स्वतःवर प्रेम करण्याचे हे २५ मार्ग माहीत आहेत का ?
हर्षदा पिंपळे
स्वतःवर प्रेम करणं हे दुसऱ्यांवर प्रेम करण्याइतकच सुखावणारं आहे.आपण जर स्वतःवरच प्रेम करत नसू तर आपल्या जगण्याला काही अर्थ नाही.आपण नेहमी दुसऱ्यांसाठी झटत असतो.नेहमी इतरांना काय हवं नी काय नको याचा विचार करत असतो.या सगळ्यामध्ये आपण स्वतः मात्र कुठेच नसतो.
परंतु आपण कायम ताजेतवाने आणि मनाने जिवंत राहिलो तर आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंदाची बाग अधिक उत्साहाने फुलवू शकतो.मग विचार करा,स्वतःचं मनाने जिवंत असणं किती महत्त्वाचं आहे.म्हणूनच इतरांवर जसं आपण प्रेम करतो तसचं प्रेम आपल्याला स्वतःवरही करता यायला हवं.
अनेकदा आपण इतरांवर प्रेम करण्यासाठी बरचं काही शोधून काढतो.कितीतरी गोष्टींची यादी आपल्याकडे सहजच उपलब्ध झालेली असते.पण स्वतःसाठी ? स्वतःसाठी मात्र ही यादी शून्यातच असते.स्वतःवर नेमकं कसं प्रेम करायचं तेच आपल्याला कळत नाही.तर म्हणूनच आपण आज स्वतःवर प्रेम करण्याचे काही मार्ग पाहणार आहोत.
चला तर मग…. जाणून घेऊयात.
१)स्वसंवाद :
आपण इतरांशी तासनतास बोलत राहतो.पण स्वतःशी बोलणं काही आपल्याला जमत नाही. पण स्वसंवाद हा अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे किमान एकदा तरी दिवसातून स्वतःशी थोडासा संवाद साधा.
२)क्षमाशीलता:
इतरांना माफ करतो तसं स्वःतालाही माफ करणं जमायला हवं.क्षमाशीलतेच्या सरी स्वतःसाठी सुद्धा तितक्याच आवश्यक आहेत. आपण केलेल्या हजारो चुकांसाठी आपणच आपल्याला क्षमा करणं आवश्यक आहे.स्वतःला माफ करणही जमायला हवं नं !
३)रिस्पेक्ट/आदर करणे :
स्वतःविषयी मनात नम्रभाव हवा.नेहमी स्वतःचा आदर करायला हवा. जो रिस्पेक्ट आपण इतरांप्रती दाखवतो तो आपण स्वतःसाठीही दाखवायला हवा.
४)तुलना न करणे :
स्वतःची तुलना इतरांशी न करणे.मग त्या स्वतःच्या क्षमता असो वा इतर कोणत्या गोष्टी.
५)स्वतःला अनुभवणे :
एखाद्या म्युझिकसारखं स्वतःला अनुभवायला शिका.स्वतःचा आस्वाद घ्यायला शिका.
६)आवडीचे छंद जोपासणे :
स्वतःला असणारे छंद आवर्जून जोपासणे.गाणं,रंगकाम,बागकाम,किंवा आवडीचा एखादा खेळ खेळणे.
७)मनापासून हसणे:
धावपळीमध्ये आपण मनापासून हसणं विसरतो.कधीतरी मनापासून खळखळून हसणं गरजेचं आहे. हसणं आपण विसरता कामा नये.
८)स्वतःला वेळ देणे :
दिवसभरात आपण खूप बिझी असतो.आपल्याकडे सगळ्यांसाठी वेळ असतो. इतकच नाही तर आपण इतरांसाठी आवर्जून वेळ काढतो.अगदी तसाच वेळ आपण स्वतःलाही द्यायला हवा.स्वतःसाठी वेळ देणं आपल्या लिस्टमध्ये असायलाच हवं.
९)स्वतःवर विश्वास ठेवणे :
कुठल्याही परिस्थितीत स्वतःवरचा विश्वास ढळू न देणे.मी हे करू शकतो असा स्वतःवर विश्वास ठेवणे.कुणाचा नसला तरी माझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे हे स्वतःला ठणकावून सांगणे.
