Skip to content

एखादी व्यक्ती मानसिक समस्या लपवत आहे, हे ओळखणारे १५ लक्षणे वाचा.

एखादी व्यक्ती मानसिक समस्या लपवत आहे, हे ओळखणारे १५ लक्षणे वाचा.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


आताचा काळ हा डिजिटल झाला आहे. आताच हे युग technosavy झालं आहे. सर्व गोष्टी आता ऑनलाईन एका क्लिकवर होतात. काहीही काम असल, मदत हवी असली तरी प्रत्यक्ष कोणाशी संपर्क साधलाच पाहिजे किंवा त्या ठिकाणी गेलच पाहिजे अस काही राहिलेलं नाही. घरी बसून आपण या सर्व गोष्टी करू शकतो. सुरुवातीला ज्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी देखील माणसांचा एकमेकांशी संपर्क होत होता तो आता कमी झालाय, त्याची फार निकड राहिलेली नाही. सोयीच्या दृष्टीने या सर्व गोष्टी जरी आपल्याला फायदेशीर ठरतं असल्या तरी एका प्रमाणाबाहेर याचा वापर कुठेतरी माणसाला एकट पाडतोय. प्रत्येक गोष्टीचे फायदे तोटे असतातच. या ही गोष्टीचे आहेत. कारण यामुळे आपल्याला दूरवरच्या आपल्या माणसाशी संपर्क साधता येत आहे, शिकणं सुरू आहे, आपल्या महत्त्वाच्या मीटिंग यातून शक्य होत आहेत. पण याची दुसरी एक बाजू देखील आहे.

आता बहुतेक सर्वांची सोशल मीडिया वर अकाऊंट आहेत. करमणूक म्हणून आपण ज्या गोष्टी वापरत आहोत, ज्यावर आपला वेळ घालवत आहोत ते एक आभासी जग आहे हे कुठेतरी माणूस विसरत चाललय. यातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक नात खर मानून चाललाय. आणि यात आता माणूस इतका वेळ घालवतोय की घरातल्या माणसांशी, आपल्या आयुष्यातील जी खरी नाती आहेत त्यांच्यासोबत वेळ घालवायला त्याला वेळ नाही. आपल्या मनातलं त्यांच्याकडे बोलूया, आपलं सुख दुःख त्यांना सांगुया हा विश्वासच लोप पावत चाललाय.

आता या सर्वाचा मानसिक समस्या असण्याशी काय संबंध आहे अस वाटू शकत. पण इंटरनेटचा अतिवापर ही एक गोष्ट आताच्या काळात मानसिक समस्या निर्माण करण्यामागे कारणीभूत ठरतं आहे. नैराश्य, लो सेल्फ एस्टीम म्हणजे स्व आदर कमी असणे, झोपेच्या समस्या एकंदरीतच माणसाच्या रोजच्या जीवनावर याचा परिणाम होत आहे. आत्महत्या केल्या जात आहेत. मानसिक समस्या सुरुवातीला माणसाला जाणवत नव्हत्या का? तर हो. जाणवत होत्या. पण त्याची कारण पण त्यावेळी वेगळी होती आणि त्याची लक्षण पण वेगळी होती.

आताच्या काळात जिथे आपलं एकंदरीत आयुष्यच इतकं फास्ट झालं आहे तिथे आपल्याला मानसिक समस्या निर्माण होण्याची कारण देखील बदलत चालली आहेत. जसं म्हटल इंटरनेटचा अतिवापर, दिवसभर सोशल मीडिया वर राहणं, खऱ्या आपल्या माणसांना वेळ न देणं, भूक, झोप यांच्या बदलल्या गेलेल्या वेळा, इतर लोक त्यांच्या आयुष्यात किती सुखी आहेत, त्यांचं आयुष्य किती छान चालू आहे अस वाटून घेऊन, स्वतःची त्यांच्याशी तुलना करून घेऊन येणार नैराश्य, फोमो म्हणजे आपण काहीतरी गमावतो आहोत, मिस करत आहोत अस वाटणं, एकटेपणा या सर्वच गोष्टी आणि याहून अधिक कितीतरी गोष्टी आहेत ज्या आता कुठेतरी माणसाला मानसिक समस्या देत आहेत.

