Skip to content

मेहनत करूनही प्रशंसा मिळत नसेल तर काय करावे?

मेहनत करूनही प्रशंसा मिळत नसेल तर काय करावे?


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


नैनाला खूप लो फील होत होतं. कामात पण मन लागत नव्हतं ना काही करायची इच्छा होत होती. अस वाटत होत काहीच करू नये. गप्प बसून राहावं. आज ऑफिसमध्ये कोणाशीही काही न बोलता ती एकटीच येऊन बसली होती. एरवी काम म्हटल की तिचा उत्साह ओसंडून वाहत असे. कधी ती कोणत्या गोष्टीला नाही म्हणत नसे. कारण तिला मुळातच कामाची, वेगवेगळ्या नवीनवीन आव्हानांना स्वीकारायची आवड होती. त्यामुळे एखादा नवीन प्रोजेक्ट आला त्यावर काम करायचं झालं की तिला हुरूप येत असे. बाकी सर्व विसरून ती त्यातच मग्न होत असे. पण हे सर्व सुरुवातीचं होत. हल्ली तिला कश्यातच रस राहिला नव्हता. उत्साह राहिला नव्हता.

याच कारण म्हणजे ती जे काही काम करत होती, मेहनत करत होती त्याच तिला श्रेय मिळणं तर बाजूलाच पण प्रशंसा पण मिळत नव्हती. आतापर्यंत बरेचसे प्रोजेक्ट्स तिने यशस्वीरीत्या हाताळले होते. बऱ्याचदा ती टीम लीडर होती. एका टीमला जोडून ठेवून उत्तम प्रकारे काम करण, त्याला पूर्णत्वास नेणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. ते पण एक कौशल्य आहे. पण हे कौशल्य तिला अवगत होत. सर्वांशी खेळीमेळीचे नात ठेवून ती काम करत असे. शल्य फक्त याच गोष्टीचं होत की तिच्या इतक्या मेहनतीचं कोणी एका शब्दाने कौतुक करत नसे. एक माणूस म्हटल्यावर आपल्याला वाटत की आपण एखादी गोष्ट जर मन लावून, मेहनतीने करतोय तर त्यासाठी आपल्याला थोडीतरी प्रशंसा मिळावी, आपलं ते काम, आपलं हार्डवर्क कोणीतरी विचारात घ्यावं. अस झालं तर आपल्याला अजून काम करायची प्रेरणा मिळते, उत्साह येतो. आपण जोमाने काम करू लागतो.

पण अस नाही झालं की आपली काम करायची प्रेरणा कमी होऊन जाते. एकसारखी मेहनत करूनदेखील जर ती पाहिली जात नसेल तर मग आपण इतकं सर्व का करायचं असा विचार मनात अनेकदा येऊन जातो. ज्यातून काम करायचं उत्साह कमी होतो. हे फक्त कामाच्या ठिकाणी होत अस नाही तर बाकीच्या ठिकाणी पण होताना दिसत. घरी सर्व काम करणारी गृहिणी, आपली आई असेल, त्यांच्या कामाला वेळेचं बंधन नसत. ते सतत चालूच असत. अगदी बारीक सारीक गोष्टी पण लक्षात ठेवून कराव्या लागतात. अस असूनदेखील सर्वांचा विचार करूनदेखील त्यांचा विचार फार कमी केला जातो. त्यांना फार मोठ्या किमती वस्तू हव्या असतात अस नाही. फक्त जी काही मेहनत केली आहे ती विचारात घेऊन त्यासाठी बोलण्यात आलेला एक कौतुकाचा शब्द हवा असतो. पण ते होत नाही. उलट गृहीत धरलं जातं. घरात कुठे इतकं काम असत अस म्हटल जात. सर्व गोष्टी माणसाला निराश करतात. हे इतकं करूनही जर अस होत असेल तर का करायचं अस वाटू लागतं. बरीच जण स्वतःलाच दोष देऊ लागतात. माझ्यातच काहीतरी दोष असणार म्हणून आपलं कोणी कौतुक करत नाही अस अनेकांना वाटत आणि ती निराश होतात.

