एकदा का परिस्थिती तुम्ही स्वीकारली तर कोणीही तुम्हाला डीवचू शकणार नाही.
अपर्णा कुलकर्णी
आज पुन्हा एकदा स्वराने घर सोडले होते तिच्या छोट्या छकुलीला घेऊन पण यावेळी मात्र कायमचे. त्याला कारणही तसेच होते. अनेकदा तिने संधी दिली होती तिच्या नात्याला कधी स्वतःसाठी, कधी छकुलीसाठी तर कधी समाजासाठी. पण यावेळी मात्र तिच्या संयमाचा बांध फुटला होता. आता काही केल्याने ती तिचा निर्णय बदलणार नव्हती. घर सोडले तेंव्हाच पूर्ण मानसिक तयारी तिने करून ठेवली होती अफाट संघर्षाची.
एक नवऱ्याचा आधार नसलेली बाई त्यात पदरात पोर घेऊन कुठे जाणार होती. आर्थिक बाजू अतिशय कमकुवत असल्याने तिला माहेरचा आधार घ्यावा लागणार होता हे स्पष्ट होते. पण तिथेही फार दिवस राहण्याची तिची इच्छा नव्हती. घरातील लोकांना हे नेहमीचेच झाले होते. स्वराचे लग्न झाल्यापासून चार महिने सासरी आणि नऊ महिने माहेरी गेले होते. खूपदा तिने तिच्या नवऱ्याला चेतनला संधी दिली होती नीट वागण्याची. एकतर त्याला वंशाला वारस म्हणून मुलगा हवा होता पण मुलगी झाली म्हणून तो स्वराला घालून पाडून बोलत होता, सतत अपमान करत होता. बऱ्याचदा ड्रिंक करून येई आणि त्यात वाट्टेल तसा वागत होता. दुसरा चान्स घेण्याची त्याची इच्छा नव्हती कारण आर्थिकदृष्ट्या दोन मुलांना सांभाळू शकेल इतकी त्याची परिस्थिती चांगली नव्हती.
पण यात काहीच दोष नसलेल्या स्वरा आणि छकुलीला तो खूप त्रास देत होता. स्वरा समजावून कंटाळली होती. परोपरीने तिने चेतनची समजूत काढण्याचा प्रसंगी स्वतः नोकरी करण्याचा विचार त्याच्यासमोर मांडला होता. पण चेतनला मात्र काहीच मान्य नव्हते.
कालच रात्री चेतनने दारूच्या नशेत स्वराला खूप मारहाण केली होती आणि छकुलीला उचलून फेकून दिले होते त्यामुळे तिच्या डोक्याला बरीच दुखापत झाली होती. त्यामुळे स्वराने कायमचे घर सोडले. माहेरी सगळा प्रकार तिने सांगितला आणि समाज तसेच नातेवाईक कोणी तिला सुखाने जगूच देईना. स्वरालाही या गोष्टींची कल्पना होतीच पण आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी आणि छकुलीचे पालन पोषण करण्यासाठी तिला घरच्यांना दुखवायचे नव्हते. शिवाय घरच्यांनी बऱ्याचदा दिलेला आधार ती विसरू शकत नव्हती.
त्यामुळे कोणालाही बोलून न दुखवता लवकरात लवकर स्वतःच्या पायावर कसे उभे राहता येईल याचाच ती विचार करत होती. रोज कोणी ना कोणी येऊन तिला मनस्ताप देत होते पण मौनव्रत धारण केल्याप्रमाणे ती सगळ्यांचे ऐकून न ऐकल्यासारखे करत होती. स्वराचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले होते पण खूप प्रयत्न करूनही तिला नोकरी काही मिळत नव्हती. त्यामुळे स्वराचे मानसिक खच्चीकरण होत होते. रोज विचार करून करून डोके फुटायची वेळ आली होती तिच्यावर. त्यात आई वडिलांना फारसे बोलू शकत नसल्याने फारच कुचंबणा वाढतच चालली होती स्वराची. बराच प्रयत्न करून कशीतरी स्वराला छोट्या पगाराची नोकरी मिळाली. तिथे नोकरी करत असताना बरीच माणसे तिला भेटली आणि मन गुंतून गेले कामात. त्यामुळे स्वराचा मानसिक ताण बराच कमी झाला आणि ती बऱ्याच प्रमाणात हसून खेळून वागत होती.
तिथेच तिला एक छान मैत्रीण मिळाली होती जिच्याशी बोलून तिचे मन हलके आणि शांत होत होते. बऱ्याच दिवसांच्या बोलण्याने चित्राला म्हणजे स्वराच्या मैत्रिणीला स्वराची परिस्थिती लक्षात आली होती. तिच्या हे ही लक्षात आले होते की स्वरा नोकरी करत असल्यापासून तिचे कामात मन गुंतले आहे आणि हसून खेळून रहात आहे. पण हे फारसे मनापासून घडत नाही. कुठे ना कुठे स्वरा सतत ताणाखाली आहे, घरात गेले की पुन्हा ती त्याच टेन्शन खाली जात आहे. सगळ्यांशी फारशी मिळून मिसळून राहू शकत नाही प्रत्येक गोष्ट करण्याआधी खूपदा स्वतःपेक्षा समाजाचा जास्त विचार करते. चित्राने तिला सांगितले एखाद्या परिस्थितीचा कितीही विचार केला तरीही ती बदलत नाही. टेन्शन घेतल्याने प्रश्नाचे उत्तर मिळत नाही तर उलट आहे ती परिस्थिती आहे तशी स्वीकारल्याने, वास्तव स्वीकारल्याने तुम्हाला कोणीही डिवचू शकत नाही. स्वराने त्यावर शांतपणे विचार केला आणि तिलाही ते पटले.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