इतकं सर्व बदलेलेल असताना एक गोष्ट जी आधी पण होती आणि आता पण दिसते ती म्हणजे मानसिक आरोग्याविषयी असलेली अनास्था, त्याची कमी जागरूकता. हेच कारण आहे ज्यातून व्यक्ती अजूनही कोणत्या मानसिक समस्येतून जात असेल तरी उघडपणे कोणाकडे बोलत नाही. अजूनही या बाबतीत लोकांमध्ये म्हणावी तशी जागरूकता नाही. आपण जर या गोष्टीबद्दल सांगितल तर लोक आपल्याला काहीतरी बोलतील, नाव ठेवतील अस वाटून बरीच लोक आपला मानसिक आजार, आपल्याला होणार मानसिक त्रास लपवून ठेवतात, त्यापासून पळ काढायचा प्रयत्न करतात किंवा मग त्यांना होईल तस त्यावर उत्तर शोधण्याचा पाहतात. पण शारीरिक आजार झाल्यावर जसं मदत घेतली जाते किंवा लगेच उपचार करून घेतले जातात तस मात्र इथे केल जात नाही. अनेक सेलेब्रिटी आपण पाहिले असतील ज्यांनी अलीकडे suicide केल्या आहेत.

बहुतेक सर्वांना नैराश्य होत जे त्यांच्या आत्महत्येनंतर समजलं. तोपर्यंत त्यांच्या वागण्यातून त्यांनी कोणाला हे दाखवून दिले नाही. इतकी कमी जागरूकता याबद्दल आहे. या गोष्टीमुळे होत काय की सुरुवातीला आजाराची तीव्रता कमी असताना आपण मदत करू शकतो तिथे तो वाढल्यावर बऱ्याचदा गोष्टी हाताबाहेर जातात आणि माणसाला प्रसंगी प्राण पण गमवावा लागतो. म्हणून याची लक्षणे वेळीच ओळखणे त्यावर उपचार करून घेणे, अश्या व्यक्तींना मदत करणे खूप गरजेचे आहे. आता म्हटल तस अजूनही व्यक्ती मला काही मानसिक त्रास जाणवतो आहे हे सांगायला पाहत नाही, लपवण्याकडे कल जास्त असतो. तरी देखील अशी काही लक्षणे आहेत ज्यातून आपण हे ओळखू शकतो. ती कोणती ते पाहू:

१. संपर्क टाळण्याचा प्रयत्न: जी व्यक्ती नैराश्यात आहे, मानसिक त्रासातून जात आहे ती इतरांपासून बऱ्याचदा संपर्क टाळायचा प्रयत्न करते. आपण जरी भेटायचा बोलायचा प्रयत्न केला तरी आपल्याला टाळलं जातं आणि त्याच नीट कारणही दिलं जातं नाही.

२. शांत होऊन जाणे: जी व्यक्ती आपल्या जवळची आहे, जिला आपण पहिल्यापासून ओळखतो तिचा स्वभाव आपल्याला माहीत असतो. मुळातच अंतर्मुख असण वेगळं आणि अचानक शांत शांत अबोल राहणं वेगळं. जर व्यक्ती अचानक शांत झाली असेल, नीट काही बोलत नसेल तर आपण त्याबद्दल विचार करण गरजेच आहे.

३. आनंदी नसल तरी तस दाखवणं: आपण कोणत्यातरी त्रासातून जात आहोत हे सांगणं अनेकांना आवडत नाही. अस सांगितल तर आपल्याला लोक काहीतरी म्हणतील अस वाटून खोटं आनंदी दाखवायचा प्रयत्न केला जातो. पण की व्यक्ती कायम आनंदी असते, हसत खेळत राहते ती आतून पण तशीच असेल अस नाही.

