Skip to content

हसणारी प्रत्येक व्यक्ती आनंदी नसते, तर स्वतःला strong बनवण्याचा तो एक प्रयत्न असतो.

हसणारी प्रत्येक व्यक्ती आनंदी नसते, तर स्वतःला strong बनवण्याचा तो एक प्रयत्न असतो.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


“तू नक्की ठीक आहेस ना गायत्री? तुझ्या मनात काही असल तर तू आम्हाला सांगु शकतेस. काही साठवून ठेवू नकोस. फक्त तू सुखी आणि चांगली रहा इतकचं हवं आहे आम्हाला.” बाबा गायत्रीशी बोलत होते. इतकं सर्व झालं तरी ती नॉर्मल झाली होती, सर्वांशी हसुन खेळून बोलत होती, मोकळेपणाने वागत होती. आई बाबांना पण हेच वाटत होत की तिने जुन झालं गेलं सर्व विसरून आयुष्यात पुढे जावं, सुखी राहाव. ती राहत देखील होती आणि या गोष्टीचं त्या दोघांना पण समाधान वाटे. पण तिचा एकंदरीत स्वभाव पाहता ती खरच सर्व विसरली होती, खरच आनंदी होती का तस दाखवून देत होती हे मात्र समजत नव्हत.

त्यांना अस वाटण्याचं कारण म्हणजे जरी ती हसतमुख, इतरांना पण आपल्या बोलण्याने हसवणारी असली तरी मनाने खूप हळवी आणि संवेदनशील मुलगी होती. छोट्या, साध्या गोष्टींचाही तिच्यावर परिणाम होई. एखाद्या गोष्टीला आपलं मानलं की ती त्याला लगेच attach होऊन जायची. तिच्यासाठी ती गोष्ट खूप महत्त्वाची होत असे आणि हे वस्तू नाही तर सर्वांच्या बाबत लागू व्हायचं. तिला प्राण्यांची खूप आवड होती. रस्त्यात कुठे मांजराच पिल्लू दिसलं, कुत्र्याच पिल्लू दिसल की ही घरी घेऊन यायची.

आतापर्यंत कितीतरी कुत्री, मांजर तिने पाळली होती. तर त्यातलच एक मांजर मध्ये आजारी पडल होत. त्याचा त्रास बघून गायत्री स्वतः कळवळली होती. त्या मांजराला औषध पाणी सर्व करूनही ते काही जगलं नाही. तर त्याच्या आठवणीत गायात्रीच ना खाण्यात लक्ष ना कामात. इतकं तिला दुःख झालं होत. ती हे सर्व वरकरणी दाखवून देत नसे पण तिला पाहून समजत होत.आणि तिला अस दुःखात पाहून आई बाबांना खूप त्रास होई.

आई बाबांची ती एकुलती एक मुलगी. त्यामुळे तिच्या वागण्या बोलण्यात जरा काही फरक पडला की त्यांना ते समजायचं आणि ते तिची काळजी करायला लागायचे. त्यांचं पण कुठे लक्ष लागायच नाही. ही गोष्ट गायत्री ने अनेकदा अनुभवली होती. जरी तिला स्वतः ला काही त्रास वाटत असला, काही दुःख असल तरी आई बाबांनी त्यातून अजून त्रास करून घ्यावा असा तिचा उद्देश नसायचा.

पण नेमक तसच व्ह्यायच. हे अस होत असल्याने नंतर नंतर गायत्री पहिल्यासारखी व्यक्त व्हायची कमी झाली. तिच्या मनात जरी काही असल तरी ती त्यांना पटकन दाखवून देत नसे. तिला आपल्यामुळे त्या दोघांना त्रास व्हायला नको असायचा. त्यामुळे शक्यतो काहीही झालं तरी ती स्वतः हुन त्यातून बाहेर पडायला पहायची, ती गोष्ट स्वतः पुरतीच ठेवायची.

आई बाबांना या गोष्टीचं आश्चर्य तर वाटलं. गायत्री नॉर्मल राहत असल्याने ती हळू हळू स्ट्राँग होते आहे असा त्यांचा समज झाला. तिचं वागणं तसच होत. त्यामुळे ते निश्चिंत होते. पण यावेळी अस काही घडलं होत ज्यातून गायत्री खरच सावरू शकेल का नाही अशी भीती त्यांना वाटू लागली. गोष्टच तशी होती. स्वतःच्या प्राण्याच्या आजरापणाचा ज्या मुलीवर परिणाम होऊ शकतो तिच्यावर या गोष्टीचा किती परिणाम झाला असता. तीच लग्न ठरलेलं होत.

काही दिवसांवर आल होत. होणाऱ्या नवऱ्याला ती ओळखत होती, त्यांची चांगली मैत्री होती. लग्नाची सर्व बोलणी , खर्चाचं सर्व बोलण झालं होत. अस असूनही त्या माणसांनी काही स्पष्टता न देता ऐन वेळी लग्नाला नकार दिला. का? तर काही आर्थिक बाजू जुळत नव्हत्या. गायत्री ने सुमेध म्हणजे ज्याच्याशी तिचं लग्न होणार होत त्याच्यासोबत बोलायचा प्रयत्न केला पण त्यानेदेखील नीट काही बोलण केल नाही. तिच्या परीने तिने सर्व प्रयत्न केले.

पण एका मर्यादेनंतर तिला समजलं की आता काही होऊ शकत नाही. आणि हे नात अस सुरू होण शक्य पण नव्हत जिथे आधीच अश्या गोष्टी होत असतील, जिथे संवादच नाही, जिथे फक्त एकतर्फी प्रयत्न आहेत. त्यामुळे तिने विषय सोडून दिला आणि आई बाबांना पण समजावलं. झाल्या गोष्टीचा तिला त्रास होतच होता. कारण तिने देखील आपल्या भावी आयुष्यासाठी काही स्वप्न रंगवली होती.

पण तिला हे सुध्दा माहीत होत की ती जर स्त्राँग झाली नाही, भक्कम झाली नाही तर तिचे आई बाबा कोलमडणार. ते तिला दुःखात पाहू शकत नव्हते. म्हणून केवळ त्यांच्यासाठी तिने स्वतःला परत पूर्वीसारखा करायचा प्रयत्न केला. काही झालं नाही अशी ती वागू लागली. ती जरी मनाने हळवी असली तरी तिला आई बाबांसाठी तिला strong व्हावं लागलं. त्यामुळे आता जेव्हा बाबांनी तिला विचारलं तेव्हा पण तिने हसूनच उत्तर दिल आणि ती गोष्ट टाळली.

आपल्या आयुष्यात अशी नाती असतात ज्यांच्यसाठी आपण आपलं दुःख बाजुला ठेवतो आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो, तस दाखवतो. पण खरच जी व्यक्ती हसरी असेल ती आतून आनंदी असेलच अस नाही. जसं ती व्यक्ती कोणाचा तरी आधार असते तसा तिला कोणाचा आधार मिळाला तर अशी माणसं व्यक्त होतात आणि मनापासून व्यक्त होतात.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “हसणारी प्रत्येक व्यक्ती आनंदी नसते, तर स्वतःला strong बनवण्याचा तो एक प्रयत्न असतो.”

  1. जिथं मन हलकं करता येतं त्या इतकं सुंदर नातं दुसरं कोणतच नाही❤️

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!