Skip to content

चांगल्या गोष्टी नक्की घडतील, जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करायला लागू.

चांगल्या गोष्टी नक्की घडतील, जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करायला लागू.


हर्षदा पिंपळे


स्वतःचं स्वतःवर

प्रेम असावं…

नसेल सुगंधित फुलांवर

नसेल मंजुळ गाण्यांवर

तरी,

स्वतःचं स्वतःवर

प्रेम असावं…

नसेल उडणाऱ्या पक्षांवर

नसेल कोसळणाऱ्या पावसावर

तरी,

स्वतःचं स्वतःवर

प्रेम असावं…

नसेल आपल्या माणसांच

आपल्यावर

नसेल आपलं त्यांच्यावर

तरी,

स्वतःचं स्वतःवर

प्रेम असावं…!!

काही गोष्टी प्रत्येकाला प्रचंड आवडतात तर काही गोष्टी आवडत नाही. काही गोष्टींवर प्रेम असतं तर काहींवर नसतं.माणसांच्या बाबतीतही हे असचं आहे.एखादी व्यक्ती आवडते तर एखादी अजिबात पटत नाही.या कवितेतून सांगायचं इतकचं आहे की,तुमचं कशावर प्रेम नसेल तरीही चालेल पण सर्वात आधी तुमचं स्वतःवर प्रेम असणं आवश्यक आहे. ते असायला हवं. इतरांप्रमाणे स्वतःला समजून घेणही तितकच आवश्यक आहे. त्यामुळे आयुष्यात काहीही झालं तरी स्वतःवर प्रेम करायला हवं.

तर मित्रांनो,आहे का हो तुमचं स्वतःवर नितांत असं प्रेम ? आहे का तुम्हाला तुमची काळजी ? स्वतःबद्दल कधी चांगला विचार करता का तुम्ही ? स्वतःसाठी म्हणून कधी काही लवकर करता का ? स्वतःच्या आवडीनिवडी जपता का ?

बरं असलं तरीही कितीजणं खरचं मनापासून स्वतःवर प्रेम करतात ?

या प्रश्नांची उत्तरं ज्याची त्याला चांगल्या प्रकारे माहीत असतील.आपण कितीही खोदून विचारलं तरीही समोरची व्यक्ती स्वतःवर प्रेम करतेय का नाही हे सांगणं जरा अवघडच.

काहीजणं करतातही मनापासून स्वतःवर प्रेम.स्वतःची पुरेपूर काळजी घ्यायलाही त्यांना छान जमतं.पण अवतीभवती काही लोकं अशीही असतात जे कधी स्वतःवर प्रेमच करत नाही.कायम स्वतःला दुय्यम स्थान देत राहतात.

इतकचं नाही तर काहीजणं “माझ्यावर कुणीच प्रेम करत नाही.मी कुणालाच आवडत नाही का?” असं म्हणत कण्हत बसतात.अशा लोकांना आयुष्यात चांगल्या गोष्टी घडू शकतात याची जाणीवच नसते.

“माझ्या आयुष्यात कधी काही चांगलं घडूच शकत नाही.”

सातत्याने असाच विचार करत राहणं कितपत योग्य आहे ? आणि असा विचार करून काही चांगलं होणार आहे का ?

यामुळे आयुष्य दिवसेंदिवस गढूळच होत राहणार.

आयुष्यात आधीच खूप अडचणी असतात. वेगवेगळी दुःखं असतात. कुणी खूप त्रास देत असतं.अनेक गोष्टीत अपयश येत असतं.

आणि यामुळे अनेकदा अस्वस्थ वाटून कितीतरीजण स्वतःलाच दोष देत राहतात.सतत कण्हत बसल्यावर,स्वतःला दोष देत राहिल्यावर , केवळ निगेटिव्ह विचार करत राहिल्यावर काय होणार ?

आणि गढूळ वातावरणात चांगल्या गोष्टी सहजासहजी घडण्याची शक्यता फार कमी असते.वातावरण जितकं प्रसन्न नी सकारात्मक असतं तितक्याच चांगल्या गोष्टी घडण्याची शक्यता जास्त दाट असते.

त्यामुळे प्रत्येकाने आधी चांगल्या वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न करायला हवे.आयुष्यात चांगल्या गोष्टी घडाव्यात असं जर वाटत असेल तर स्वतःपासून सुरुवात करायला हवी.त्यासाठी स्वतःवर प्रेम असणं आवश्यक आहे.स्वतःची स्वतःला काळजी असणं गरजेचं आहे.स्वतःला काय हवं आणि काय नको हे पाहणही तितकच महत्त्वाचं आहे.

स्वतःवर जर प्रेमच नसेल तर त्याला काहीच अर्थ नाही.आणि कितीदिवस दुसऱ्यांकडून प्रेमाची अपेक्षा करत राहायची ? आणि कितीदिवस केवळ इतरांवरच प्रेम करायचं ?

स्वतःच स्वतःवर प्रेम करायला कधी शिकणार ?

मित्रांनो, विचार करा.स्वतःचं स्वतःवर प्रेम नसेल तर ते आत्ता या क्षणापासूनच करायला सुरुवात करा.आयुष्यात चांगल्या गोष्टी घडण्यासाठी काही गोष्टी खरच खूप महत्वाच्या असतात त्यापैकीच एक म्हणजे स्वःतावर असणारं निःस्वार्थी प्रेम.प्रत्येकाने स्वतःवर निःस्वार्थी प्रेम करायला सुरुवात केली तर आयुष्यात चांगल्या गोष्टी हळुहळू नक्कीच घडायला लागतील.

बघा,स्वतःवर प्रेम करून तर पहा.आयुष्यात आशेची किरणं आल्याशिवाय राहणार नाही.

स्वतःकडे चांगल्या दृष्टिकोनातून, सकारात्मक दृष्टिकोनातून पहायचा प्रयत्न करा.अवघड नाही आणि अशक्यही नाही.

एक छोटसं उदाहरण पाहूयात—

आपल्याला एखादं रोपटं आवडतं.आपण त्याची किती काळजी घेतो.त्याला रोज पुरेसं पाणी घालतो.कोवळा सूर्यप्रकाश देतो.कडक उन्हापासून संरक्षण करतो.एखादं किडलेलं पान /फांदी छाटतो.इतकी काळजी घेतो.आणि अथक प्रयत्नानंतर त्याला छान फुलं येतात,रसाळ अशी फळं येतात.

येतात नं ?

हे सगळं शक्य होतं आपलं त्या झाडावर असणाऱ्या प्रेमामुळे. मग असचं प्रेम,अशीच काळजी जर स्वतःने स्वतःची घेतली तर….?

काय येतयं नं लक्षात ?

Just… Love Yourself 🙂


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “चांगल्या गोष्टी नक्की घडतील, जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करायला लागू.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!