Skip to content

“आपल्याकडे जे काही आहे, त्याबद्दल कृतज्ञ राहण्यास विसरू नका.”

“आपल्याकडे जे काही आहे, त्याबद्दल कृतज्ञ राहण्यास विसरू नका.”


मधुश्री देशपांडे गानु


” जिस का जितना हो आँचल यहाँ पर,
उसको सौगात उतनी मिलेगी…
फुल जीवन मे गर ना खिलें तो
काटों से भी निभाना पडेगा…..
जिंदगी प्यार का गीत है
इसे हर दिल को गाना पड़ेगा ”

जीवनात तुमच्या नशिबी जे बरं वाईट आहे ते तुम्हांला मिळणारच आहे. आयुष्याच्या या वाटेवर नेहमीच फुलं नाही तर काटे ही वेचावे लागतात. त्यांनाही आपलं म्हणून चालावं लागतं. कारण मुळात आपण श्वास घेतोयं, जगतोयं, रोजचा नवीन दिवस पाहत आहोत, हेच आपल्यासाठी अत्यंत कृतज्ञ राहण्यासाठी पुरेसं आहे.

“अरुणिमा सिन्हा” माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली दिव्यांग स्त्री. एका रेल्वे प्रवासादरम्यान काही चोरांशी झालेल्या झटापटीत त्यांनी अरुणिमाला ट्रेनच्या बाहेर फेकले. नेमके त्याचवेळी समोरच्या ट्रॅक वरून दुसरी ट्रेन येत होती. अरुणिमा च्या एका पायावरून ती ट्रेन गेली. नंतर अनेक महिने ती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती तिचं आयुष्य वाचावं म्हणून तिचा डावा पाय कापावा लागला. पण ती डगमगली नाही. एवढे होऊनही अरुणिमाला माउंट एवरेस्ट सर करायचा होता.

कारण तिच्याकडे एक पाय तर होता. तिची जिद्द, तिचं स्वप्न तर होतं. आणि मुख्य म्हणजे या मिळालेल्या पुनर्जन्मासाठी ती कृतज्ञ होती. तिचा स्वतःवरचा विश्वास ठाम होता. कृत्रिम पाय बसवून तिने जिद्दीने माउंट एवरेस्ट शिखर सर केले. तिथे तिरंगा फडकवायचे तिचे स्वप्न तिने साकार केले. अनेक पुरस्कारांनी, सन्मानांनी तिला गौरवण्यात आले.

स्वतःवर असलेला ठाम विश्वास, स्वप्न पाहण्याची इच्छा, जिद्द, प्रयत्न, मेहनत, ध्यास यामुळे ती हे करू शकली. आणि जे तिच्या हातात आहे त्याबद्दल ती कृतज्ञ होती.

आयुष्यात माणूस अनेक स्वप्नं रंगवतो. ती पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर धडपडही करतो. काही पूर्ण होतात. काही कायम अपूर्ण राहतात. तरीही निराश न होता नव्याने नव्या क्षणांचे, प्रसंगाचे स्वागत करणे म्हणजेच आयुष्याबद्दल कृतज्ञ असणे होय. खरं ना!!

आज करोनासारख्या भयंकर आजाराला तोंड देऊन आणि लॉकडाऊन चा फटका खाऊन तर आपण हे नक्कीच शिकलोयं, की आपल्याकडे आज जे काही आहे ते अमूल्य आहे. आणि याबद्दल आपण अत्यंत कृतज्ञ असायलाच हवं. जे तुमच्या जवळ नाही मग भौतिक सुखं, वस्तू, प्रेमाची व्यक्ती, पैसा, स्टेटस, इस्टेट काहीही… त्याचं दुःख करून हताश होण्यापेक्षा जे तुमच्या जवळ आहे त्याबद्दल प्रथम कृतज्ञता बाळगा. आणि सकारात्मक भावनेने यशाच्या नवीन पायऱ्या चढण्याचा प्रयत्न नक्की करा.

कोणकोणत्या गोष्टींसाठी आपण कृतज्ञ असायला हवं आणि या गोष्टींचा कधीही विसर पडू नये, ते पाहू.

१) तुम्हांला मिळालेलं सुंदर आयुष्य.. एकदाच मिळतं हो! केवढी मोठी भेट आहे ही आपल्यासाठी. तुमचं असंणं, तुमचं अस्तित्व किती महत्त्वाचं आहे. तुम्ही नवीन स्वप्नं बघू शकता. त्यासाठी प्रयत्न करू शकता. यासाठी कृतज्ञ असायलाच हवं नाही का!

२) तुमची सद्यस्थिती. नीट विचार करा की तुम्हीं जगातील कितीतरी लोकांपेक्षा चांगले जीवन जगत आहांत.

३) तुमचे मित्र मैत्रिणी. यांच्यामुळे तुमचे जीवन सुखकर, आनंदमयी आहे. तुमच्या मनातलं बोलायला तुम्हांला माणसं आहेत. तुम्हांला मदत करायला तुमचे मित्र मैत्रिणी नेहमी तत्पर असतात. भाग्यवान आहांत तुम्हीं.. याबद्दल कृतज्ञ असायलाच हवं.

४) तुमचे पालक. तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम करणारे आणि तुमची सर्वात जास्त काळजी करणारे. तुमचे आई-वडील. ज्यांच्यामुळे तुम्ही हे जग पाहत आहात त्यांच्याबद्दल आजन्म कृतज्ञता असायलाच हवी.

५) तुमचा आत्मविश्वास, धैर्य, सामर्थ्य ज्यामुळे तुम्ही या जगात यशस्वीपणे टिकून आहात.
६) तुमची मानसिक, शारीरिक, बौद्धिक ताकद. तुमची बुद्धिमत्ता..
७) तुमचं सुंदर, सुदृढ शरीर आणि कोमल हृदय. याबद्दल तर कृतज्ञ असायलाच हवं. आणि त्याची योग्य काळजी घ्यायला हवी.

८) तुमची मिळकत, आवडीच्या वस्तू, प्रेमाची माणसं, तुमचे कुटुंबीय यासाठी तुम्ही नेहमीच कृतज्ञ असायला हवं ना!

अत्यंत प्रामाणिकपणे आयुष्याच्या सर्व आघाड्यांवर यशस्वी होण्याचे प्रयत्न करतानाच मनात मात्र कायम कृतज्ञ भाव असू द्या. ही कृतज्ञता वेळोवेळी व्यक्त करणे मात्र गरजेचे आहे. आपणही या समाजाचाच एक भाग आहोत, म्हणून या समाजाचे देणे लागतो. या कृतज्ञ भावनेने जमेल तशी सेवा करा. कृतज्ञ भावाने, कृतज्ञता व्यक्त केल्याने तुम्हांला वेगळे समाधान, वेगळाच आनंद मिळतो. आणि नवीन काही करण्यासाठी अंत:प्रेरणाही मिळते. प्रत्येक गोष्ट पैशात नाही मोजता येत ना!

कृतज्ञ भावनेने आपलं काम, आपलं सद्वर्तन करत राहणे महत्त्वाचे आहे. आणि खरंच त्यामुळे मिळणारा आनंद हा आतून आलेला असतो. चिरकाल टिकणारा.. बघा प्रयत्न करून…..


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on ““आपल्याकडे जे काही आहे, त्याबद्दल कृतज्ञ राहण्यास विसरू नका.””

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!