“जगामधल्या सगळ्याच विवाह संस्था आयुष्यभर एकत्र राहण्याची गॅरंटी देत नाहीत.”
मधुश्री देशपांडे गानू
“A great marriage isn’t that just happens, it’s something that must be created.”
©Fawn Weaver..
जन्म, लग्न आणि मृत्यू या घटनांवर तुमचं नियंत्रण नसतंच. अगदी ठरवून केलेलं असलं किंवा प्रेमविवाह असला तरीही, गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही. कोणी लग्नाला जुगार म्हणतात. कोणी म्हणतात, “शादी का लड्डू, जो खाये वो पछताये जो ना खाये वो भी पछताये” लग्न होऊन अनेक वर्षं झालेल्या बहुतेक जोडप्यांना एकतर पश्चाताप तरी होत असतो किंवा आपणच किती सहन करतोय असं तरी वाटत असतं. ज्यांचं लग्न अजून व्हायचंय त्यांना का झालं नाही म्हणून वाईट वाटत असतं. आणि प्रचंड उत्सुकता, आकर्षण असतंच.
मुळात भारतात आणि एकूण जागतिक पातळीवर विवाह या संस्थेला मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. अगदी मूलभूत गरज म्हणून, पुनरुत्पादनाची समाज मान्य संस्था म्हणून. दोन अत्यंत वेगळ्या पातळीवर, वेगळ्या परिस्थितीत वाढलेले दोन जीव विवाह संस्थेने आयुष्यभरासाठी एकत्र येतात. आयुष्यभर एकमेकांना सर्वांगीण साथ देण्याचे वचन देतात. समाजाचा पोत, बाज नीट टिकवून ठेवण्याचे सामर्थ्य विवाह संस्थेत आहे. म्हणूनच अजूनही लिव इन रिलेशनशिप चा जमाना असला तरीही विवाह हाच सुरक्षित, सन्माननीय मार्ग मानला जातो.
आज आपण पाहत आहोत की लग्न संस्था ही थोडी विस्कळीत झाल्यासारखी वाटते आहे. लग्न हा खरं तर अत्यंत गांभीर्याने मनापासून, काया-वाचा-मने दोन व्यक्तींवर होणारा संस्कार आहे. आणि हे समजून घेतलं तरच त्याचं महत्त्वही टिकून राहतं.
पण आजकाल लग्न हा इव्हेंट झाला आहे. अवाढव्य पैसा खर्च करून डेस्टिनेशन वेडिंग हा प्रकार वाढीस लागला आहे. प्री वेडिंग शूट, मग कसले कसले दिवस, कार्यक्रम आणि मग लग्न हे सगळं खूप सवंग झालं आहे. फक्त फोटोशूट, व्हिडिओ शूट, झगमगाट, दिखाऊपणा, स्टेटस या सगळ्यांमध्ये मूळ महत्त्वाचे विधी हरवून गेले आहेत. भरमसाठ मेकअप केलेली नववधू ओळखू येत नाही. विवाह संस्थेचा मूळ आत्माच हरवला आहे. आणि या नको त्या गोष्टींना अवास्तव महत्त्व आल्याने आज लग्न टिकण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सगळा बेगडी दिखाऊपणा. आणि मग खरंच जेव्हा लग्नानंतर सहजीवनाची सुरुवात होते तेव्हा मात्र सगळं चित्र बदलतं. प्रचंड वाढलेलं घटस्फोटांचे प्रमाण हे याचेच द्योतक आहे. कायम सगळं दिखाऊ, गुडी गुडी, छान छान कसं असणार ना!
जगात कोणतीही विवाह संस्था आयुष्यभर एकत्र राहण्याची गॅरंटी देत नाही. आनंदाची, यशस्वीतेची हमी देत नाही. मुलगी नोकरी, व्यवसाय, पैसा, पत, सुरक्षितता हे बघून लग्न करते, तर मुलगा सौंदर्य, रंग, शिक्षण, नोकरी, कुटुंब हे पाहून लग्न करतो. पण या सगळ्याची तरी शाश्वत ग्यारंटी आयुष्यभर राहील असं कोणी ठाम सांगू शकतं का??
