समोरच्याने आपल्यासाठी केलेल्या ९९ गोष्टींपैकी ती एकच न केलेली गोष्ट का लक्षात राहते?
मेराज बागवान
एक मानसिकता आहे ज्यामध्ये ,समोरच्याने आपल्यासाठी केलेल्या ९९ गोष्टींपैकी ती एकच न केलेली गोष्ट का लक्षात राहते. एखादी व्यक्ती आपल्यासाठी नेहमीच खूप काही करत असते.पण एका क्षणी ती व्यक्ती आपल्यासाठी कोणतीतरी एक गोष्ट करीत नाही.मग त्याचे कारण काहीही असो.मात्र आपण त्यावेळी ती एकच न केलेली गोष्ट घेऊन बसतो आणि त्या व्यक्तीने आपल्यासाठी केलेल्या ९९ गोष्टींकडे दुर्लक्ष करतो.का बरे असे होत असेल? काय कारणे या मागे असू शकतील.
१) नेहमी उपलब्ध असणे- कोणीतरी तुमच्यासाठी कायम उपलब्ध असते. काहीही झाले तरी ती तुम्हाला कायम पाठिंबा देत असते. त्यामुळे तुम्ही हळू हळू त्या व्यक्तीला गृहीत धरून चालतात.काहीही झाले तरी ही व्यक्ती माझ्यासाठी सदैव तयार असणारच हा विश्वास नव्हे तर गृहीत धरलेला विचार असतो.आणि मग कोणे एके क्षणी जर ती व्यक्ती तुमच्यासाठी उपलब्ध नाही राहिली की तुम्ही तेच घेऊन बसतात आणि बाकी केलेल्या गोष्टी विसरतात.
२) ‘नाही’ न म्हणणे – तुमचा मित्र असेल,सहकारी असेल किंवा आयुष्याचा जोडीदार असेल.तो तुम्हाला नेहमी मदत करतोय.कधी ‘नाही’ म्हणतच नाही.पण काही काळानंतर तीच व्यक्ती तुम्हाला नाही म्हणते आणि ते तुम्ही सहजपणे स्वीकारु शकत नाही. यामुळे देखील तुम्ही त्या व्यक्तीने तुमच्यासाठी केलेल्या गोष्टी विसरतात आणि न केलेल्या गोष्टीच फक्त लक्षात राहतात.
३) गृहीत धरणे – एखादी व्यक्ती जर तुमच्यासाठी नेहमीच खूप काही करीत असेल तर हळूहळू तुम्ही त्या व्यक्तीला गृहीत धरू लागतात.काहीही झाले तरी ही व्यक्ती मला समजून घेणारच हे गृहीत धरून तुम्ही चालतात. आणि मग पुढे जाऊन ह्याच व्यक्तीने तुम्हाला काही गोष्टींसाठी नकार दिला तर तुम्ही तो नकार पचवू शकत नाही.मग बाकीच्या गोष्टींकडे तुमचे दुर्लक्ष होते.
४) प्रेम आणि अतिकाळजी – जी व्यक्ती तुमची नेहमीच खूप काळजी घेते.त्या व्यक्तीचे तुमच्यावर अपेक्षा विरहित प्रेम असते,निस्सीम प्रेम असते त्याच व्यक्तीकडे तुमचे सर्वात जास्त दुर्लक्ष होते.ते प्रेम तुम्हाला प्रत्येकवेळी समजून घेता येतेच असे नाही.तिने कितीही केले तुमच्यासाठी तरी देखील अनेकदा तुम्हाला काहीच वेगळे वाटत नाही.कारण तुम्हाला माहित असते की हिचे माझ्यावरच प्रेम आहे,हिला माझी काळजी आहे.म्हणून तुम्ही नेहमी तिच्याकडे काही ना काही मागत राहतात.पण अचानक ती व्यक्ती तुमच्यासाठी एकच गोष्ट करीत नाही.मग मात्र तुम्ही ते समजून न घेता,माझ्यासाठी तू हे केले नाही,असेच तिला म्हणत बसतात किंवा स्वतः तरी हा विचार करीत राहतात.
५) मानवी स्वभाव – कोणी तरी तुमच्यासाठी खूप काही करते,पण तुम्ही त्या व्यक्तीला कधीच ‘थँक्स’ म्हणत नाही.कधी कधी तुमचा अहंकार तुम्हाला ते म्हणू देत नाही.’केले म्हणून काय झाले’ हा दृष्टिकोन अनेकजण बाळगतात.मग तुमचा हाच स्वभाव नकार पचवू शकत नाही.
६) महत्व देणे – एखादी व्यक्ती तुम्हाला खूप महत्त्व देत असते.तिच्या प्राधान्यक्रमात तुम्ही अग्रस्थानी असतात.मग असे असूनही ही व्यक्ती मला नाही कशी म्हणू शकते? माझ्यासाठी तिने हे केले नाही.हेच तुमचे मन तुम्हाला वारंवार सांगत राहते.
७)अपेक्षा पूर्ण करणारी व्यक्ती – काही व्यक्ती न सांगता तुमच्या अपेक्षा पूर्ण करीत असते.तुम्हाला काय हवे,नको ते तिला चांगले उमजत असते.त्यामुळे ती सदैव तशीच राहते.पण कधी तरी काही कारणास्तव ती तुमच्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकत.आणि मग तुम्ही ही एकच गोष्ट कायम धरून ठेवतात.
विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की अशी काही कारणे असू शकतात,ज्यामुळे आपण फक्त एक न केलेल्या गोष्टी कडेच लक्ष केंद्रित करतो आणि केलेल्या ९९ गोष्टी झटकन विसरून जातो.
आता आपल्याला समजले की असे का होते.मग मला वाटते,हीच ती वेळ आहे,स्वतःमध्ये चांगला बदल घडवून आणण्याची.हा बदल म्हणजे काय की, जो आपल्यासाठी नेहमीच खूप काही करीत आहे त्याचे आभार मानणे, ‘Gratitude’ बाळगणे. आणि कधी त्या व्यक्तीने आपल्यासाठी काही केले नाही तरी देखील ते समजून घेणे,त्या व्यक्तीला समजून घेणे आवश्यक असते.आणि असे जर का प्रत्येक व्यक्ती वागू शकली तर अनेक नाती टिकून राहतील ,तुटण्यापासून वाचतील.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

