या ७ प्रकारच्या आरामाची प्रत्येकाला गरज असते.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
प्रत्येक माणसाला आरामाची आवश्यकता असते. आताच्या धावपळीच्या युगात माणसाला नीट झोपायला पण वेळ मिळत नाही. इतकं जास्त माणसाने स्वतःला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवलं आहे. काम तर आहेच पण त्याशिवाय फोन त्यावर तासनतास राहणं हे पण आता एक कारण बनले आहे. आपल्याला गरजेचा आहे तसा आराम मिळतच नाही. आराम करायचा कशासाठी तर आपल्या शरीराला मनाला बर वाटावं म्हणून, आपला थकवा मरगळ दूर व्हावी म्हणून. बऱ्याचदा अस देखील वाटत की आराम म्हणजे काय तर झोप काढणे, त्यातून आपला थकवा दूर होऊ शकतो, आपल्याला ताजतवान वाटू शकत. काहीही न करता फक्त पडून राहिल्याने बर वाटू शकत. पण अस होत का? नाही. अगदी जास्त झोप घेऊन सुध्दा आपल्याला अनेकदा exhausted feel होत. आपल्याला थकवा जाणवतो.
याचाच अर्थ आराम म्हणजे फक्त झोप काढण नव्हे, फक्त पडून राहणं नव्हे. थकवा दूर होण्यासाठी विश्रांती घेणं हा एक मार्ग झाला पण आराम म्हणजे फक्त ही एकच गोष्ट नाही. Dr. Saundra Dalton-Smith यांनी त्यांच्या Sacred Rest: Recover Your Life, Renew Your Energy, Restore Your Sanity या पुस्तकामध्ये सात प्रकारचे आराम सांगितले आहेत. त्या अस म्हणतात की प्रत्येक माणसाला आपलं आयुष्य भरभरून जगण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यावर या सात प्रकारच्या आरामांची गरज असते. आता हे आराम कोणते आणि ते कश्या पद्धतीने आपण करू शकतो हे पाहू:
१. शारीरिक आराम: यामध्ये दोन प्रकारचे शारीरिक आराम येतात. एक passive आणि दुसरा active. Passive मध्ये आपण जी झोप घेतो किंवा ज्याला आपण डुलकी काढण(nap) असं म्हणतो ते येत. माणसाला किमान सात तास झोप आवश्यक असते. हा झाला एक प्रकार. पण जसं आधी म्हटल फक्त झोप काढून आराम मिळतो असं नाही. शारीरिक आरामामध्ये जो active प्रकार आहे त्यामध्ये योगा, स्ट्रेचिंग, मसाज या सारख्या गोष्टी येतात. फक्त कोणताही व्यायाम करताना आपली शरीर प्रकृती पाहून करावा.
आपल्याला शरीराला active आरामाची गरज आहे याची लक्षण म्हणजे अंगदुखी, एका जागी बसल्यावर पायांना येणारी सूज, कंबर भरून येणे, आखडून जाणे. अस जर होत असेल तर ही लक्षणं आहेत की आपल्याला active शारिरीक आराम केला पाहिजे.
२. मानसिक आराम: मानसिक आरामाची गरज केव्हा भासते जेव्हा आपला मेंदू सतराशे साठ विचारांनी, नकोत्या विचारांनी भरून गेलेला असतो. आपला मेंदू थकून जातो. याचा लक्षण म्हणजे जरी आपण झोपी गेलो तरी आपल्याला झोप लागतं नाही. कारण डोक्यात विचार चालू असतात. साध्या साध्या गोष्टी लक्षात राहत नाही, कुठे लक्ष लागत नाही. अस जेव्हा होऊ लागत तेव्हा आपल्याला इथे मानसिक आरामाची खूप गरज आहे अस समजाव. यासाठी स्वतःच्या मनाला शांत करण आवश्यक आहे, calm down करण गरजेच आहे. त्यासाठी आपण मनाला शांती देणार संगीत ऐकू शकतो, निसर्गात काही वेळ फिरायला जाऊ शकतो, अशी कोणतीही गोष्ट जी तुमच्या मनाला शांत स्थिर करेल.
३. सामाजिक आराम: आपण दिवसभर कित्येक लोकामध्ये वावरत असतो. आपल्या आयुष्यात वेगवेगळी नाती असतात. कारण आपण समाजशील प्राणी आहोत. नाती माणसाच्या आयुष्यात गरजेची आहेत. पण बरेचदा आपल्या आयुष्यात अशी देखील नाती असतात, माणसं असतात जी नकारात्मकता पसरवत असतात, आपल्याला कुठेतरी खाली पाडायचा प्रयत्न करत असतात. अशी माणसं ज्यांच्या सहवासात आपली मानसिक, शारीरिक ऊर्जा विनाकारण जात असते. म्हणून अश्या व्यक्तींपासून लांब राहणं गरजेच आहे. ज्या माणसांमध्ये आपल्याला उत्साही वाटत, आपल्या मनाला उभारी मिळते, आपल्याला छान वाटत अश्या माणसांसोबत आपल्याला वेळ घालवला पाहिजे.
