काही व्यक्ती निष्ठुर असतात, आपण बोललो नाही कि ते सुद्धा बोलत नाहीत.
मेराज बागवान
एक अशी मानसिकता काही व्यक्तींची असते, ज्याच्यामध्ये जर आपण बोलणं सोडलं तर ते सुद्धा बोलत नाहीत.खरे तर संवाद माणसाला माणसाशी जोडून ठेवतो. मग तो संवाद कोणत्याही स्वरूपातील असेल,जसे की,प्रत्यक्ष भेटणे,फोन करणे,मेसेज करणे ,पत्र पाठविणे किंवा आजच्या सोशल मीडिया च्या माध्यमातून साधला गेलेला संवाद असेल.माणसाला निसर्गाने बोलण्याची कला दिली आहे.संवादाशिवाय नातीच निर्माण होऊ शकत नाहीत.पण कधी कधी काय होते, आपण नाती जोपासण्यासाठी काही व्यक्तींशी बोलत असतो,पण अचानक काय होते,त्या व्यक्तींबरोबरचा आपला संवाद खुंटतो .
ह्याला अनेक विविध कारणे असू शकतील.काही व्यक्तींची मानसिकता अशी असते की,’ती बोलत नाही,तर मी पण नाही बोलणार.’काही व्यक्तींना तर काही देणे-घेणेच नसते.आपण त्यांच्याशी बोललो काय आणि न बोललो काय. मग तुम्ही ठरविता ,की ह्या व्यक्तींशी आता बोलायचेच नाही,मग बघू कसे बोलतात की नाही स्वतःहून.पण ही झाली तुमची बाजू.प्रत्यक्षात असे घडत नाही.उलट त्या व्यक्ती पूर्वीपेक्षा जास्त निष्ठुर बनतात.मग कधीतरी तुम्हीच नेहमीप्रमाणे बोलण्याचा पुढाकार घेतात. कारण तुम्हाला नाती टिकवून ठेवायची असतात.पण त्या व्यक्तींना मात्र काहीच फरक पडत नाही.
अशा निष्ठुर वागण्यामागे काही कारणे देखील असू शकतील.जसे की ,काही खूप मोठ्या अडचणी,कामाचा व्याप,आजारपण इत्यादी.पण हे तर प्रत्येकाच्या आयुष्यात कमी-अधिक प्रमाणात असतेच.समस्या नाही असा माणूस नाही.फरक इतकाच की,प्रत्येकाला आपलीच समस्या मोठी वाटत असते.मग काही जगात अशा व्यक्ती आहेत ते खूप निष्ठुर बनतात.त्यांच्या आयुष्यात समस्या असो वा नसो ते कायम तसेच वागतात. कारण हळूहळू त्यांचा तो स्वभाव बनत जातो आणि त्यांना त्यात वेगळे असे काहीच वाटत नाही.
आज ही मानसिकता जगात खूप वाढत आहे.आणि दुसरीकडे जी माणस नातं जोडू पाहत आहेत,ते टिकवून ठेवू पाहत आहेत ,ती बिचारी अशा व्यक्तींसाठी आसुसलेली आहेत,त्यांची वाट बघत आहेत,ज्यांना त्यांची काहीच किंमत नाही.कळत-नकळत ते खूप निष्ठुरपणे वागत आहेत.ह्याला सामाजिक कारणे ही असू शकतील.जसे की,वाढती स्पर्धा,मानसिक आजार,अपेक्षा, इंटरनेट,सोशल मीडिया,पैसे कमावण्याचे वेड,श्रीमंत व्हायचे वेड इत्यादी. ह्या सामाजिक गोष्टी देखील माणसाला माणसापासून दूर नेत आहेत.
पैसा खरे तर वापरायला असतो आणि माणसं प्रेम करायला.पण नेमकी उलटी परिस्थिती समाजात रुजत चालली आहे. ती म्हणजे,माणसांचा वापर करायचा आणि पैशावर प्रेम कारायचे.आणि हेच कारण आहे निष्ठुर होण्यामागे.समोरचा बोलत आहे आपल्याशी ,त्याच्याशी दोन्हीकडून संवाद साधावा इतका ‘कॉमन सेन्स’ देखील काही व्यक्तींकडे नाही.
एखादी व्यक्ती बोलत असते आणि दुसरी मात्र त्याच्यासमोर मोबाईल फोन मध्ये मान घालून बसलेली असते.हे चित्र तर सर्वत्र प्रसिद्ध आहे.मग वैतातून तुम्ही अशा व्यक्तींशी बोलणे सोडून देतात,मात्र दुसरीकडे त्यांची वाट पाहत बसतात.पण काही व्यक्तींच्या हे देखील लक्षात येत नाही,आणि ते स्वतःच्याच धुंदीत आयुष्य जगत राहतात.मग कोणी बोलो अगर ना बोलो.
आपण माणूस आहोत.माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे अपेक्षित असते. जसे की,एकमेकांना मदत करणे,एकमेकांचे म्हणणे ऐकून घेणे ,संवाद साधणे.ह्या खरे खूप बेसिक गोष्टी आहेत.पण काही व्यक्तींना हे लक्षात येत नाही.त्यांना काहीच देणे-घेणे नसते आणि अलिप्त होऊन ते जगत असतात.एकांत जरूर असावा.पण इतकाही नाही,की इतर व्यक्तींचा तुमच्याकडून कळत-नकळत अपमान होईल.
माणसाच्या निष्ठुर वागण्यामागे विविध कारणे असतीलही.पण त्यातच गुरफटून राहिल्याने माणसाची निष्ठुर वागणे ही दिनचर्या बनत चालली आहे.जे की समाजविघातक आहे.आपण समाजाचा एक भाग आहोत.त्यामुळे प्रत्येकाशी थोडे का होइना जोडून राहणे गरजेचे आहे.किंबहुना हे एक नैतिक जगणे आहे.
एकटेपणा जरूर एन्जॉय करावा.पण इतरांना डावलून अजिबात नाही.एकटे आयुष्य जगायचे आहे तर जबाबदारी देखील घ्या की माझ्यामुळे कोणाला कसलाही त्रास होणार नाही.स्वतःच्या मूल्यांवर ,नितीमत्तेनुसार जरूर जागा.पण इतकही स्वतःमध्ये गुंतू नका की समोरची व्यक्ती दुखावली जाईल. त्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या जातील.
मानाने जागा आणि इतरांना देखील मानाने जगू द्या.कोणाला कोणावर कोणत्याही प्रकारचा अन्याय करण्याचा हक्क निसर्गाने दिलेला नाही.निष्ठुरपणे जगून ,आत्मकेंद्रित तर व्हाल,पण असे जगत असताना एखादे सुंदर नाते हातातून निसटून तर जाणार नाही ना याची खबरदारी मात्र जरूर घ्या.
गरज आहे ती…आत्मपरीक्षणाची…
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

