेच डोक्यात साठून राहत. यात बदल व्हावा म्हणून बाहेर कुठेतरी फिरायला जाणे, ट्रीप काढणे, फॅमिली गेट टू गेदर असेल अश्या गोष्टी केल्या तरी माणसाला उत्साह येतो. रोजच्या वातावरणातून बाहेर आल्याने मन उल्हसित होते. माणस भेटतात, गप्पा गोष्टी, खेळ हे सर्व केल्याने माणूस ताजातवाना होतो.
४. त्यांना आवडणाऱ्या गोष्टी करायला लावणं: माणूस जेव्हा खूप निराश असतो तेव्हा त्याला काही कारावस वाटत नाही. कोणत्याच गोष्टीत मन लागत नाही. अश्या वेळी जर त्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी मुद्दाम करायला लावल्या तर आपलं माणूस सांगत म्हणून ते प्रयत्न करून पाहतात. मग एखाद्याला छान गाणे म्हणता येत असेल तर त्याच्याकडे ती फर्माईश करण, चांगल जेवण करत असेल तर त्यासाठी प्रेरित करण या गोष्टी आपण करू शकतो. यात तुम्ही कुठेतरी दुःखी आहात म्हणून आम्ही हे करायला सांगतो अस अपेक्षित नाही. जसं आपण एरवी जितक्या सहजेतेने हक्काने या गोष्टी सांगतो तश्याच करायच्या.
५. तज्ज्ञाची मदत घेणं: बरेचदा माणूस अश्या निराशेतून जात असला तर घरातल्या माणसांचा दृष्टिकोन वेगळा असतो. इतकं काय झालं? सर्व ठीक आहे. विनाकारण त्रास करून का घ्यायचा अस बोललं जात. यातून एकतर त्यांचा त्रास नाकारला जातो आणि त्याचबरोबर त्यांच्या मनात आपल्याला कोण समजून घेत नाही अशी जाणीव निर्माण होते. अस न करता त्यांना जे काही वाटत आहे ते नीट ऐकून घेणं, त्यांच्यावर विश्वास दाखवणं, काही त्रास जाणवत असेल तर तो जाणवू शकतो हे आधी पटवून देण; कारण अजूनही मानसिक त्रासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही.
असा काही त्रास जाणवत असेल तर ती सांगण्यासारखी गोष्ट नाही अस मानलं जात. अस न करता जसा शारीरिक त्रास जाणवू शकतो तसच मानसिक त्रासही जाणवू शकतो आणि त्यासाठी आपल्याला हवी ती मदत मिळू शकते हा विश्वास आपण त्यांना द्यायचा आहे. आपण आपल्या बाजूने जर हा मोकळेपणा दाखवला तर ती व्यक्ती तज्ञाकडून मदत घ्यायला तयार होते. कारण जितका विश्वास आपण आपल्या घरातल्या व्यक्तीवर ठेवतो तितका बाहेरच्या, अनोळखी व्यक्तीवर ठेवत नाही. म्हणून आपण हा विश्वास निर्माण करण गरजेचं असत.
अश्या प्रकारे या सारख्या गोष्टी करून आपण पुन्हा एकदा त्यांना आशेचा किरण दाखवू शकतो.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


छान