४. अध्यात्मिक आराम: आपण जे काही करत आहोत त्याला काहीतरी अर्थ असावा लागतो. मी काम करतोय पण फक्त करायचं म्हणुन किंवा फक्त पैसे मिळत आहेत म्हणून अस जर एखाद्याचं मत असेल किंवा मानसिकता असेल तर त्यातून पैसे मिळतील पण आत्मिक समाधान मिळणार नाही, burnout झाल्यासारखं होईल. आध्यात्मिक आराम आपल्याला आपण जे काही करत आहोत त्याचा खोलवर अर्थ, उद्देश्य मिळवून देण्यास मदत करतो. आपल्या अस्तित्वाची जाणीव करून घेणं, एकंदरीत आयुष्य म्हणजे काय, त्याचा अर्थ ह्या सर्व गोष्टी अध्यात्मिकतेमधून शक्य होतात. त्यासाठी आपण ध्यान, meditation करू शकतो, आपल्याला निसर्गाच्या, स्वतःच्या अधिक जवळ जायचे आहे. यासाठी याची गरज आहे.
५. सांवेदनिक(sensory) आराम: आपण कितीही लक्ष द्यायचं नाही म्हटल किंवा unaware असलो तरी आपली जी पंचज्ञानेंद्रिय आहेत त्यांच्यामार्फत आपल्यापर्यंत माहिती पोहोचत असते आणि आपलं शरीर त्याला प्रतिक्रिया पण देत असतं. मग तो मोठा आवाज असेल, तीव्र प्रकाश असेल, वास, फोन नोटिफिकेशन या सारख्या गोष्टी आपल्या आजूबाजूला सारख्या चालूच असतात. या एका प्रमाणाबाहेर गेल्या की चिडचिड, राग या सारख्या गोष्टी होतात. आपली का चिडचिड होते हे देखील आपल्याला समजत नाही.
म्हणून हे कमी करायचं असेल तर मोठ मोठे आवाज, तीव्र प्रकाश म्हणजेच जिथे खूप जास्त lighting असेल अशी ठिकाणं, फोनची रिंग या पासून काहीवेळ दूर राहण्याचा प्रयत्न करायचा. इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून काही वेळ स्वतः ला बाजूला ठेवायचे.
६. भावनिक आराम: आपण अनेकदा आपल्याला काय जाणवत काय फील होत हे दाबून टाकायचा प्रयत्न करतो किंवा लपवून ठेवतो, व्यक्त करत नाही. कारण आपण व्यक्त केल्या तर लोक काय म्हणतील, किंवा माझ्या घरातली माणसं काय विचार करतील अस वाटत असत. आपण मोकळेपणाने आपल्याला मनातल्या गोष्टी कुठे व्यक्त करत नाही. त्यामुळे बरेचदा माणसाला आतल्या आत गुदमरल्यासारख होत.
म्हणूनच आपल्या जवळच्या व्यक्तीकडे,ज्या व्यक्तीकडे आपण मन मोकळेपणाने बोलू शकतो तिच्याकडे व्यक्त होणे, आपल्या भावना नीट समजाऊन घेऊन त्या योग्य पद्धतीने एक्स्प्रेस करणे, अगदी कोणीही नसेल तर त्या लिहून काढणे अश्या गोष्टी आपण करू शकतो. यातून आपलं मन हलक होत.
७. क्रिएटिव्ह आराम: याची कधी गरज असते जेव्हा आपण फक्त एकसारखं काम करून थकून जातो. जेव्हा आपल्याला प्रोब्लेम सोल्विंगची क्षमता राहत नाही. कोणत्याही गोष्टीवर आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचार करता येत नाही. ते सर्व यातून शक्य होत. अश्या पद्धतीने जेव्हा आपण आराम घेतो तेव्हा आपण आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टी मध्ये काहीतरी सौंदर्य, सृजनशीलता शोधायला लागतो किंवा ते आपल्याला दिसत. मग तो निसर्ग असुदे, एखाद छान ठिकाण असुदे, कला असुदे. अशी कोणतीही गोष्ट ज्यात नवनिर्माण करायची ताकद आहे. अश्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आपले छंद असतील, नवीन कला असेल अश्या गोष्टीतून आपण हा आराम मिळवू शकतो.
अशाप्रकारे आयुष्याच्या त्या त्या टप्प्यात आपण हे आराम केले तर आपलं आयुष्य अधिक उत्साहाने भरलेलं आणि छान होईल.

लेख आवडला
खुप छान