प्रश्न पडतो की अश्या वेळी काय करायचं? मी तर माझं काम माझ्या जबाबदाऱ्या नीट पार पाडत आहे. मेहनत करत आहे. तरीही अस होत असेल तर काय केलं पाहिजे हे बरेचदा समजत नाही. काम करण्यातील जी प्रेरणा असते ती कमी झालेली असते ती परत कशी मिळवायची हे समजत नाही. त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे स्वतः ला दोष देणं बंद करायचं. जेव्हा आपल्याला खूप मेहनत करूनही प्रशंसा मिळत नाही, आपलं कोणी कौतुक करत नाही जेव्हा आपल्यातच काहीतरी कमी आहे अस वाटत. पण हे खरं नाही. जर आपण सर्व करूनही समोरच्या माणसाला ते दिसत नसेल तर याचा अर्थ असा होत नाही की आपली काहीतरी चूक आहे. आपण आपल्या जागी योग्यच आहोत. स्वतःला विनाकारण दोष देऊन आपल्या समस्या सुटत नाहीत तर त्या अजून वाढतात. म्हणूनच स्वतः ला दोष देणं किंवा कमी लेखन बंद करा. याउलट स्वतःच कौतुक करायला सुरुवात करा.

आपण अनेकदा काय करतो की दुसऱ्याकडून अपेक्षा करत राहतो की त्याने आपल्यासाठी बोलावं, काहीतरी करावं. मग ती प्रशंसा का असेना. पण म्हणून ते तस करत नसतील याचा अर्थ आपण आपलं कौतुक करू नये, प्रशंसा करू नये असा होता नाही. कितीवेळा आपण आपल्या मेहनतीसाठी, केलेल्या कामासाठी स्वतःच स्वतःच्या पाठीवर कौतुकाची थाप मारतो? फार कमी. कारण आपल्याला दुसऱ्यांनी अस करावं अस वाटत असत. पण दे वेळी अस झालच पाहिजे अस नाही. कोणी कौतुक करू दे अगर न करू दे. आपल्याला स्वतःला केलेल्या कामाचा क्रेडिट देता आल पाहिजे.

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपला आनंद जर दुसऱ्यांवर अवलंबून असेल तर आपण कधीच पूर्णपणे समाधानी असणार नाही. कारण समोरची व्यक्ती दर वेळी आपल्याला आनंद देऊ शकेल अस नाही. त्यामुळे स्वतःच आनंद स्वतः निर्माण करायला शिका. काय झालं तर आपल्या केलेल्या कामासाठी आपल्याला नाही प्रशंसा मिळाली तर? आपल्याला माहीत आहे आपण यासाठी किती मेहनत घेतली, त्यासाठी आपण आपलं कौतुक करूच शकतो. त्यांच्या प्रशंसेवर आपलं काम, काम करण्याची प्रेरणा अवलंबून असेल तर आपण कितपत प्रभावीपणे काम करू शकतो? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं अंतिम ध्येय काय आहे हे आपण पाहिलं पाहिजे. केलेल्या कामासाठी प्रशंसा मिळावी हे वाटणं अगदीच स्वभाविक आहे. पण शेवटी ही एक बाह्य प्रेरणा आहे. आणि आपण जास्त काम करतो अंतिरिक प्रेरणेने प्रभावित होऊन. ही कधी निर्माण होणार? जेव्हा आपल्याला हे समजेल की माझं अंतिम ध्येय काय आहे? मला वाटत की माझी प्रशंसा व्हावी, पण हे माझं अंतिम ध्येय आहे का? की मला जे काय अचीव करायचं आहे, मिळवायचं आहे ते माझं अंतिम ध्येय आहे. जर आपल्याला आपलं ultimate goal स्पष्ट असेल तर आपल्याला कोणी प्रशंसा केली नाही केली याचा फारसा फरक पडणार नाही.

आपल्याला फक्त ही स्पष्टता पाहिजे. त्यासाठी आपण रोज स्वतः ला हे सांगितल पाहिजे की मला काहीतरी मोठ साध्य करायचं आहे आणि त्यासाठी मी ही मेहनत करत आहे, मला माझा विकास करायचं आहे. यात जरी माझी कोणी समजा प्रशंसा नाही केली तरी हरकत नाही मी माझ काम चालू ठेवेन. असा स्व संवाद जेव्हा आपण करू तेव्हा आपोआपच आपल्याला प्रेरणा मिळत जाईल. आणि अस कधीच होत नाही की आपल्याला केलेल्या कामाची प्रशंसा मिळत नाही किंवा क्रेडिट मिळत नाही. आपण जर मनापासून गोष्टी केल्या असतील तर आपल्याला त्याच क्रेडिट मिळणार. त्यासाठी संयम पाहिजे आणि स्वतःवर विश्वास पाहिजे. योग्य वेळ आली की आपल्याला आपल्या मेहनतीचं फळ नक्की मिळत.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!