४. थकवा: मन आणि शरीर या गोष्टी वेगळ्या माहीत. दोघांचाही एकमेकांवर परिणाम होतो. त्यामुळे मानसिक त्रास जाणवत असेल तर त्याचा शरीरावर परिणाम होतोच. अश्या माणसाला खूप थकवा जाणवतो. कोणतही काम करण्यासाठी जी ऊर्जा लागते ती या व्यक्तीमध्ये नसते.

५. उत्साह नसणे: जशी शारीरिक ऊर्जा जाणवत नाही तशी मानसिक ऊर्जा ही नसते. कोणती गोष्ट करण्यासाठी जो उत्साह लागतो, आनंद लागतो तो राहतच नाही. नैराश्याच हे एक प्रमुख लक्षण आहे ज्यात व्यक्तीला आधी ज्या गोष्टी करायला आवडत असतात त्या देखील आता आवडत नाहीत. त्यातही रस राहत नाही.

६. झोप: मानसिक आजाराचा एकंदरीतच रोजच्या जीवनावर परिणाम होतो. ज्यात झोप पण येते. अशी व्यक्ती एकतर खूप वेळ झोपूनच राहते किंवा मग तिला झोपच येत नाही. खूप कमी झोप येते.

७. भूक: भुकेवर परिणाम होतो. माणूस नीट जेवत नाही. जेवणावरून मन उडालेले असते. इच्छा राहत नाही. कारण खूप ताण घेतलेला असतो. ज्या पदार्थामध्ये साखर जास्त असते असे पदार्थ बरेचदा खाल्ले जातात कारण यातून हॅप्पी हार्मोन secret होत. पण संशोधनातून हे दिसून आलं की यातून नैराश्य अजून वाढत. या गोष्टींमुळे वजनावर परिणाम होतो. एकतर खूप कमी होत किंवा वाढत.

८. निराशा: या व्यक्तींचा स्वतःकडे, इतरांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. त्यांच्या वागण्या बोलण्यात एकप्रकारची निराशा जाणवते. काही चांगल होणार नाही अस त्यांच्या बोलण्यातून ते दाखवतात जरी त्यांनी लपवयाचा प्रयत्न केला. आयुष्य जगण्याची जी प्रेरणा लागते ती दिसून येत नाही.

९. सोशल मीडिया वरच्या stories आणि caption: जसं म्हटल की आता मानसिक आजाराची कारण पण बदलत आहेत आणि त्याची लक्षण दाखवण्याच्या पद्धतीही बदलत आहेत. माणसाने कितीही लपवायाचा प्रयत्न केला तरी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीज, पोस्ट खालच्या कॅप्शन मध्ये काहीतरी वेगळं लिहिलेले असत. जो एक इशारा असतो की त्यांच्या आयुष्यात काहीतरी समस्या आहे. ज्या सेलेब्रिटींनी आत्महत्या केल्या त्यांनी स्वतः हून जरी त्यांचा त्रास कबूल केला नसला तरी त्यांच्या पोस्ट मधून त्यांनी ते अप्रत्यक्षपणे व्यक्त केलं होत. त्यामुळे आपल्या संपर्कामध्ये असणारी व्यक्ती ती अस काही करत असेल, आपल्याला त्यांच्या या लिहिण्यातून काही वेगळं जाणवत असेल तर आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे.

१०. व्यसन: व्यसन मग ते दारू असेल, सिगारेट असेल आपलं दुःख लपवण्याच एक साधन किंवा मार्ग समजला जातो. दारू मध्ये असे काही घटक असतात जे माणसाला आनंदी वाटण्याची जाणीव करून देतात. माणूस त्यात दुःख विसरतो. त्यामुळे एक त्रास विसरण्यासाठी बरेचदा व्यक्ती व्यसनाच्या आहारी जाते ज्यातून बाकीचे त्रास निर्माण होतात. अशी व्यक्ती जी अती प्रमाणात व्यसन करत असेल तर हे एक लक्षण आहे की तिला मानसिक त्रास असू शकतो. कारण हे दिसून आलंय की बऱ्याच व्यसनाच्या आहारी गेलेल्या केसमध्ये नैराश्य होत.