१०)आत्मपरीक्षण करणे :
आत्मपरीक्षण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. महिन्यातून किमान एकदा तरी आत्मपरीक्षण करायलाच हवं.आत्मपरीक्षणामुळे बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात.
११)विश्रांती देणे:
स्वतःला थोडी विश्रांती देणे.आपलाही जीव थकतो नं ?म्हणून
१२)स्वतःला जाणून घेणे :
स्वतःचे गुण,दोष ,इच्छा, स्वप्नं अगदी स्वतःचा बारीक सारिक गोष्टी जाणून घेणे.
१३)जबाबदारी घेणे :
स्वतःची जबाबदारी कोण घेणार ? आपली जबाबदारी आपल्याला घेता यायला हवी.
१४)स्वतःला प्राधान्य देणे :
स्वतःलाही प्रथम प्राधान्य देणे.नेहमीच आपल्या प्रायोरिटी लिस्ट मध्ये आपण शेवट असतो.म्हणूनच कधी कधी स्वतःलाही प्रथम प्राधान्य द्यायला विसरू नये.
१५)स्वतःची ताकद ओळखणे :
आपण काय करू शकतो ? आपली खरी ताकद काय आहे याचा अंदाज घेणे.
१६)कौतुक करणे :
छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्वतःचं कौतुक करणे.स्वतःच्या पाठीवर स्वतःच कौतुकाची थाप देणे.
१७)स्वतःला पत्र लिहीणे :
स्वतःला आपण कधी पत्र लिहीत नाही. पण तरीही एकदा स्वतःला पत्र लिहून स्वतःविषयी असणाऱ्या सगळ्या भावना व्यक्त करा.
१८)स्वतःच्या शरिरावर प्रेम करणे :
आपल्याला कुणी बेढब ,जाडं बोललं तरी फारसं मनावर घ्यायचं नाही. आपल्या शरीराची योग्य काळजी घेऊन आपणच आपल्या शरिरावर प्रेम करायचं.
१९)प्रामाणिक राहणे :
स्वतःशी प्रत्यक्ष गोष्टीत प्रामाणिक राहणे.
२०)स्वतःला तणावमुक्त ठेवणे :
कुठलाही अतिरिक्त ताण न घेणे.शक्यतो स्वतःला ताणापासून दूर ठेवणे.
२१)स्वतःच्या आवडी निवडी ओळखणे :
स्वतःला काय आवडतं आणि काय आवडत नाही ते ओळखणे.
२२)काळजी घेणे:
झाडांची, प्राण्यांची, आपल्या माणसांची जशी आपण काळजी घेतो तशीच काळजी आपण आपल्या स्वतःची घेतली पाहिजे.
२३)स्वतःप्रती कृतज्ञता व्यक्त करणे :
इतरांसाठी, स्वतःसाठी केलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी स्वतःप्रती छोटीशी कृतज्ञता व्यक्त करणे.स्वतःला मनापासून थँक्यु बोलणे.
२४)स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे.दोन्हींचं स्वास्थ्य राखणं म्हणजे स्वतःवरच्या प्रेमाचाच एक भाग आहे.
२५)स्वतःला आहे तसं स्विकारणे.
स्वतःतील गुण-दोष ओळखून स्वतःला आहे तसं स्विकारणे. उंच/ठेंगण, काळं नी गोरं असं काही मनात न ठेवता आहे तसं स्वतःला बिंधास्त स्विकारणे.
पहा, असे हे वेगवेगळे पंचवीस मार्ग…. स्वतःवर प्रेम करण्यासाठी नक्कीच पुरेसे आहेत. तर या सगळ्याचा आपण नक्की विचार करायला हवा.
स्वतःवर भरभरून प्रेम करायला हवं.स्वतःवर प्रेम करणं चुकीचं नाही तर गरजेचं आहे. इतकच ते प्रेम निःस्वार्थी असायला हवं. त्यात कुठलाही स्वार्थ असता कामा नये.
तर मित्रांनो,
स्वतःवर प्रेम करा.जगण्याचा पुरेपूर आनंद घ्या.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

