Skip to content

इतरांची अतिप्रमाणात काळजी करू नका, कारण जेव्हा ते दुरावतील तेव्हा खूप त्रास होईल.

इतरांची अतिप्रमाणात काळजी करू नका, कारण जेव्हा ते दुरावतील तेव्हा खूप त्रास होईल.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


“बॅग परत एकदा चेक कर, सर्व घेतलंस का बघ. नाहीतर काहीतरी विसरशील आणि तिथे गेल्यावर आठवेल. परत म्हणशील ताईने बॅग मध्ये घातलं नाही. ज्यादाचे कपडे, तिथे लागणारी औषध वैगरे घेतलीस का?” “ताई घेतल ग सर्व, तूच बघ हवतर. आणि तू मगापासून चार वेळा हे प्रश्न विचारले आहेस. मी म्हटल ना सर्व घेतल आहे, काही टेन्शन घेऊ नको.” भावा बहिणीचा हा संवाद चालू होता तेवढ्यात दारातून सुभाषराव आत आले. “मग झाली का तयारी ट्रीपला जायची?” “झाली एकदाची. निदान माझ्याकडून तरी!” रवी हसत हसत म्हणाला. “म्हणजे आणि कोणाकडून तयारी व्ह्यायला हवी आहे? माझ्या माहितीप्रमाणे तूच जाणार आहेस ना ट्रीपला.” सुभाषरावांना माहीत होत रवी कोणाबद्दल बोलत आहे तरी ते मुद्दाम तस म्हणाले.

त्या दोघांचं बोलण ऐकून मालती म्हणजेच रवीची ताई रागावून म्हणाली, “पुरे झाली माझी चेष्टा. मी आपली काळजी म्हणून सर्व सांगते, तर माझीच चेष्टा करता तुम्ही. राहिलं, बघा तुमचं तुम्ही काय ते. मी आपली जाते माझ्या कामाला.” अस म्हणत त्या जाऊ लागल्या. तेव्हा त्या दोघांनी तिला थांबवलं. “अग चिडते कसली? आम्ही गम्मत करत होतो. आणि तू नाही काळजी करणार तर आणि कोण करणार? बस इथे.” अस म्हणत त्यांनी तिला परत बसवलं. “काय रे रवी, ताईची चेष्टा करायला काही वाटत नाही का?” त्यांनी बोलता बोलता पाठीत धपाटा घातला. “आई ग, भाऊ बघा ना ताई मारते.” तो कळवळत म्हणाला.

हे त्यांच्या घरातलं नेहमीच चित्र होत. घरात इन मीन तीन माणसं. तरी कसं ते घर भरलेले होत. सुभाषराव, त्यांची पत्नी मालती आणि तिचा भाऊ रवी. सुभाषरावांच स्वतःच दुकान होत. मालती ताई आधी मुलांच्या शिकवण्या घ्यायच्या. पण नंतर त्यांनी काही कारणाने ते बंद केलं. त्यांना आधीपासून मुलांची खूप आवड होती. त्या मुलांमध्ये रमायच्या. पण ज्याला जे आवडत ते तसच होत किंवा मिळत अस नाही. त्यांना स्वतः ला तसच सुभाषरावांना मुलांची इतकी ओढ असताना त्यांच्या नशिबी मात्र अपत्य सुख आल नाही. या गोष्टीचं दुःख त्या दोघांच्याही मनात होत. पण त्यांनी ते एकमेकांना कधी दाखवून दिलं नाही. तेच एकमेकांचा आधार बनले होते. पण ही एक सल मात्र मनात होतीच.

याच दरम्यान रवी त्यांच्या आयुष्यात आला. तो मालतीचा सख्खा भाऊ नव्हता किंवा अगदी घरातलाच होता अस देखील नाही. पण तो नात्यातला होता. त्याचे वडील मालतीचे काका लागत होते. वयाने तिच्याहून मोठे होते. रवी झाला आणि काही वर्षातच त्याची आई गेली. त्यांना मनापासून अस वाटत होत की आपल्या मुलावर आईसारखी माया कोणीतरी करावी. त्याला ते सुख मिळाव. ते काही दुसर लग्न करणार नव्हते. पण आपल्या मुलाला पोरकेपण जाणवू नये अशी त्यांची मनापासून इच्छा होती. निदान तो मोठा होईपर्यंत तरी. जेव्हा मालतीला याबद्दल समजलं तेव्हा ती खूप खुश झाली. सुभाषराव आणि मालती दोघंही त्याला आपल्या घरी घेऊन आले. त्या दोघांनी त्याला इतका लळा लावला की तो त्यांनाच आपल्या आई बाबांच्या स्थानी मानू लागला. म्हणताना तो त्यांना ताई आणि भाऊच म्हणे पण मनात ते त्याचे आई बाबाच होते.

