स्वतःचा अभिमान बाळगा… कारण सोडून देण्यापेक्षा अजूनही तुम्ही प्रयत्न करताय.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
आपल्या सर्वांना आयुष्यात काहीतरी मिळवायचं असत, साध्य करायचं असत. प्रत्येकाचं काही ना काही लक्ष्य असत, ध्येय असत आणि ते मिळवण्यासाठी, ते साध्य करण्यासाठी माणूस झटत असतो. हे ध्येय साध्य करण काही साधी सोपी गोष्ट नाही. त्याला मेहनत लागते, कष्ट, सातत्य लागत. कधी काय होईल आपल्याला माहीत नसत. येणाऱ्या आव्हानांचा सामना करावा लागतो. अडथळे येतात. बऱ्याचदा प्रयत्न करून अपयशाचा सामना करावा लागतो. मनापासून सर्व करत असूनही काहीतरी राहून जात असत आणि हाती अपयश येत असत. अश्यावेळी अनेक जण आपल्या मनात त्यांनी जे काही योजल आहे ते मधेच सोडून देतात. खचतात, मागे फिरतात. आपलं जे काही ध्येय आहे ते पूर्णत्वास नेत नाहीत. अस करताना माणसाला आनंद होत नसतो. उलट मनात दुःख, अपराधीपणा जास्त असतो की आपण ठरवलेलं करू शकलो नाही.
पण सर्वांच्या बाबतीत हे होत अस नाही. अपयश, अडथळे आले की अनेक जण जरी हार मानून मागे हटत असली तरी अशी देखील अनेक जण असतात जी कितीही अडथळे आले, वाईट प्रसंग आले तरी मागे हटत नाहीत. अश्या व्यक्ती जिद्दी असतात. जे ठरवलय ते करणारच मग काहीही होऊ दे अशी यांची मानसिकता असते. समाजात वावरणाऱ्या बऱ्याच यशस्वी व्यक्तींचा हाच गुण असतो. यश मिळवणारी प्रत्येक व्यक्ती काही चांगल्या वातावरणातून आलेली नसते, सधन कुटुंबातून आलेली नसतात. अनेकांनी हलाखीचे दिवस पाहिलेले असतात, कष्टातून वर आलेले असतात. खूप परिश्रम केलेले असतात. त्यांच्या यशाचं कारणच हे असतात की ते लगेच हार मानत नाहीत. आपल्या कामात ज्यातून त्यांना त्यांचं ध्येय साध्य करायचं आहे त्यात ते सातत्य ठेवतात.
तुम्ही पण अश्या व्यक्तींपैकी असाल जे न हारता, न थकता आपल्याला जे मिळवायचं आहे त्यासाठी प्रयत्न करत आहेत तर स्वतःचा अभिमान बाळगा. कारण काहीही झालं तरी तुम्ही गोष्टी अर्ध्यावर सोडून देत नाही आहात. तुम्ही तिथपर्यंत जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबून पाहताय. पण मागे पडत नाही. अस होत की आपल्याला समस्यांना सामोर जाव लागत, मनासारखं होत नाही, खचल्यासारख वाटत आणि अश्यावेळी आपल्या आजूबाजूची माणसं देखील बरेचदा अस म्हणतात जर तुला यात यश येत नाही तर तू ही गोष्ट करण सोडून का देत नाही? ज्यात इतके अडथळे येतात त्यात आपला वेळ घालवण्यात काय अर्थ आहे? अश्याने आपली जी काही उरली सुरली प्रेरणा असते ती देखील निघून जाते.
ज्या व्यक्ती न थांबता पुढे जातात, पडत अडखळत का होईना प्रवास चालू ठेवतात त्यांना ही स्पष्टता असते की आपल्याला नेमक काय मिळवायचं आहे आणि त्यासाठी आपण जो मार्ग निवडला आहे तो कसा असणार आहे. तसच अश्या माणसांचा स्वतःवर विश्वास असतो. आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण माणसाला जेव्हा हरल्यासारख वाटत तेव्हा स्वतः वरचा विश्वास कुठेतरी कमी झालेला असतो. आपण आता काही करू शकत नाही, आपल्याला काही आता जमणार नाही असे विचार मनात येऊ लागतात आणि तेव्हा माणूस थांबतो. ती गोष्ट सोडून देतो.
पण इथे आपण सर्वांनी ससा आणि कासवाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ससा जिंकू शकला असता पण फक्त सुरुवातीला दाखवलेला उत्साह आणि नंतरचा आळस त्याला नडला. याउलट कासव जरी संथ गतीने चालत असल तरी त्याने प्रवास थांबवला नाही. हीच गोष्ट आपण डोक्यात ठेवली पाहिजे. आपण जे काही नियोजल आहे ते कदाचित लवकर मिळणार नाही. त्याला थोडा वेळ लागेल. पण आपण आपले प्रयत्न सोडायचे नाहीत. लहान मूल जसं कितीही पडल तरी परत उभ राहत परत चालायला लागत, अगदी तश्याच पद्धतीने आपण स्वतः वर विश्वास ठेवून पुढे चालत रहायच आहे. आपल्याला जे साध्य करायचं आहे ते नक्की मिळेल.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


सगळं मान्य आहे.है बोलला सोप आहे पण आपल्याल एक सांगू समोर परिस्थिती आणि माणसं उलटी असेल ना तर फक्त आणि फक्त आपली फरफट आणि फरफट होते…..दुसरं काही नाही आपली आयुष्य एक चेष्टा होवून बसते