अडचणीच्या, दुःखाच्या, कठीण परीक्षेच्या प्रसंगीही एकमेकांना खंबीर साथ देणारेच विवाह संस्था यशस्वीपणे टिकवून ठेवतात. तसं तर आयुष्यही गॅरंटी कार्डसह येत नाही. उद्या काय होणार हे आपल्याला माहीत नसतं. तर दोन व्यक्ती कायम एकत्र राहतील ही तरी हमी कशी असणार?? पण यशस्वी, आनंदी जोडपी असतात ना! “कारण गॅरंटीचा विचार न करता त्यांनी एकमेकांचा विचार केलेला असतो.” असीम प्रेम, विश्वास, समजूतदारपणा, क्षमाशीलता, आदर अशा अनेक भावभावनांनी त्यांनी हे खरंतर चिकटवलेलं नातं जपलेलं असतं. फुलवलेलं असतं. वर्षानुवर्ष सुखाने, समाधानाने संसार यशस्वीरित्या पार पाडलेला असतो. आणि अशांमुळेच आजही ही विवाह संस्था ठाम टिकून आहे.
भांड्याला भांडं लागलं की आवाज होणारच. अगदी जन्मदात्या आई-वडिलांशी आणि भावंडांशी तरी कुठे आपलं नेहमी पटतं?? वाद होतातच ना! तसंच पती-पत्नीच्या नात्यातही वाद, मतभेद होणारच. पण ते विकोपाला जाऊ नयेत याची काळजी जर दोघांनी घेतली तर संसार यशस्वी होतातच.
यशस्वी लग्नासाठी गॅरंटी तर नाही पण काही टिप्स पाहू.
१) सातत्याने आणि मोकळेपणाने पती-पत्नीमध्ये संवाद घडायला हवा. लपवाछपवी असता कामा नये.
२) तुमच्यासाठी तुमचा जोडीदार महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे तुमच्या जीवनात प्रेम, आनंद, तुमच्या जीवनाला अर्थ आहे हे शब्दांमधून, कृतीतून वेळोवेळी व्यक्त होणे गरजेचे आहे.
३) फक्त तुमचा दोघांचा असा खास वेळ एकमेकांसाठी काढायलाच हवा.
४) तुमच्या पतीचं/ पत्नीचं मत, आवडीनिवडी, छंद वेगळे असू शकतात, हे मान्य करायला हवं. त्याचा आदर करायला हवा.
५) एकमेकांवरील विश्वास दृढ कायम असावा.
६) माफ करायला शिका. कोणीच सर्व गुणसंपन्न नसतो. जोडीदाराकडून झालेली चूक माफ करायला शिका. आणि स्वतःकडून झालेल्या चुकीसाठी माफी मागायला ही शिका.
७) विवाह हा फक्त दोन व्यक्तींचा नसून दोन कुटुंबांचा असतो. त्यामुळे दोन्हीं कुटुंबातील आपस्वकीयांना आपलंसं करणं, त्यांना योग्य मान देणे हेही महत्त्वाचं आहे.
भिन्न संस्कारांत, भिन्न वातावरणात आणि मुळात भिन्न प्रवृत्तीची दोन माणसं, स्त्री आणि पुरुष एकत्र येतात. “Men are from Mars and Women are from Venus” असं म्हणतात. नैसर्गिक रित्याच दोघे अगदीच भिन्न पण परस्पर पूरक आहेत. हे समजून उमजून जाणीवपूर्वक प्रयत्न करून विवाह संस्था अत्यंत आनंदाने आणि यशस्वीपणे टिकवता येतेच. दोन्हींकडून समान पातळीवर प्रयत्न झाले तरच. आणि प्रेम.. प्रेम तर माणसाला बांधून ठेवतं. निस्सीम प्रेम ही तर यशस्वी विवाहाची गुरुकिल्लीच आहे….
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