दोघंही त्याच सर्व करायचे. पण मालती त्याच्या बाबत जरा जास्तच हळवी होती. बाकी कोणत्या गोष्टीत नाही पण त्याच्या बाबत काही असेल तर ती अती काळजी करायची. तिला त्याच्यापुढे दुसर काही दिसत नसे. आता खर तर तो मोठा झाला होता. दहावीत गेला होता. आपल्याला काय हवं, काय नको, आपण काय केलं पाहिजे हे त्याला समजत होत, तेव्हढी जाण त्याच्याकडे आली होती. तरी मालतीसाठी तो अजून लहानच होता. ते दोघंही तिची चेष्टा करायचे त्याच कारणही हेच होत. सुभाषराव मात्र वरकरणी तिची चेष्टा करत असले तरी त्यांना आतून तिची काळजी वाटायची. त्या दोघांना माहीत होत रवी त्यांच्यापाशी कायम राहणार नव्हता. कधी ना कधी तो तिथून जाणार. कारण जरी तो यांना आपलं मानत असला तरी दुसरीकडे त्याचे सख्खे बाबा पण होते. जेव्हा तो मोठा झाला तेव्हा त्याला या गोष्टी सांगण्यात आल्या. त्यामुळे त्याला देखील माहीत होत आपलं एक माणूस दुसरीकडे पण आहे. त्यांच्याप्रती पण आपली काहीतरी जबाबदारी आहे. आता जरी तो यांच्याकडे राहत असला तरी कधी ना कधी त्याला तिकडे जायला लागणार होत.

तो काही यांना कायमच दूर करणार नव्हता. पण तो सोबत पण राहू शकला नसता. अश्या परिस्थितीत मालतीच त्यांच्याबद्दल अती संवेदनशील असण तिलाच त्रासदायक ठरलं असत. सुभाष रावांनी तिला अनेकदा ही गोष्ट समजावली होती. पण ती त्याकडे फार लक्ष देत नसे. शेवटी व्हायचं ते झालच. रवी त्याच शिक्षण संपवून त्याच्या बाबांकडे गेला तेव्हा मालतीला खूप त्रास झाला. इतक्या वर्षात त्याच्याशिवाय राहायची सवय नव्हती. त्याला पण जाताना खूप वाईट वाटत होत. पण त्याचे बाबा, त्यांचं पण वय झालं होत. त्यांना आता आपल्या मुलाची खरी गरज होती. तो अधे मधे यांच्याकडे येत असे. पण तरीही त्याच्या जाण्याने मालतीच्या मनात एक पोकळी निर्माण झाली. सुभाषरावांच पण रवी वर प्रेम होत. पण त्यांना या गोष्टीची आधीच कल्पना होती. त्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक स्वतःला त्याच्यामध्ये जास्त गुंवतल नाही. मालतीला मात्र ते जमल नाही. आपल्या पण आयुष्यात अश्या गोष्टी असतात, अशी नाती असतात ज्यांना आपण खूप जवळच मानतो, आपलं मानतो त्यात गुंतून पडतो. पण हे गुंतून पडण इतकं असू नये की ती व्यक्ती दूर गेल्यावर आपल्याला त्याचा खूप जास्त त्रास होईल.

पक्ष्याचं आपल्या पिल्लावर कितीही प्रेम असल तरी ते मोठ झाल्यावर आकाशात भरारी घेणार, दुरवर जाणार हे तिला माहीत असत. आपलं म्हणून तिने त्याला घरट्यातच ठेवून दिलं तर ते पिल्लू कधी उडूच शकणार नाही. तसच आपल्याही आयुष्यात कितीही जवळचा माणूस असला तरी त्याचं एक स्वतंत्र आयुष्य जगायला तो कधीतरी दूर जाणार. अश्या वेळी आपण अधिक गुंतून पडलो तर त्रास आपल्याला होणार आहे. म्हणून कोणत्याही गोष्टीत जास्त गुंतून पडू नका. मग तो माणूस असला तरीही. आपल्याला detached होता आलं पाहिजे. तरच आपण आपलं पुढचं आयुष्य जगू शकतो.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!