मोकळ्या स्वभावाच्या व्यक्तींसोबत खोलवर झालेलं बोलणं आरोग्यासाठी एक सर्वोत्तम उपाय.
अपर्णा कुलकर्णी
नीरा आज नव्या ब्रांच ऑफिस मध्ये जॉईन होणार होती. पहिली ब्रांच घरापासून बरीच दूर असल्यामुळे बरेच प्रयत्न करून तिने ब्रांच बदलून घेतली होती. आज तरीही तिला उशीर झाला होता यायला. त्याचे कारण जरा वेगळेच होते. नीराची मनस्थिती खूपच नाजूक होती आणि त्यात कामाची आणि घराची सगळी जबाबदारी तिच्यावर पडत होती. नीराचे वय जेमतेम तेहतीस होते.
इतक्या कमी वयात तिला थोडा कामाचा किंवा कशाचाही ताण पडला तर ती भोवळ येऊन पडत होती. नव्या ब्रांच ऑफिसमध्ये सगळ्यांनाच तिच्या तब्येतीविषयी कल्पना होतीच. आज सकाळी सकाळी घरात घडलेला प्रसंग तिला सहन झाला नव्हता त्यामुळे तिला ताण आला होता आणि तिच्या चेहऱ्याकडे बघूनच सगळ्यांना ते समजत होते. घरातील वातावरण पाहून तिच्या अंगातील अवसान गळून गेले होते आणि उशीर होण्यामागे हेच कारण होते.
तिचे नवे बॉस मिस्टर कामत एकदम मोकळ्या मनाचे आणि हसत खेळत राहणारे होते. आज नीरा पहिल्याच दिवशी उशिरा आली म्हणून ते तिच्यावर चिडले नाहीत तर उलट होते असे कधी कधी म्हणून सगळ्या स्टाफ बरोबर तिची ओळख करून दिली. त्यामुळे नीराचे थोडे टेन्शन कमी झाले होते पण सकाळचा प्रसंग इतका आघात देऊन गेला होता मनाला की त्याची सावली चेहऱ्यावर पडली होती. मिस्टर कामतच्या ते लगेच लक्षात आले होते कारण कामत यांनी सायकॉलॉजीचा अभ्यास केला होता आणि त्यात नीराचा चेहरा बघून कोणीही व्यक्ती हे सहज सांगू शकला असता की नीराची मनस्थिती ठीक नाही आणि ती खूप टेन्शन मधे आहे. त्यातच तिच्या तब्येतीची माहिती कामत यांनाही होतीच. मिस्टर कामत नीराशी बोलण्याचा विचार करत होते पण पहिल्याच दिवशी ओळख नसताना असे अचानक वैयक्तिक पातळीवर बोलणे किंवा विचारणे त्यांना बरोबर वाटले नाही.
दिवस असाच निघून गेला. नीरा अजूनही सकाळी होती त्याच मानसिकतेत होती. त्यात कामाचा लोड होता. त्या दिवशीचे काम ती त्याच दिवशी पूर्ण करत असल्याने बराच वेळ एकटीच काम करत बसली होती. सगळे ऑफिस रिकामे झाले होते, बऱ्याच वेळाने नीराने कसेबसे काम आटोपले आणि ती जायला निघाली पण मानसिक ताण त्यात दिवसभर जेवण केले नसल्याने तिला भोवळ येऊन ती पडली. मिस्टर कामत घरीच निघाले होते त्यावेळी त्यांचे लक्ष खाली पडलेल्या नीरावर गेले आणि त्यांनी सगळ उचलून तिला स्वतःच्या घरी आणले.
बऱ्याच वेळाने नीरा शुद्धीवर आली इकडे तिकडे पाहून बिथरली. त्यात समोर मिस्टर कामताना पाहून पटकन उठायला गेली पण पुन्हा भोवळ येऊन ती खाली पडली. कामत नीराजवळ जाऊन बसले आणि तिला तसेच पडून रहायला सांगितले. थोड्या वेळाने उठवून तिला पाणी दिले, खायला घातले आणि तेंव्हा कुठे निराच्या अंगात जरा त्राण आला. इतक्या वेळात मिस्टर कामत खूप मोकळ्या आणि निर्मळ मनाचे आहेत हे नीराला समजले होते. नीरा जरा नॉर्मल झाली हे पाहून कमतानी मुद्द्याला हात घालत काय टेन्शन आहे ते विचारले, आणि लपवण्यात अर्थ नाही आणि कोणाजवळ तरी मन मोकळे करणे गरजेचे असल्याने नीराने व्यक्त व्हायला सुरुवात केली.
माझे अरेंज मॅरेज झाले नागेश बरोबर. लग्नानंतर काहीच वर्षात माझे आई वडील अपघातात गेले आणि मी पोरकी झाले. इतर नातेवाईक फक्त नावालाच होते. नागेश आणि माझा संसार बरा सुरू होता. इकडे नागेशचे वडील वारले होते तर आईला नागेश जुमानत नव्हता. मला एक मुलगा झाला. आज तो सात वर्षांचा आहे. तेंव्हा मला समजले की नागेशचा एका परक्या बाई बरोबर संबंध आहे त्याने त्याचे सगळे खापर नीरावर फोडले आणि घरातच त्या बाईला घेऊन आला घरातील वातावरण एकदम गढूळ झाले. मुलावर त्याचा विपरीत परिणाम झाला त्याचे अभ्यासातून लक्षच उडाले. हे पाहून मी घर सोडले. या घटनेला पाच वर्षे उलटून गेली पण तेंव्हापासून माझ्या मनावर जो काही आघात झाला त्याने मानसिकता बिघडली आणि थोडा ताण पडला तरीही मी अशी कधीही, कुठेही भोवळ येऊन पडते.
आज तो पुन्हा मी रहाते तिथे आला आणि वाट्टेल ते आरोप करून गेला. ते मला सहन झाले नाहीत पण घरात बसून रिकाम्या डोक्यात जास्तच विचार आले असते म्हणून इथे आले. काय करू मी ?? अजूनही तो माझी पाठ सोडत नाही. त्यामुळे जास्तच आजारी असल्यासारखे वाटते.
कामतने निराची स्थिती समजून घेतली आणि समजावून सांगितले, की तू आधीतर स्वतःला एकटे समजू नकोस. कोणी बोलायला नाही असे म्हणू नको मी आहे तुझ्या सोबत अगदी कायम. तू मला लहान बहिणीप्रमाणे आहे. तू शिकलेली आहेस, कमावती आहेस त्यामुळे त्या नालायक माणसाला भीक घालणं, विनाकारण त्याचे बोलणे ऐकून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. स्वाभिमानाने जग. खोट्या कुबड्यांचा आधार घेऊ नको.
नीराने थंड डोक्याने सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि आहे त्या स्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवली. बऱ्याच वर्षांनी ती अशी कोणाजवळ तरी व्यक्त झाली होती, बोलून मोकळी झाली होती आणि त्यामुळेच तिला जास्त बरे वाटत होते. त्यामुळे तिलाही पटले की मोकळ्या स्वभावाच्या व्यक्तींसोबत खोलवर झालेलं बोलणं आरोग्यासाठी एक सर्वोत्तम उपाय.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

