Skip to content

हे कधीच विसरू नका, स्वतःमध्ये चांगला बदल घडवण्यासाठी कधीच खूप उशीर होत नसतो.

हे कधीच विसरू नका, स्वतःमध्ये चांगला बदल घडवण्यासाठी कधीच खूप उशीर होत नसतो.


हर्षदा पिंपळे


प्रत्येकालाच आपापलं आयुष्य सुंदर असावं असं वाटतं.आयुष्यात लहानपणापासून पाहिलेल्या स्वप्नांना गवसणी घालता यावी अशी प्रत्येकाची इच्छा असते.

इतकच नाही तर स्वतःमध्ये सातत्याने चांगले बदल घडून यावे असही वाटत असतं.पण कधी कधी स्वतःमध्ये चांगला बदल घडवण्यासाठी खूप उशिर झाला आहे असं आपल्याला वाटत राहतं.

“आता असा विचार करून काय उपयोग ? जरा जास्तच उशिर झाला स्वतःमध्ये बदल घडवायला ? आता काही त्याचा उपयोग नाही. लोकं हसतील,आता बदलून काय होणार आहे?” असं आपण स्वतःशीच बोलत राहतो.

पण स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी खरचं इतका उशीर झालेला असतो का हो ?

तर बिलकुल नाही.एखादी चांगली गोष्ट करताना कधीच उशीर झालेला नसतो.आणि मुळातच आपण स्वतःमध्ये बदल घडवण्याचा विचार करतोय यासारखी दुसरी सुंदर गोष्ट काय असू शकते?

आपण स्वतःमध्ये चांगले बदल घडवू इच्छित आहोत असा विचार करणच खरं तर एक चांगला बदल आहे. नाहीतर काहीजणं स्वतःमध्ये चांगले बदल घडवण्याचा साधा विचारही लवकर करत नाही.तर काहींना वाटतं की बदल घडवण्यासाठी खूप उशीर झालेला आहे. पण मित्रांनो मुळातच चांगला बदल घडवण्यासाठी कोणताही उशीर झालेला नसतो.

आणि अनेकदा उशीर झाला असं करून कित्येकजण त्या विचाराला तिथल्या तिथे पूर्णविराम देऊन मोकळे होतात.आणि पुन्हा एकदा आहे तसं आयुष्य जगण्यास प्राधान्य देतात.पण मग अशा वागण्यामुळे चांगला बदल घडणार असतो तो घडतच नाही.आणि वारंवार असाच विचार केल्यामुळे आपल्यात फारसे चांगले बदलही होत नाहीत.

आणि खरचं जर स्वतःमध्ये चांगले बदल घडवायचे असतील तर लवकर आणि उशिरा असा विचार करून कसं बरं चालेल?

चांगले बदल घडवायचे असतील तर कोणत्याही क्षणी फार उशीर झाला असा विचार न करता आपण प्रयत्न करायला सुरुवात केली पाहिजे. काही नवीन गोष्टी शिकायच्या असतील तर त्या शिकून घ्यायला हव्या.

चांगल्या सवयी स्वतःला लावायच्या असतील तर काळ वेळ न बघता त्या सवयींसाठी अवश्य मेहनत घ्यायला हवी.

रोज रोज रडून झालं असेल तर हसायला हवं नं थोडं ? आज विश्रांती घेऊन झाली तर उद्या पुन्हा जोमाने फिरायला हवं नं ?

कोणतेही सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी किती उशीर झाला हे बघणं फार महत्वाचं नसतं.महत्वाचं असतं ते चांगल्या गोष्टींसाठी एक पाऊल पुढे टाकणं.त्यासाठी मनापासून प्रयत्न करणं.

एक छोटसं साधं सरळ उदाहरण सांगते.

अनय वीस वर्षाचा तरूण. रोज रात्री उशिरा झोपायचा.उशिरा झोपायचा म्हणून उशिरा उठायचा. व्यायाम वगैरे प्रकार काही याला फारसा आवडायचा नाही.पण सातत्याने त्याला सगळे त्याच्या या सवयीवरून काही नं काही बोलायचे. आणि अनयला याचं फार वाईट वाटायचं.पण नंतर मात्र त्यालाच त्याच्या सवयीविषयी काहीतरी जाणवलं.त्यानेही ही त्याची वाईट सवय मोडायची ठरवली.रोज रात्री लवकर झोपून लवकर उठून सकाळी थोडातरी व्यायाम करायचा असं त्याने ठरवलं.आणि हळुहळू त्याच्या अंगी ही चांगली सवय रूजली. अनय रोज लवकर उठायला लागला.व्यायाम करायला लागला.त्यालाही खूप छान वाटत होतं. त्याच्यातील हा सकारात्मक बदल त्याला एक वेगळीच ऊर्जा देत होता.

तर मित्रांनो, अनयने त्यावेळी ” खूप उशीर झाला आहे.आता लवकर उठून काय होणार ?आता व्यायाम करून काय होणार ?” असा विचार केला नाही. चांगला बदल घडवायचा असेल तर कुठेतरी सुरुवात करायला हवी.असा विचार त्याने केला.त्याने जर उशीर झाला असा विचार केला असता तर असा चांगला बदल अनयमध्ये केव्हा घडला असता हे त्याचं त्यालाच माहीत.

तर मित्रांनो, एकच लक्षात घ्या.स्वतःमध्ये चांगला बदल घडवण्यासाठी कधीच खूप उशीर होत नसतो.

उलट प्रत्येक नवा दिवस हा आपल्यासाठी, स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी एक नवी संधी घेऊन आलेला असतो.तर या अशा प्रत्येक दिवसाच्या संधीचा योग्य उपयोग करणं आपल्या हातात असतं.

त्यामुळे चांगले बदल घडवण्यासाठी किती उशीर झाला ते बघत बसू नका.तर विचारांना कृतीची जोड देऊन स्वतःमध्ये चांगला बदल घडवण्याचा प्रयत्न करत रहा.

वयाच्या साठीतही शिकण्याचा निर्णय घेणारे,पन्नाशीतही नृत्याची आवड जोपावेसे वाटणारे कितीतरी हौशी अवलिया आपण पाहतोच नं ?

“आता कसं शिकायचं ?लोकं विशीत पदवी मिळवतात.आपण तर साठीत आहोत. कसं वाटतं ते ? पन्नाशी उलटली आता,या वयात कुठं ठेका धरायचा?लोकं हसायची उगाच?”

ते असा विचार करतात का…?

तर नाही. म्हणून तुम्हालाही कोणताही चांगला बदल घडवण्यासाठी उशीर झाला असं वाटत असेल तर ते विसरून जा.आणि स्वतःमध्ये बदल घडवायला सुरुवात करा.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “हे कधीच विसरू नका, स्वतःमध्ये चांगला बदल घडवण्यासाठी कधीच खूप उशीर होत नसतो.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!