११. अस्थिर मनस्थिती : अश्या व्यक्तीचा मुड स्थिर नसतो. आता शांत असतील तर लगेच चिडतील, अस्वस्थ होतील. अनेक भावना एकाचवेळी जाणवू लागतात. पुरुष जास्त करून चिडचिड, राग व्यक्त करतात तर स्त्रिया दुःखी राहण्याच प्रमाण जास्त असत. इतरांना जिथे हसू येत तिथे ही व्यक्ती एकदम शांत होऊन बसते. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये रडु येत.

१२. काम: अश्या व्यक्ती एकत्र खूप जास्त कामात स्वतः ला वाहवून घेतात किंवा मग त्यांच्या कामातील उत्पादकता कमी होऊन जाते. कारण काम करण्यात लक्षच लागत नसत.

१३. काहीतरी गूढ, खोलवरच बोलण: नेहमीपेक्षा वेगळच काहीतरी बोलण, आयुष्याचा खरा अर्थ समजला आहे किंवा साध्या बोलण्यात पण तात्विक चर्चा करण ज्याची गरज नसते.

१४. कोणतेही छंद नाहीत: आपल्या सर्वांना काही ना काही छंद असतात. ते जोपसल्याने आपल्याला बर वाटत आनंद होतो. पण जी व्यक्ती मानसिक त्रासातून जात आहेत ती छंद देखील जोपसत नाही कारण त्यातून तिला आनंद मिळेनासा होतो आणि त्याचा एक वेगळाच अपराधीभाव मनात निर्माण होतो.

१५. शारीरिक आजार: अश्या व्यक्तीला शारीरिक त्रास जाणवतो. पोटात दुखणे, अंगदुखी या गोष्टी शारीरिक वाटत असली तरी कारण मानसिक असतात.

अशी काही लक्षणं आहेत ज्यातून त्या व्यक्तीला काहीतरी मानसिक त्रास आहे जे दिसून येत. आता अश्या व्यक्ती का मदत घेत नाहीत, किंवा आजार का लपवून ठेवतात याची अनेक कारण आहेत. लोक काय म्हणतील, औषध नकोत, मला कोणावर ओझं व्हायचं नाही किंवा माझ्यामुळे कोणाला काही ऐकून घ्यावं लागू नये. कारण अस होत की आपल्याला काहीतरी मानसिक आजर आहे हे समजलं तर बऱ्याचदा आपल्या घरातल्या व्यक्तींना पण ऐकून घ्यावं लागतं, लोक त्यांच्याकडे वेगळ्याच दृष्टीने पाहतात.

त्यामुळे दर वेळी काहीतरी मोठ झालं, त्या माणसाने स्वतःचा जीव गमावल्यावर त्याने मदत घ्यायला हवी होती, कोणालातरी सांगायला हवं होत अस म्हणण्यापेक्षा आपण या बाबतीत आपला दृष्टिकोन कसा बदलू शकतो यावर लक्ष दिलं पाहिजे. अशी व्यक्ती आपल्या आजूबाजूला असेल तर तिला काहीतरी लेबल लावण्यापेक्षा तिच्या प्रती आस्था दाखवून, empathy दाखवून मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं मानसिक त्रास होऊ शकतो त्यात काहीही अपसामान्य नाही हा विचार आपण आपल्याकडून रुजवला पाहिजे. तर कुठे जागरूकता पसरेल आणि माणूस हक्काने याबाबत मदत घेईल.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “एखादी व्यक्ती मानसिक समस्या लपवत आहे, हे ओळखणारे १५ लक्षणे वाचा.”

  1. लेख खूपच छान व माहितीपूर्ण. वाचल्यावर मला स्वतःला माझ्यामध्ये नंबर 2,3,4,5,8,11,14,15 ही लक्षणे आढळली. मला कळतंय पण वळत नाही अशी स्थिती आहे. आता हा मेसेज लिहितानाही डोळे पाणावले आहेत. असे का होते. मला मानसिक समस्या आहे का

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!